अडगळ
ते म्हातारा म्हातारी खालच्या मजल्यावर राहतात. वरच्या मजल्यावर त्यांचं एकुलतं एक पोरगं, सूनबाई आणि ४-५ वर्षांची एक गोंडस परी.! गावातली जागा तशी अडगळीची, म्हणून म्हाता-याने काही वर्षांपूर्वी शेताचा एक तुकडा विकून गावाबाहेर ऐसपैस जागा घेऊन दुमजली घर बांधलं. तेव्हा ही म्हाता-याचा हट्ट होता की, गावातील घराप्रमाणेच इथंही एकच चूल मांडू, पण का कुणास ठाऊक म्हाता-याच्या पोराने ऐकलं नाही. तसा म्हाता-यानेही जास्त विरोध न करता, पोराच्या मनाप्रमाणे सारं बांधकाम केलं. कारण ही सगळं खटपट शेवटी कुणासाठी, आपल्या पोटच्या पोरासाठी, त्याच्या सुखासाठीच ना, असा विचार म्हाता-याने केला होता. म्हाता-याची शाळेची पाटी तशी कोरीच, इनमिन दुसरी वगैरे शिकलेला. त्यामानाने म्हातारी त्याकाळची मॅट्रिक, म्हणजे सातवी वगैरे काहीतरी उत्तीर्ण. तरीही लग्नानंतर पुढे काहीही करू न शकल्यामुळे फक्त चूल आणि मूल यात अडकलेली. म्हातारा गावातीलच एका मिलमध्ये कामाला होता. ती मिल बंद पडल्यावर शेती एके शेती इतकंच सुरू होतं. शेती पावसावर अवलंबून, त्यामुळे वर्षभर उधारी उसनवारी आणि मग वर्षाकाठी एकदाच सगळ्यांचं देणं भागवायचं वगैरे. तरीही म्हाता-याने या सगळ्याची झळ कधी घरापर्यंत येऊ दिली नाही. पोरगं एकुलतं एक, घरची परिस्थितीही बेताचीच तरीही, त्याच्या संगोपनात म्हातारा म्हातारी कधी काही कमी पडू द्यायचे नाहीत. पण पोरं बुध्दीने तसं बेताचच होतं. म्हातारी खूप काळजी करायची की, आपल्या पोराचं पुढे कसं व्हायचं.? पण म्हातारा तिला नेहमीच धीर द्यायचा अन् म्हणायचा की, त्याचा बाप अजून जित्ता आहे, सगळं नीट पार पाडणार.
पोरगं कसंबसं दहावी पर्यंत आलं, पण तिथून पुढे काही केल्या गाडी जाईचना. ब-याचदा ऑक्टोबर - मार्च वगैरे झालं, तरीही योग जुळून येईना. पोरगं तसं तब्येतीने एकदम मजबूत, पण आधीपासूनच त्याचा शेतीकडे कल नव्हताच. म्हातारा म्हातारी दोघेच शेती पहायचे. बहुतेक तेव्हा नुकतंच ते मोबाईलचं फॅड आलं होतं. चायनीज मोबाईलनी पार खेड्यापाड्यापर्यंत शिरकाव केला होता. तसलचं एक डबडं घेऊन पोरगं दिवसभर लोळत असायचं. म्हाता-याने ओळखीच्या एखाद्या चांगल्या ठिकाणी आपल्या पोराला कामाला लावायचा तसा खूप प्रयत्न केला, पण पोराला तसं काम नको होतं. दुपारी घरी येऊन, मस्त जेवून, तासभर डुलकी काढून, मग परत कामावर जावं, पोरगा अशा प्रकारच्या कामाच्या शोधात होता. या काळात गल्लीतल्या मित्रांच्या संगतीने मिळेल ते काम करून तो किरकोळ पैसे मिळवत होता आणि खर्चतही होता. म्हातारा म्हातारी आपलं घर आणि शेती पाहण्यात मग्न. असेच दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे जात होती. पोराला आता त्याच्या मनासारखं काम ही मिळालं होतं. गावातल्या गावात मेडिकलला औषधं वाटत फिरणं. ड्युटी सकाळी दहा ते दुपारी दोन, आणि पुन्हा दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत. म्हाता-याच्या पोराच्या शिक्षणाच्या मानाने तो आता ब-यापैकी चांगलंच कमवत होता. आता