१० ऑगस्ट, २०२३

एक छोटासा किस्सा..!
कामावरून घरी परतताना नेहमी प्रमाणे बसची वाट पाहत उभा होतो. ब-यापैकी सगळ्यांनाच लवकरात लवकर घरी पोहचायची घाई, तशीच मलाही. अधेमध्ये हातातील मोबाईल स्क्रोल करत बसच्या वाटेला डोळे लावून होतो. नेहमीच्या ओळखीतले सहप्रवासी ही कधीचे आले होते. त्यातच आज आठवडी बाजाराचा दिवस, त्यामुळे तो चौक भरपूर गजबजला होता. तिथं अगदी हाकेच्या अंतरावर थांबलेली काही प्रेमी युगुलं लाडीकपणाने एकमेकांकडे पाहत फोनवर बोलण्यात हरवली होती. बस यायला अजूनही जवळपास पंधराएक मिनिटे बाकी होती. तितक्यात एक भरपूर दारू वगैरे पिलेला इसम तिथं येऊन कडमडला. त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. मग तिथं उभ्या असलेल्या ब-यापैकी सा-यांनी लागलीच नाकाला हात लावला. देशी घेतलाय.. देशी घेतलाय.. अशी बहुतेक पुरूषांची कुजबूज ऐकू येऊ लागली. तिथं बसायला असलेल्या थोड्याशा शिल्लक जागेवर बसायला तो पुढे सरसावला आणि तिथं असलेल्या सर्वांनी तो अखंड बाकडाच मोकळा करून त्याला देऊन टाकला. तो पठ्ठयाही मग न बसता सरळ सरळ आडवाच झाला. तो इसम अजूनही कुणालाही, कसलंही, एक अवाक्षरही बोलला नव्हता, पण तिथं उभ्या असणाऱ्या सर्वांच्याच चर्चेचा आता तो विषय बनला होता. महिला मंडळींनी नेहमीप्रमाणे हा इतका पितो, तर मग याची मुलं बाळं, बायको, आई-बाप वगैरे कुणी असतील, तर याच्या सोबत कसे राहत असतील.? यावर व्याख्यान सुरू केलं होतं. बिचा-या बायकोचं कित्ती हाल होत असतील, तो तिला दररोज मारहाण करत असेल वगैरे वगैरे. एक दोन महिलांचा तर कंठही दाटून येऊन, डोळे ओलावले होते. तर पुरूष मंडळी नेमकं याच्या उलट चर्चा करत होती. घरी याला त्रास असेल, बायको नीट वागत नसेल, म्हणून हा व्यसनाकडे वळला असेल वगैरे वगैरे. हे सगळं बोलणं माझ्याही कानावर पडत होतं आणि बहुतेक त्या दारू पिऊन बाकड्यावर निवांत पडलेल्या इसमाच्याही. तेवढ्यात हळूवार आवाजात त्याची चाललेली बडबड सर्वांच्या लक्षात यायला लागली.., सगळे नाटकी आहेत, सगळे स्वार्थी आहेत, कुणी कुणाचं नाही, एकटेच जन्माला आलोय आपण नि एकटेच जाणार, कितीही कमावलं तरी सारं काही इथंच ठेवून जाणार, जो तो खोटेपणाने वागतोय, ख-याचं सोंग लय वाईट, म्हणून मी माझ्या आनंदासाठी दररोज होतो टाईट.! मला बेवडा म्हणता तुम्ही, पण आपण सारे बेवडेच. दुःख हे दारू सारखंच, आपण कळत नकळत दुःख नावाची दारू दररोज पितो. फक्त प्रत्येकाचा ब्रॅण्ड वेगवेगळा असतो, इतकाच काय तो फरक.!
नेहमी प्रमाणे बस आली. तिथल्या बघ्यांनी आणि टीकाकारांनी लागलीच भूमिका बदलली आणि प्रवासी झाले. डबल बेल वाजली, बस सुटली, बस थांब्यावर आता फक्त तो दारू पिऊन बाकड्यावर निवांत पडलेला इसमच बाकी होता, आणि बसमधल्या प्रवाशांनी आता वेगळ्याच विषयावर व्याख्यानं सुरू केलं होतं, नेहमीसारखचं.! 🎭
#आयुष्य_वगैरे 
#अडगळ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..