पप्पा
माझ्या आईला आणखी दोन बहिणी, आणि या तिघींत एक भाऊ, म्हणजे माझा मामा. मी जसजशी मोठी होत गेली, तसतसं मला कळत गेलं की, हे माझ्या मामाचं घर आहे. म्हणजे मी माझ्या आईच्या माहेरी आहे. मला एक मोठी बहीण. तिचं नाव आदिती. ती ब-यापैकी चांगल शिकलीये आणि काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालंय. सरकारी नोकरीवाला नवरा मिळालाय तिला. तिच्या संसार वेलीवर आता एक गोंडस फुलंही आलंय आता. सगळं काही मस्त मजेत सुरू आहे.
कधी कधी आजूबाजूला पाहिलं की मला एकच प्रश्न पडायचा की, माझे वडील कुठे आहेत.? आणि माझ्या दोन्ही मावश्या ही, माझ्या आईप्रमाणे इकडे माहेरीच का असतात.? मी हळूहळू मोठी होत जात होते, तशी तशी कळत नकळत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे भेटत जात होती. मोठ्या मावशीचा नवरा लग्नानंतर काही वर्षांतच वारला होता, अणि तिला मुलंबाळं असं काही झालंच नव्हतं. मधली मावशी कित्येक वर्षांपूर्वी सासरी भांडून आल्यापासून परत नांदायला गेलीच नाही. मध्यंतरी तिचे सासू सासरे वारले, नवरा ही जिवघेण्या अपघातात सापडून ही बचावला, तरीही इकडील कुणीच तिकडं गेलं नाही, वा साधी विचारपूस ही केली नाही. सर्वात लहान बहीण म्हणजे माझी आई ही, पप्पांशी पटत नाही म्हणून मी पोटात असल्यापासूनच माहेरी येऊन राहिली होती. त्यामुळे पप्पा म्हणजे काय असतं, ते मला काहीच ठाऊक नव्हतं. दोनेक वर्षांपूर्वी मग एकदा पप्पांना भेटायचा योग आला. तेव्हा आई कित्तीतरी वर्षांनी तिच्या सासरी आणि मी पहिल्यांदाच माझ्या पप्पांच्या घरी आलो होतो. घरातून बाहेर पडल्यापासूनच आई एकसारखी रडत होती. मला वाटलं की खूप खूप वर्षांनी ती सुद्धा पप्पांना भेटणार आहे, म्हणून बहुतेक आनंदाने रडत असेल. मी एसटीच्या खिडकीतून दिसणारी पळती झाडे पाहण्यात हरवून गेली होती.
स्टॅंडवर उतरून हळूहळू आम्ही घराकडे जाऊ लागलो, हळूहळू आईचं रडणं आता खूपच वाढत जात होतं. ते पाहून माझ्या मनात विचार येऊन जात होता की, एकमेकांवर इतकं प्रेम होतं, तर मग इतकी वर्षे ही दोघं असं वेगवेगळं का राहिली असतील.? आईचे हे अश्रू नेमके कसले आहेत.? पश्चातापाचे की आणखी कसले.?
मी नवीन गावं, नवीन परिसर पाहण्यात हरवलेली होती. हे माझं गाव होतं, माझ्या पप्पाचं गाव. घर जवळ आलं तसं मला काहीच कळेनासं झालं. घराबाहेर माणसांची खूप गर्दी दिसत होती. त्या गर्दीतून वाट काढत आई आणि मी पुढे सरकलो. तिथं आत सोप्यात बायका एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. तितक्यात अचानक आईनं माझा हात सोडला आणि तिथं त्या बायकांच्या मध्ये शांत झोपलेल्या एका माणसाच्या अंगावर पडून ती रडू लागली. आजवर कधीच माझा हात न सोडणा-या आईने आज त्या शांत झोपलेल्या माणसासाठी माझा हात का सोडला.? हे मला कळत नव्हतं. त्या सगळ्या रडणा-या बायकांच्या आवाजाने आता नकळत माझाही हुंदका दाटून आला होता. माझ्या आईला पाहून अचानकच जोरजोरात रडारड सुरू झाली. आतापर्यंत गुपचूप उभ्या असलेल्या माणसांत ही कुजबुज वाढली. तिथं रडणा-या काही म्हाता-या बायका माझ्या आईकडे पाहत हाताची बोटं मोडत काहीतरी बडबडत होत्या. वाटोळं केलंस गं आमच्या घराचं.. वाटोळं केलंस.! असलं काहीतरी माझ्या आईला बोलत होते. त्या रडारडीतही माझं मन वाटोळं होणं म्हणजे काय.? याचा शोध घेत होतं. मी कुणाच्या काखेत होती ते माहीत नाही, पण मला त्या काखेत खूप आपलेपणा वाटत होता. असाच रडारडीत बहुतेक तासभर उलटला असेल. अचानकच माणसं पुढं सरकली आणि त्या मध्ये शांत झोपलेल्या माणसाला खांद्यावर उचलून कुठेतरी घेऊन गेली. मला वाटलं की एखाद्या चौकातून वगैरे फिरवून माघारी येतील, पण खूप उशीर झाला तरी कुणीच आलं नाही.
त्या शांत झोपलेल्या माणसाला खांद्यावरून बाहेर घेऊन गेल्यापासून आता तिथल्या रडारडीची जागा शिव्याशाप आणि प्रचंड अशा तणावाने घेतली होती. माझा मामा आणि आई ही हातवारे करत कायबाय बडबडत होते, आणि समोरून तसाच काहीसा प्रतिसाद येत होता.
माझी आई घरात जायचा प्रयत्न करत होती, पण तिला अडवलं जात होतं, आणि मामा तर चक्क दोन तिन मुलं आणि एका वयोवृद्ध व्यक्तीसोबत धक्कामुक्की करत होता.
अचानक मामाने मला त्या उबदार आणि आपलेपणा वाटणा-या काखेतून ओढून घेतलं, आणि माझ्या आईच्या हाताला धरून झपझप पावलं टाकत तिथून बाहेर पडला. आता मी मामाच्या काखेत बसून तिथून परतताना माझं, माझ्या पप्पाचं घर डोळ्यात साठवून घेत होते, पण मनात सतत एकच प्रश्न येऊन जात होता की, आपला पप्पा आपल्याला का भेटला नाही.? आपल्या आईला का भेटला नाही.? त्यानं आपल्याला मायेने जवळ का घेतलं नाही. ? पप्पा कुठेच का दिसला नाही.? तो नेमका कसा दिसतो.? माझी आई इतकी का रडत होती.? माझ्या आईनं कुणाचं वाटोळं केलं.? ते वाटोळं म्हणजे काय असतं.? असे कितीतरी प्रश्न मनात घेऊन मी माझ्या, माझ्या पप्पांच्या गावचा निरोप घेतला.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