म्हातारा म्हातारीला आपल्या पोराच्या लग्नाचे ध्यान लागले होते. म्हातारीला मुलींची लय हौस आणि कौतुक. त्यामुळे कधी एकदाची घरात सूनबाई येते, असं म्हातारीला झालं होतं. म्हातारा म्हातारी निवांत बसून असले की हीच स्वप्नं रंगवत असायची. सूनबाई आली की तिच्यासाठी हे करू, ते करू, तिला अगदी आपल्या लेकीसारखं वागवू वगैरे वगैरे. शेवटी एकदाचं स्थळं वगैरे पाहणं सुरू झालं. दोन एकर शेती, गावात स्वत:च छोटंसं घर आणि एकुलतं एक पोरगं, त्यामुळे सगळं काही पटकन जुळूनही आलं. म्हातारा म्हातारी ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आला एकदाचा. आली एकदाची त्यांची सूनबाई. आता म्हातारा म्हातारी निवांत सुखाचे दिवस पाहणार होते. सूनबाई सोबत दिवसभर गप्पा टप्पा करणार होते. नातवंडांना सोबत घेऊन बालपण पुन्हा एकदा जगणार होते.
गावातलं घर तसं अडगळीचं. एका ओळीत तीन खोल्या. दोन कौलारू आणि एक पत्र्याचं शेड. एक स्वंयपाक खोली, त्याला लागूनची खोली आता सूनबाईंची बेडरूम झाली, आणि म्हातारा म्हातारी अगदी आनंदाने त्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपू लागले. नेहमी प्रमाणे म्हातारा म्हातारीचं एकमेकांशी ठरलेलं ते एकच वाक्य, ही सगळं खटपट शेवटी कुणासाठी, आपल्या पोटच्या पोरासाठी, त्याच्या सुखासाठीच ना.!
आता म्हातारा एकटाच शेताकडे जाऊ लागला. सकाळी म्हातारी त्याला दोन भाकरी बांधून द्यायची. मग तो थेट संध्याकाळीच घरी परतायचा. म्हाता-याचं पोरगं दुपारी जेवायला येऊन तासभर डुलकी काढून पुन्हा कामावर निघून जायचं आणि सात आठला परतायचं. म्हातारी आणि सूनबाई दोघीच घरी असायच्या. असेच दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे जात होती. घरात अजूनही पाळणा हलत नव्हता. म्हातारा ही आता पार खचून गेला होता. त्याला आता पहिल्या सारखं शेतीचं काम होत नव्हतं. घरचं दूषित वातावरण ही सतत म्हाता-याच्या जिव्हारी लागत रहायचं. कारण इतकी वर्षे होऊन ही सूनबाई अजूनही म्हातारा म्हातारीला आपलं मानत नव्हती, वाईटसाईट काही बोलायची नाही, पण आपुलकीनेही वागवत नव्हती. फक्त आपला नवरा आणि आपण, यातच काय ते तिचं सुख सामावलं होतं. कधीतरीच म्हातारा म्हातारी सोबत जेवायची, नाहीतर फक्त आणि फक्त नव-याच्या वाटेला डोळे लावून बसायची. म्हातारा म्हातारी टिव्ही पाहत असले की सूनबाई पहायची नाही, ते ज्या खोलीत असतील तिथं बसायची नाही, म्हाता-याने आवडीने काही खायला आणलं की खायचं नाही किंवा काही विचारलं तरी नीट उत्तर द्यायचं नाही. यातून म्हातारा म्हातारीला आता एक गोष्ट लक्षात आली होती की, या घरासारखेच आपणही आता अडगळ झालो आहोत. आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, हा विचार म्हातारा म्हातारीला स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून मग एकदा म्हाता-याने पोराला विचारलं की, हे घर पाडून, एखादं बॅंक प्रकरण करून, इथं नवीन घर बांधूयात का.? पण पोरानं साफ नकार दिला. कोण ते हफ्ता-व्याज भरत