शाळेतल्या आठवणी

वर्गात एका विशिष्ट जागी बसलं की, हमखास सगळी शाळा नजरेत घावायची. आमचा वर्ग तसा शाळेच्या मध्यवर्ती भागात, आणि आम्ही ब-यापैकी नेहमीच खिडकीची जागा  पकडून बसायचो, त्यामुळे नकळतपणे सतत बाहेर लक्ष जायचं, मास्तरांची एकसारखी बडबड सुरु असताना खिडकीतून बाहेर पहायला लय मस्त वाटायचं.
शाळेच्या आवारात चिंचेची भरपूर मोठाली झाडं. कावळं आणि छोट्या छोट्या चिमण्यांचा किलबिलाट सतत सुरू असायचा, तो कधी कधी मास्तरांच्या बडबडीला कोरस असल्याप्रमाणे भासायचा. एक तास संपला आणि दुसरा सुरू व्हायचा असला की, या मधल्या ४-५ मिनिटांच्या कालावधीत वर्गात लय कालवा सुरू असायचा.
मुली तर सपशेल एकमेकांकडे तोंड करून बसायच्या आणि गप्पा मारायच्या.‌ आम्ही मुलं नेहमीप्रमाणे कुणाच्या तरी डोक्यात खारीक मारणं, एखाद्याची पेन, कंपास लपवणं, खिडकीच्या कपाटात ठेवलेल्या जेवणाच्या डब्यांचा क्रम बदलणं, वर्गाबाहेर असलेल्या चपला विस्कटणं, फळ्यावर लिहलेल्या सुविचाराचं एखादं अक्षर पुसून येणं, अशा उचापती करत रहायचो. त्यातल्या त्यात एखादं कार्टून आकाशवाणी पोरगं वर्गाच्या दरवाज्याला खेटून उभं रहायचं, आणि मास्तर येताना दिसला की.., ए... गोंद्या आला रे... अशी हाक देऊन सगळ्या वर्गाला सावध करायचं. पण एखादा तास संपून पुढचा तास जेव्हा गणित विषयाचा असायचा, तेव्हा त्या चार पाच मिनिटांच्या कालावधीत वर्गात अक्षरशः स्मशान शांतता पसरलेली असायची. गणिताचा मास्तर दूरवर असला तरी, व्हरांड्यातून वर्गाकडे येताना त्याची चाहूल स्पष्ट जाणवायची. त्याच्या पायातल्या त्या बांधिव चमड्यांच्या चपलांची करकर ऐकून आमच्या काळजात धस्स व्हायचं. मास्तर वर्गात आल्यावर एकsss साथsss नमस्तेsss... च्या तालबद्ध आवाजात वर्गातील शांतता काहीकाळ हरवून जायची. मास्तर क्षणभर एका ठिकाणी थांबून वर्गात सगळीकडे एक नजर फिरवायचे, तेव्हा बहुतेक जणांचा नेमकं आपणच त्याच्या नजरेत घावायला नको, हा आटापिटा सुरू असायचा. क्षणभरात पुन्हा एकदा सारं काही मग सामसूम होऊन जायचं. नेहमीप्रमाणे पहिल्या बेंचवर बसलेली हुशार दिवटी पोरं काहीतरी प्रश्नं विचारून आय घालायची, आणि मग त्याची झळ पार अगदी शेवटच्या बेंचवर आमच्या पर्यंत पोहचायची. गणिताचा मास्तर तसा शिकवायचा चांगलंच, पण त्यानं बोललेलं आमचा मेंदू कधीच जास्त मनावर घेत नसायचा. मास्तर शिकवताना आमचं लक्ष खिडकीतून बाहेर असलेलं मास्तरला कळालं की, तो हातात असेल ते थेट, त्याच जागेवरून आमच्या दिशेने भिरकावून द्यायचा. कधी खडू, कधी डस्टर, तर कधी पट्टी. दररोज गणिताच्या मास्तरांचा तास संपला की, संपूर्ण वर्गात एक आनंदाची लहर पसरायची, अशावेळी पुढचा तास सुरू होण्याआधी आम्ही पोरं बेंचवर माना टेकवून, कान पुर्णपणे बेंचला लावून बोटांच्या नखांनी एखादं संगीत वाजवत बसायचो. जाम भारी वाटायचं. तेव्हा पुन्हा पुढचा तास सुरू झाल्याची घंटा वाजल्यावरच आम्ही भानावर यायचो.! 🎭
#आयुष्य_वगैरे 
#शाळा_शाळेत_गेलेल्या_प्रत्येकासाठी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..