गणवेश

शाळा सुरू होऊन आता जवळपास दोन आठवडे उलटलेलं असायचं. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच पावसाचेही दमदार आगमन झालेलं असायचं. इतक्या प्रदिर्घ कालावधीची उन्हाळी सुट्टी उपभोगून शाळेत जायचा कंटाळा तर आलेला असायचा, पण घरच्यांच्या धाकापुढे नाईलाज व्हायचा. तेव्हा कधी कधी या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं की, कितीही पाऊस पडला तरी आपल्या शाळेभोवती तळे साचून आपल्याला सुट्टी मिळणार नाही, कारण आपल्या शाळेला तसं मैदान वा आजूबाजूला मोकळी जागाच नाही. मैदान म्हणून फक्त नावालाच असलेलं मारूतीच्या मंदिराच्या आवाराचा परिसर. 

शाळेच्या अगदी पहिल्या दिवसापासून कित्येक विद्यार्थ्यांच्या अंगावर नवीन गणवेश, पाठीला नवीन पिशवी, पायात झगमगीत शूज असं काही बघायला मिळायचं, पण खरं अप्रूप तर तेव्हा वाटायचं जेव्हा, त्याच्या पाठीवरच्या त्या नव्या कोऱ्या पिशवीत नवीन पुस्तकं, वह्या, कंपास हे सारंही दिसायचं. तेव्हा मग नवीन वह्या-पुस्तकांच्या वासाला वेडी मंडळी, त्याच्या आजूबाजूला गर्दी करायची.
शाळा सुरू झाली की पहिले काही दिवस सूट दिलेली असायची की, बिगर गणवेश या, पुस्तकं नसतील तरी चालतील वगैरे. पण तो कालावधी उलटला की मग नाईलाज असायचा. वर्गात सर्वांपुढे उभं करून मास्तर खूप ब-याच विद्यार्थ्यांना ओरडायचा. तेव्हा जागेवर उभं राहिल्यावर आमच्यापैकी बरेचजण एकाच जागी बसून बसून आमच्या शाळेच्या चड्डीला पडलेली भोकं हात मागं बांधून झाकत असू. तेव्हा वर्गात एकच हशा पिकायचा. एकतर गणवेश घालून शाळेत या, किंवा पालकांना घेऊन या, अशी तंबी देऊन मग मास्तर आम्हाला खाली बसवायचा. मग खाली बसल्यावर मन नकळतपणे घराकडे धाव घ्यायचं. आता घरात काय सांगायचं.? शाळेत कुणाला घेऊन यायचं.? नवीन गणवेशाचं काय करायचं.? कारण घरची आर्थिक परिस्थिती काही माझ्यापासून लपलेली नसायची. लहान असलो तरी पुढे जे काही चाललंय ते कळायचचं. पप्पा मिलमध्ये कामाला, शेती पावसावर अवलंबून, ते उत्पन्न ही वर्षाच्या शेवटी, मिलचा पगार महिनाअखेरीस किंवा महिना भरल्यावरच्या पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात. मग पगार हातात आला की आधी महिनाभराची उधारी भागवायची. त्यात मग किराणा, दळप, दवाखाना, शेजा-यांकडून घेतलेली किरकोळ उधारी वगैरे. हे सगळं भागवून जे राहिल, त्यात मग पुन्हा एकदा पुढल्या पगारापर्यत आई-पप्पा चालवायचे. या सगळ्या अग्निदिव्यात पप्पा माझा गणवेश कसा बसवणार.? आणि त्यांना सांगायचं तरी कसं.? याचं मनाला कोडं पडलेलं असायचं. त्यातल्या त्यात ब-यापैकी जुनी पुस्तके वह्या, जुने दफ्तर, बाकी सारं साहित्य ही जुनच, म्हणजे गेल्या इयत्तेत वापरलेलं. त्यामुळे बहुतांश खर्च कमी व्हायचा, पण काही खर्चाला पर्याय नसायचा, त्यापैकी एक गणवेश. तेव्हा कधी कधी मधल्या सुट्टीत डब्बा खाऊन झाल्यावर आम्हा मित्रांची चर्चा सुरू असायची की, भविष्यात आपण नेमकी किती पगाराची नोकरी केली पाहिजे वा मिळवली पाहिजे. तेव्हा त्या वयात आमच्या बाल बुध्दीला पाच हजार रुपये म्हणजे खूप खूप खूप मोठी रक्कम वाटायची. आमचं सगळ्यांच ब-यापैकी या रक्कमेवर एकमत व्हायचं. आता कधी कधी ते दिवस आठवले की खूप खूप हसू येतं, आणि आजही या गोष्टीचं नवल वाटतं की, मी न मागता पप्पांनी नवीन गणवेश आणलाच कसा,? आणि नेमकी कुठे आणि काय तडजोड केली.? ती तडजोड नंतर मग बरेच दिवस मला पप्पाच्या अंगातील फाटक्या बनियनच्या भोकातून डोकावताना आणि तुटक्या चप्पलच्या फरफटीत दिसून यायची.!🎭
#आयुष्य_वगैरे #अडगळ
#गंध_आठवणींचा #आठवणीतली_शाळा
#शाळेच्या_डायरीतलं_एक_पान

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..