प्रिय..
काल खूप दिवसांनी अचानक आमची भेट घडून आली.
प्रथमतः तर मी त्याला ओळखूच शकलो नाही. त्याचा लूक पुर्णपणे बदलला होता. म्हणजे तो काही वर्षांपूर्वी जसा होता ना, तसाच आत्ता दिसत होता. काळेकुट्ट चकचकीत पॉलिश केलेले बूट, कडक इस्त्री आणि इन. शर्टाच्या वरच्या खिशाला नेहमीप्रमाणे एक लेक्सी बॉलपेन. पण तो फक्त दिसायला तसा दिसत होता, चेह-यावर तीच ती निराशा अजूनही तग धरून होती, अगदी तशीच. त्याला थांबवायला आणि बोलतं करायला मी चहाच्या टपरीवर घेऊन गेलो.
चहाचा घोट घेत घेत आमच्या किरकोळ गप्पा सुरू झाल्या. तितक्यात सहज काही वेळापूर्वी त्याच्या शर्टाच्या खिशातील बॉलपेन मागे दिसलेला एक घडी घालून ठेवलेला कागद आठवला. मी अगदी बिनदिक्कत विचारलं, ते खिशात काय आहे रे.? तसा तो आधी खूप खूप हसला आणि मग म्हणाला की, माझं बोलणं ऐकून तू सुद्धा खूप खूप हसणार आहेस, म्हणून मला हसू येत आहे. तसा तो म्हणाला की, पत्र आहे हे. त्यावर मी म्हणालो की मोबाईल आणि ई-मेलच्या जमान्यात कुठं या कागदात अडकून पडला आहेस. त्यावर तो म्हणाला की,
अरे...
खरंतर पत्रांचीच दुनिया बरी होती,
भावनांची जाण तेव्हा खरी होती.!
हे ऐकून मी निशब्द झालो. तितक्यात त्याने ते खिशात घडी घालून ठेवलेले पत्र माझ्या हातात टेकवले, आणि वाच म्हणाला. मी ना नू करणार तेवढ्यात तो बोलला की, तुझ्यापासून काहीही लपलेलं नाहीये, त्यामुळे तू अगदी बिनधास्त वाचू शकतोस.
आणि मग मी ते पत्र वाचायला सुरुवात केली,
प्रिय..
तुला असं संबोधायचा हक्क मला आहे का नाही, हे खरंतर तूच ठरवायचे आहेस. तरीही मी तुला 'प्रिय' म्हणतो. कारण तो अधिकार मला कधी मिळेल की नाही, ते मला ठाऊक नाही. आणि मला नेहमीच वाटत आलंय की, तुझ्यावर प्रेम करणा-यांच्या यादीत माझा शेवटून पहिला नंबर आहे, आणि मी कायमच शेवटी राहणार, तरीही no problems, no complaints, no demands.! शुद्ध दोस्ती झिंदाबाद..!! आणि मी तुला प्रिय व्हावं, यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे, हे मी तुला विचारूनही तू मला कधी काही सांगत नाहीस, आणि माझं मलाही ते कळत नाही, म्हणूनच प्रिय......
याआधीही मी बरेचदा तुला पत्र पाठवत आलोय, पण हे पत्र तुला नक्कीच काहीसं वेगळं वाटेल.
खरंच..
कित्ती ओळखीचे आहोत आपण,
तरीही किती अनोळखी वागतो आपण.!
आजच्या या पत्रास कारण की,
तू नेहमीच म्हणतेस की,
तू नाही आलास..,
मी आलीये तुझ्याकडे.!
पण तूच सांग की, इतकी वर्षे मी तुला पहायला,
तुझ्याशी बोलायला, तुझ्या घराजवळ आणि जिकड तिकडं तुझ्या मागे मागे फिरताना, कधीच मला तसा अपेक्षित प्रतिसाद न तुझ्या वागण्यातून दिसला, किंवा तुझ्या नजरेत ही नाही दिसला. हां.., असंही झालं असेल की मी तुझी नजर ओळखू शकलो नसेन. पण एक सांगू,
मी हाफ चड्डीत फिरायचो तेव्हापासून, मला तुला पहायची असलेली ओढ, तुझ्या मागे मागे फिरायची सवय इतक्या सहजपणे बंद करणं तेव्हा मलाही खूप जड गेलं होतं गं.
