३० जुलै, २०२३
नुकताच माझा डोळा लागला होता. तितक्यात मला एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून थोडासा सावध झालेलो मी, हे तर दररोजच आहे, असं म्हणून पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात तो आवाज मला आणखीनच भेसूर व जास्त प्रमाणात ऐकू येऊ लागला. मग मात्र माझ्या मनात भितीची आणि शंकेची पाल एकत्रच चुकचुकली. कारण मी जिथं राहतो, तिथं फारतर फक्त पाळीव कुत्रीच आहेत, भटक्या कुत्र्यांची संख्या फारच कमी, जवळपास नसल्यागतच. पण आज कानावर एकसारखा पडणारा हा भेसूर आवाज वेगळाच वाटत होता. दोन दिवसांपासून रिमझिम पावसाची एकसारखी रिपरिप सुरूच होती. मस्त गारेगार वातावरणात मी उबदार वाकळ घेऊन झोपलो होतो, पण आज या कुत्र्यांनी का कुणास ठाऊक पण एकच कल्लोळ माजवला होता. म्हणून मग नेमकं झालंय तरी काय, ते पाहण्यासाठी मी नाईलाजाने अथरूणातून बाहेर पडलो. अजूनही पावसाची रिपरिप कानावर येतच होती. चुकून घरात शिरलेला आणि कुठंतरी दडून बसलेला रातकिडा त्याची ड्युटी इमानेइतबारे निभावत होता. त्यातच अधेमध्ये एखाद्या बेडकाचा येणारा आवाज तो बेडूक नेमका किती मोठा असेल, या विचाराने हैराण करून जात होता. अंथरूण सोडल्यावर पहिल्या प्रथम मी लाईटच्या बटनाकडे वळलो, पण काय आश्चर्य.! संपूर्ण घर फिरलो तरी आज मला लाईटची बटणं सापडलीच नाहीत. तसा मी आणखीनच जास्त घाबरलो. मनाला सहज वाटून गेलं की, आज नक्कीच काहीतरी वेगळं घडतं आहे आपल्यासोबत. बाहेर कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज जास्तच वाढत चालला होता. तो आवाज माझ्या विचारशक्तीला खीळ बसवत होता. तितक्यात मला माझ्या मोबाईलची आठवण आली. तसा मी पुन्हा चाचपडत चाचपडत अंथरूणाजवळ आलो. मोबाईल नेहमीच माझ्या अंथरूणाच्या उजव्या बाजूला ठेवलेला असायचो. एकदाचा मोबाईल हाताला लागला तसा मला थोडं हायसं वाटलं. Sensorला बोटं लावून मी लॉक काढलं आणि एका तीव्र झटक्याने मी मोबाईल हातातून खाली फेकून दिला. कारण लॉक काढताच मोबाईलची पुर्ण स्क्रीन पांढरीफटक पडली आणि त्यातूनही कुत्र्यांचा तोच भेसूर रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आता मात्र मी पुरता घाबरून गेलो होतो आणि थरथरत घामाने पुर्ण भिजून गेलो होते. बाहेर तो कुत्र्यांच्या रडण्याचा भेसूर आवाज,ती पावसाची रिपरिप, तो बेडकाचा आवाज आणि ती रातकिड्याची किरकिर या सा-यात माझं अस्तित्व मला अगदीच शून्य वाटत होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. आजूबाजूला फक्त आणि फक्त अंधार होता. पुन्हा एकदा हिंमत करून मी बाहेर नेमकं काय चाललंय ते खिडकीतून तरी पहावं, म्हणून खिडकीकडे आलो, पण काही केल्या खिडकी उघडतच नव्हती. रागारागाने खिडकीच्या काचेला मी दोन चार लाथा बुक्क्या घातल्या, तरीही काचेला काहीच झालं नाही. म्हणून मग पुन्हा चाचपडत मी घरभर फिरू लागलो, पण सगळं घर मोकळं भासत होतं. कुठेच कशाचाही अडथळा वाटत नव्हता. घरातलं सगळं सामान आणि बाजूच्या भिंती सोडल्या तर बाकी भिंती गेल्या कुठं.? मला हेच कळत नव्हतं. तितक्यात एक दरवाजा माझ्या हाताला लागल्याचं मला जाणवलं. तो दरवाजा उघडायचा मी प्रयत्न करू लागलो आणि तो उघडला ही. दरवाजा उघडताच सर्वात आधी मी माझे कान माझ्या हातांनी अगदी घट्ट बंद करून टाकले. कारण तो कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज आता काही केल्या मला सहन होत नव्हता. मी जितके घट्ट माझे कान बंद करत होतो, तो आवाज तितकाच जास्त तीव्र वाटत होता. नकळत माझ्या हातांचे तळवे मला ओलसर जाणवले, तसा मी कानावरचा एक हात काढून तपासलं, तर मला ते माझ्या कानातून एकसारखं वाहत असलेलं रक्त वाटलं आणि ते रक्तच होतं. नेमकं कधीपासून वाहत आहे, ते माझं मलाच ठाऊक नव्हतं. तितक्यात मला जाणवलं की, माझा शर्ट घामाने नाही, तर माझ्याच रक्ताने पुर्ण माखून गेलाय. अचानक एक वीज अगदी जोरदार अशी चमकली. त्या काही क्षणांच्या लख्ख प्रकाशात, मी कित्तीतरी वेळाने, स्वतःला आणि आजूबाजूच्या परिसराला नीट पाहत होतो. मला माझे हात पाय उलटे असल्याचे दिसले, मला डोळा ही एकच उरला होता, अंधारात इतका वेळ माझं स्थिर वाटणारं मस्तक, मला माझ्याच डाव्या हातात धरलेलं दिसलं. घरातच लपून बसावं, म्हणून मी मागं फिरलो, तर मागं घरही दिसतं नव्हतं. हळूहळू पाणी वाढत जात असल्याचा मला भास होत होता. पावसाचा जोरही वाढला होता. माझ्या कानातून एकसारखं फक्त वाहतच होतं. आता मी चालताना मला खूपच विचित्र वाटत होतं, कारण माझं हात पाय उलटे, माझं कापलेलं मस्तक माझ्याच हातात. नेमकं काय करावं, ते काहीच कळत नव्हतं.मी फक्त पुढे पुढे जात होतो. हळूहळू पाणी वाढत आता माझ्या गुडघ्यापर्यंत आले होते. अधेमध्ये सतत लख्ख चमकणा-या वीजा काही क्षणांपुरत्या माझ्या आसपासच्या भीषण वास्तवाशी माझा सामना घडवून आणत होत्या. ते सगळं पाहून माझा थरकाप उडाला होता. मला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं, मला काही केल्या मिळतच नव्हती. पावसाची एकसारखी रिपरिप सुरू असताना आकाशात चंद्र कसा.? नेमकी वीज चमकल्यावरच तो कसा काय दिसतो आहे.? अंधार पडल्यावर चंद्राचं अस्तित्व कुठं हरवून जात आहे.? चंद्रावर ती कुत्र्यासारखी आकृती कशी काय दिसते आहे.? माझ्या आसपासच्या झाडाझुडुपांना कुत्री कशी काय लटकलेली दिसत आहेत.? झाडांच्या फांद्या कुठे गेल्या.? झाडाचं धड म्हणजे खोड, तेही कुत्र्याच्या शरीरासम कसं काय.? मी कुठे चाललोय.? माझं पुढं काय होणार.? 🎭
क्रमशः
#आयुष्य_वगैरे
#अडगळ