व्हेंटिलेटर

दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे.
ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाही हॉस्पिटलमध्ये आलेली नाही. माझा लहान मुलगा एमबीबीएस करतो आहे, तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर शिकत असून अद्याप आलेला नाही. मोठी मुलगी तर नांदायला गेल्यापासून आपल्याला एक बाप आहे, हेच विसरून गेली आहे. मी खूप दारू पितो, खूप म्हणजे खूप. आजही घरी बसून मी खूप खूप खूप प्यायलो. तशी दारू आता माझ्या तब्येतीला आणि पर्यायाने जीवनाला घातक असं डॉक्टरांनी ब-याचदा सांगितलंय, पण तरीही मी पितोच. मरण्यासाठी नाही तर जगण्यासाठी पितो. पण आज त्रास जरा जास्तच झाला. माझ्या बडबडण्याचा आवाज ऐकून शेजारचा एक ओळखीचा गृहस्थ घरी आला.‌ आतून कडी होती म्हणून पुर्ण ताकदीने दार ढकलून कडी तोडून तो आत आलाच. तेव्हा मी जमीनीवर निपचित पडलो होतो. माझा श्वास अगदी मंदगतीने सुरू होता. सुसाट रेल्वे स्थानकावर थांबताना कशी आवाज करत हळूहळू थांबते ना, तसं मला वाटतं होतं, बहुतेक सारं काही संपलय आता. हा आपला शेवटचा दिवस आणि बहुतेक शेवटचा श्वास ही जवळ आलाय. त्यानं हे सारं पाहून मला तातडीने अॅडमिट केलं.

मला एक सख्खा भाऊ. तो सहकुटुंब कोल्हापूर येथे असतो. सरकारी नोकरी, ते ही टपाल खात्यात. सध्या काहीतरी कोट्याधीश वगैरे आहे तो. त्याला दोन मुलं. एकाचं शिक्षण पूर्ण झालाय, तर एक अजूनही शिकतोय. मला अॅडमिट करण्याआधी त्या भल्या गृहस्थाने माझ्या भावाला फोन केला होता. माझी तब्येत खूपच खालावल्याचं आणि अत्यवस्थ असल्याचं कळवलं होतं. पण अजूनही तो सुद्धा आलेला नव्हता. तो भला गृहस्थच माझी देखभाल करत होता. तितक्यात मला व्हरांड्यातून माझ्या भावाच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. तो त्या भल्या गृहस्थाशी वाद घालत होता की, इथं कशाला अॅडमिट केलंत.? सरकारी दवाखान्यात अॅडमिट करायचं नाही काय.? वगैरे वगैरे..! तितक्यात भाऊ थेट आत आला. डॉक्टर स्टेटमेंट तपासून पाहत होते. भावाने डॉक्टरांना थेटच प्रश्न केला की, आणखी किती आयुष्य आहे याचं.? सध्या वाचायचे काही चान्सेस आहेत काय.? आणि नसतील तर मग उगाच हे व्हेंटिलेटर लावून आमचा खर्च का वाढवत आहात.? हे ऐकून मला अॅडमिट केलेला तो भला गृहस्थ खाली मान घालून गुपचूप निघून गेला. व्हेंटिलेटर काढा.. असं म्हणत भावाचा आवाज खूपच चढला होता. त्याला डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. त्यावर भावाने आम्हाला इथं आमचं पेशंट ठेवायचं नाही, आम्ही सरकारी दवाखान्यात जाणार आहोत, असा रेटा लावला. हॉस्पिटल सारख्या ठिकाणी वाढलेला गोंधळ पाहून, नाईलाजास्तव डॉक्टरांनी पेशंट घेऊन जायची परवानगी दिली, पण सरकारी दवाखान्यात अॅडमिट होईपर्यंत पेशंट व्हेंटिलेटरवरच राहणार, हे भावाला बजावून सांगितलं. भाऊ लागलीच तयार झाला. मी अजूनही निपचित अवस्थेत हे ऐकत होतो.

थोड्याच वेळात एका अॅम्बुलन्स मधून माझा प्रवास सरकारी दवाखान्याकडे सुरू झाला. आतमध्ये एक बॉय आणि माझा भाऊ बसले होते. बॉय अॅम्बुलन्सच्या खिडकीतून टक लावून बाहेर पाहण्यात हरवला होता. भावाची एकट्याची सुरू असलेली बडबड माझ्या कानी येत होती. पावसाचं दिवस आहेत, स्मशानभूमी लांब आहे, खड्डा काढून ठेवायला सांगायला हवं, पटकन सगळं काही सोपस्कार आवरून कोल्हापूर गाठायला हवं वगैरे. भावाला मी लवकर मरत का नाहीये, हे कोडं पडलं होतं. भावाने एक दोनदा त्या बॉयला ही आमिष दाखविले की, ते व्हेंटिलेटर तेवढं काढा याचं, पाचशे रुपये देतो. यावर त्या बॉयने तुम्ही सख्खं भाऊ आहात ना.!?? हा भावाला विचारलेला प्रश्न ऐकून भाऊ पुढे काहीच बोलला नाही.