तू पहिल्यांदा रागावली होती, तेव्हा काही विशेष वाटलं नाही, हे नॉर्मल आहे असं वाटलं. पण पुन्हा एकदा दोनदाही असंच झालं, तेव्हा मला लय वाईट वाटलं.
इतकी वर्षे तुला माझ्याकडून नकळतपणे किती त्रास झाला असेल, हा विचार मला खूप त्रास देत होता.
तुला तर माहीतच आहे, जेव्हा तू मला शेवटचं रागावलसं, तेव्हा पासून मी हळूहळू तुझ्या घराकडे येणं, तुला दिसणं, तुझ्या मागे फिरणं सगळंच बंद केलं होतं, आणि जर कधी तू समोरून येताना दिसलीस तरी लगेचच मी मागे फिरत होतो, किंवा रस्ता बदलत होतो. हे सगळं करताना मला किती त्रास व्हायचा ते माझं मलाच ठाऊक. मी हे असं वागत असताना एखादा मित्र म्हणायचा की, अरे.., बिनधास्त मागे लाग रे, कधीतरी हो म्हणेलच ती, पण का कुणास ठाऊक माझं मन धजावत नव्हतं. आणि एखादा मित्र म्हणायचा की, काही गोष्टी/व्यक्ती या फक्त आठवणीत जपायच्या असतात. मग म्हणून मी तुला आठवणीत जपायचा पर्याय स्वीकारला.
पण खरंच हे असं वागणं माझ्यासाठी सोप्पं नव्हतं गं.
तुला माहित आहे की नाही ते माहीत नाही, पण कित्येक वेळा मी तुला दिसायला नको, म्हणून तुझ्या घरची वाट टाळण्यासाठी, त्या झन्न्यासाहेब दर्गाच्या रस्त्यावरून येऊन, माने बाईंच्या बोळातून, त्या बीबी मावशीच्या कच-याच्या ढिगातून ये-जा करायचो. तेव्हा सगळे विचारून थकले की, असा इकडून घाणीतून आणि एवढं फिरून का येतोस, पण त्याचं उत्तर तेव्हाही कुणाला मिळालं नाही, आणि आजतागायत माहीत ही नाही.
खरंच.. सोप्पं नव्हतं गं हे सगळं माझ्यासाठी.!
मी त्या छोट्याशा शुभमशी मैत्री केली होतीच,
बोलता बोलता मी त्याच्याकडून तुझे हालचाल माहीत करून घ्यायचो. तुझ्या संपर्कातील कुणीही व्यक्ती दिसली, तरी मला तू आठवायचीस आणि दिसायचीस. तेव्हा मला माझंच खूप हसू यायचं. हळूहळू दिवस पुढे जात होते, पण मला Move on करायला जमत नव्हतं, आणि अजूनही जमत नाहीये. कॉलेजमध्ये मुलींशी बोलताना मी पहिल्यांदा 'शुद्ध मैत्री' ही अट ठेवून मगच पुढे जायचो. तुझ्यापासून लांब झालो, तेव्हा मला नेहमी वाटायचं की, जर तुझा विचार सोडून देऊन मी दुसऱ्या कुठल्या मुलीच्या मागे लागलो, तर मग माझ्या तुझ्यावरील असणा-या प्रेमाला अर्थ तरी काय.? आणि मग जेव्हा कधी तरी तुला कळेल की माझं अमुक मुलीसंग, माझं तमुक मलीसंग, तेव्हा तुला काय वाटेल, या विचाराने दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही, आणि आजही असं काही मनात आलं की वाटून जातं की, तुला काय वाटेल.