बसणार आणि इथं या तुटपुंज्या जागेत नवीन घर बांधून उपयोग तरी काय.? त्यापेक्षा शेत विका आणि कुठंतरी जागा घेऊन मस्त ऐसपैस घर बांधा, तिथं आपण सगळे मिळून सुखाने राहू. बापजाद्यांपासून चालत आलेली, रक्ताचं पाणी करून कसलेली, जपलेली शेती विकण्याबद्दल पोरगा किती सहजपणे बोलून गेला, हे म्हाता-याच्या खूप जिव्हारी लागलं. आता हळूहळू पोरगा ही तुसडेपणाने वागू लागला होता. सुट्टी दिवशी पोरगं आणि सूनबाई दोघेही लवकर उठून, पटापट आवरून कुठेतरी निघून जायचे. जाताना काहीही सांगायचे नाहीत. रात्री अकरा बारा नंतर परतायचे. आता अधेमध्ये हे सतत असं होत होतं. हवंहवंसं वाटणारं ते आता हळूहळू म्हातारा म्हातारीला नकोनकोसं वाटू लागलं होतं. यातच म्हाता-याला एकदा पॅरेलिसिसचा झटका येऊन गेला. उगाच दैव बलवत्तर होते म्हणून आणि लागलीच योग्य औषधोपचार केला गेला म्हणून म्हातारा चालता फिरता झाला, नाहीतर कायमस्वरूपी अंथरूणाला खिळला असता. त्या आजारपणात ही सूनबाई खूपच कोरडी वागत होती. म्हातारा म्हातारी मनाने अजून जास्तच खचत चालले होते. अशाच एका सुट्टीच्या दिवशी नेहमीप्रमाणे न सांगता पोरगा आणि सूनबाई निघून गेले. तेव्हा दुपारच्या वेळी जेवण आवरून म्हातारा म्हातारी बाहेर अंगणात हवेला बसले होते. शेजारच्या एका पेरूच्या झाडावर चिमण्यांची चिवचिव सुरू होती. पुरेपूर पिकून खाली पडलेल्या एका पेरूचा वास आजूबाजूला पसरला होता. आजूबाजूच्या घरातून ही दुपारची जेवणाची भांडी धुण्याचा आवाज कानावर येत होता. तेव्हा म्हातारी सहज बोलून गेली की, अहो.. ऐकलंत का, काही सांगायचं आहे तुम्हाला. पटलं तर हो म्हणा, पण जास्त रागावू नका आणि मनाला ही लावून घेऊ नका. म्हाता-याने होकारार्थी मान हलवली. शेती विकून टाकूयात आता आणि पोराला आणि सूनबाईला हवं तसं, त्यांच्या मनासारखं करुयात. म्हातारा काहीच बोलला नाही, फक्त हो म्हणाला याचं म्हातारीला खूप आश्चर्य वाटलं. म्हातारा लगेचच आत जाऊन झोपला. लागलीच पुढल्या सकाळी म्हाता-याने याबद्दल पोराला सांगितलं. हे ऐकताच पोराचा आणि सूनबाईचा चेहरा आनंदाने खुलला. खूप दिवसांनी सूनबाईला आणि पोराला असं आनंदी पाहून म्हातारा म्हातारीलाही खूप बरं वाटलं. त्या रात्री कित्येक वर्षांनी चौघे एकत्र जेवले. कित्येक वर्षांनी म्हातारा म्हातारीला सुखाची झोप लागली होती. शेवटी शेताच्या एका तुकड्याचा व्यवहार झालाच मग. तेव्हा ही पोरगा कुठेच नव्हता. म्हातारा एकटाच धडपडत होता. गावाबाहेर ऐसपैस जागा घेतली. बोअर मारली. बांधकाम ही सुरू झालं. मध्यंतरी सूनबाईला दिवसही गेले होते. शेताचा तुकडा विकल्यापासून सूनबाई आणि पोरगा दोघेही खूप प्रेमाने वागत होते. त्यामुळे आता इथून पुढे तरी सगळं काही नीट पार पडणार आहे, या विचाराने म्हातारा म्हातारी खूप खुश होते, आणि खूप जोमाने नवीन घर बांधण्यात हरवून गेले होते. माझ्या पोराच्या सुखासाठी एक एकर काय, जर माझी शंभर एकर जमीन असती, तर मी तीसुद्धा विकली असती, असं म्हातारा सतत म्हातारीला म्हणत होता.