एव्हाना आम्ही सरकारी दवाखान्याजवळ आलो होतो. मी आतल्या आत पार खचून गेलो होतो. मला घाईघाईने अॅम्बुलन्स मधून बाहेर काढलं, आत बेडवर नेऊन झोपवलं. डॉक्टर येऊन पाहणी करत होतेच, तितक्यात मी माझा शेवटचा श्वास घेतला. डॉक्टरांनी फॉर्मेलिटी म्हणून पुन्हा एकदा तपासणी केली आणि मग मला मृत घोषित केलं. भावाने सुटकेचा निःश्वास टाकला. लगेचच त्याने बाकीच्या फॉर्मेलिटीझ आवरून माझी बॉडी ताब्यात घेतली. बिल खूपच झालं, बिल खूपच झालं असं म्हणत भाऊ अजूनही रिसेप्शन काउंटरवर वाद घालत होता. पांढ-या कपड्यात बांधून गुंडाळून ठेवलेला मी अॅम्बुलन्समध्ये निवांत पडून होतो.

शेवटी एकदाचा भाऊ अॅम्बुलन्स जवळ आला. खिशातून फोन बाहेर काढला आणि मला अॅडमिट केलेल्या, माझ्या शेजारच्या त्या भल्या गृहस्थाला फोन केला की, बॉडी घेऊन आम्ही घराकडे येत आहोत, एक दोन माणसं बोलावून बॉडी तेवढी आत ठेवून घ्या. हे ऐकून तो अॅम्बुलन्स मधील बॉय बोलला की, मी आणि ड्रायव्हर दोघं मिळून बॉडी आत ठेवून देतो, एक तीनशे रुपये जादा द्या. यावर पुन्हा भाऊ वाद घालू लागला की, मूळ चार्जेस ५००/- रूपये आहेत, त्यात होतं असेल तर करा, मी एक रूपया ही जास्त देणार नाही. शेवटी एकदाची माझी बॉडी घराजवळ आली. तो भला गृहस्थ तेवढाच मला गलबलून आल्यासारखा दिसत होता. त्याचे डोळे पाणावले होते. एव्हाना आई बाबा कधीचे घरी येऊन बसले होते. माझी बॉडी आत ठेवून तो बॉय आणि तो भला गृहस्थ जात होते तितक्यात माझी आई बोलली की, आमच्यात असं झोपवत नाहीत, तिकडं तोंड करून भिंतीला टेकवून बसवा त्याला. ठीक आहे असं म्हणून त्या दोघांनी मला तसं बसवलं.

अजूनही माझी पोरं, बायको यांचा कुणाचाही पत्ता नव्हता. सगळं घर कसं शांत शांत वाटत होतं. तसंही ते नेहमी शांतच असायचं, कारण इथं मी तसा एकटाच. पण आज मी इथून कायमचा निघून जात असताना ही कुणालाच त्याचं काहीच सोयरसुतक वाटत नव्हतं. माझा कोट्याधीश भाऊ अजूनही त्या अॅम्बुलन्स वाल्यांशी पैशांच्या देवाणघेवाणी वरून वाद घालण्यात मग्न होता. तितक्यात भावाची दोन मुलं आणि बायको ही आली. मोठ्ठं पोरगं मोबाईल मध्ये हरवलं होतं, तर बारकं पोरगं गाणी ऐकण्यात गुंग होतं. थोड्या वेळाने आत आल्यावर त्यांनी ती यंत्र गुंडाळून खिशात ठेवली. आता त्या खोलीत फक्त मी, माझे निवडक कुटुंबिय आणि तो भला गृहस्थ इतकेच उरलो होतो. माझ्या मनाला किती आणि काय काय वाटून जात होते, मला खूप खूप काही बोलायचे होते, पण जिथं जिवंतपणी आपली दखल घेतली गेली नाही, तिथं मेल्यावर आपली दाद घेणार तरी कोण.?? हळूहळू तिथली स्मशान शांतता पाहून मला स्मशानाची कल्पना ही करवत नव्हती, पण आता मला तिकडचं जायचं होतं., कायमस्वरूपी.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..