मला अगदी शेवटपर्यंत लग्नही करायचं नव्हतं गं,
पण आई वडिलांचा हट्ट आणि पै पाहुण्यांच्या दबावापुढे मी हतबल झालो. आई-वडिलांना माझ्या जबाबदारीतून मुक्त झालेलं मला पहायचं होतं. लग्न करतानाही मी विनाअट लग्न केलंय. रंग,रूप, शिक्षण काही बघितलं नाही, पाहिलेल्या प्रत्येक मुलीला जागेवर होकार देत होतो. अजूनही आठवतोय मला तो दिवस. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मी शेवटचं स्थळ पहायला गेलो होतो, आणि नेहमी प्रमाणे जागेवरच होकार दिलो होतो, आणि लगेचच काही दिवसांत माझं यादी पे शादी लग्नही झालं होतं. मी तिथं मंडपात उभा असतानाही, तिच्यासोबत त्या अग्नीला साक्षी मारून फे-या मारत असतानाही, तुझाच विचार मनात येऊन जात होता. तिथं नकळतपणे तुझ्या आठवणींशी माझं लग्न झालं, आणि साताजन्माचं आठवणींचं नातं आणखीनच घट्ट झालं. तिथून निघताना ती तिच्या आई-वडिलांना बिलगून ढसाढसा रडत होती, आणि मी आतल्या आत तुला आठवून रडत होतो.
लग्नाच्या नंतरही बरेच दिवस ती आजारी होती. आमच्या लग्नाच्या बेडवर सगळ्यात आधी तिचं आजारपण गेलंय, ते पण जवळपास दीड दोन महिने. ती बरी झाल्यावरही मी तिला कधी आततायीपणाने स्पर्श केला नव्हता. मग तीनेक महिन्यांनी, एका रात्री, ती स्वतःच म्हणाली की, माझी तब्येत आता पुर्णपणे बरी आहे, तुम्हाला काही करायचे असेल तर करू शकता, आणि मी काही बोलण्याआधीच ती माझ्यावर स्वार झाली. मग पुन्हा काही वेळ तो गडद असा काळभोर अंधार.! मी निपचित पडून होतो, अंधार असल्यामुळे तिच्या लक्षात आलंच नाही की, मी रडतोय. थोड्या वेळाने ती शांत झोपी गेली. मी रात्रभर तसाच जागा होतो.
खरंच... सोप्पं नव्हतं गं हे सगळं माझ्यासाठी.
Move on करून जगणं
खरंच सोप्पं नव्हतं गं,
एकतर्फी प्रेमात राहणं
खरंच सोप्पं नव्हतं गं,
मनातलं मनात ठेवणं
खरंच सोप्पं नव्हतं गं,
डोळ्यातलं पाणी लपवून हसणं
खरंच सोप्पं नव्हतं गं,
तुला इग्नोर करून जगणं
खरंच सोप्पं नव्हतं गं,
तुला लांबून लपून पाहणं
खरंच सोप्पं नव्हतं गं,
तुला न दिसता तुझी वाट पाहणं
खरंच सोप्पं नव्हतं गं.!
आणि तू नेहमी म्हणत असतेस की, तू नाही आलास, मी आलीये. पण खरंच तुझ्या पासून असं तुटकं तुटकं वागणं माझ्यासाठी सोप्पं नव्हतं गं..!
माझं पत्र वाचून झालं होतं. मी त्याला व्यवस्थित घडी करून ते परत केलं. दोन पाच मिनिटे दोघेही तसेच बसून होतो. मी काहीच बोलत नाहीये, म्हणून तो जागेवरून उठला, मी बसलेल्या जागेवरच मला मिठी मारल्यागत करून, तो तिथून निघून गेला. अजूनही मला काहीच सुचत नव्हतं, फक्त पत्राच्या शेवटी त्याने लिहलेले काही शब्द डोक्यात फिरत होते.,
"शेवटच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा आणि तुझाच.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#त्याच्या_मनातलं