इकडं घराचं बांधकाम पुर्ण होत आलं होतं आणि तिकडं सूनबाईची डिलीव्हरीची तारीख ही जवळ आली होती. आणि मग एके दिवशी 'लक्ष्मी' घरी आली. बाळंतपण वगैरे सगळं काही सुखरूप पार पडलं. आता बारसं, जावळं वगैरे सगळं काही नवीन घरात अगदी धुमधडाक्यात साजरं करायचं, असं म्हाता-याचं ठरलं. म्हाता-याचा हट्ट होता की, गावातील घराप्रमाणेच इथंही एकच चूल मांडू, पण का कुणास ठाऊक म्हाता-याच्या पोराने ऐकलं नाही. तसा म्हाता-यानेही जास्त विरोध न करता, पोराच्या मनाप्रमाणे सारं बांधकाम केलं. कारण ही सगळं खटपट शेवटी कुणासाठी, आपल्या पोटच्या पोरासाठी, त्याच्या सुखासाठीच ना, असा विचार म्हाता-याने केला होता. शेवटी एकदाचं नवीन घर बांधून पुर्णपणे तयार झालं होतं. ते माणसांची वाट पाहत होतं. पण का कुणास ठाऊक, सूनबाईंनी अचानक हट्ट धरला की, मला अडीच तोळं सोनं घेतलं तरच मी नवीन घरात येणार, नाहीतर कधीच येणार नाही. थोडे पैसे शिल्लक होतेच आणि म्हाता-याने मिलमध्ये कामाला असताना आपल्या नावावर केलेली एक एफडी मोडून सूनबाईंचा तो हट्ट ही पुर्ण केला. सूनबाई नवीन घरी आल्या. नवीन घरी बाळाच्या रूपात लक्ष्मीही आली. सगळं काही सुखाने सुरू होतं. पण मुलाने मांडलेल्या दोन चुली अजूनही म्हातारा म्हातारीला रूचत नव्हत्या. आता पुन्हा हळूहळू सूनबाई आणि पोरगा पहिल्या सारखं तुसडेपणाने वागत होते. समोरून आले गेले तरी बोलत नव्हते, विचारत ही नव्हते. आता ते लहान बाळं जवळपास पाच सहा महिन्याचे झाले होते, पण या इतक्या दिवसात फारतर पाच सहा वेळाच त्या बाळाचं तोंड पाहण्याचं सुख म्हातारा म्हातारीला लाभलं होतं. आपलं नेमकं काय चुकलयं, सूनबाई आणि पोरगा आपल्याशी असं का वागतात, हा एकच प्रश्न म्हातारा म्हातारीला सतत सतावत असायचा. पण आपल्या शिवाय का असेना, पण सुखी आहेत ना, यातच ते आपलं सुख मानायचे. पण एकटं एकटं रहायचं तरी किती आणि करून खायचं तरी किती.? आपण हे सगळं याचसाठी केलं होतं का.? हा प्रश्न सतत आ वासून पुढे उभा राहिलेला असायचा. आता जवळपास ५ वर्षांची झालीय ती गोंडस परी. आजी आजोबा म्हणजे काय हे जवळपास माहीतच नाही तिला. ५ वर्षांची झाली ती, पण एकदाही आजी आजोबाच्या अंगाखांद्यावर खेळली नाही, तिला खेळवत असताना अंगावर हगली-मुतली नाही. हे असं आठवलं ना की, कधी कधी वाटून जातं की काय उपयोग या म्हातारपणाचा.? अजूनही दररोज फक्त तिचं हसणं बोलणं ऐकू येत अधेमध्ये, आणि सकाळी शाळेला जात असताना, पायरीवर बसलेल्या आम्हां म्हातारा म्हातारींकडे पाहणारी तिची अनोळखी नजर..!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#आईबाप