चप्पल
पप्पाची तुटलेली #चप्पल पाहिली की, माझ्या मनात नकळत बालपणीचे ते दिवस डोकावून जातात. तेव्हा उन्हाळा असो, हिवाळा असो, वा पावसाळा, पॅरेगॉनची शीरपल, म्हणजे स्लीपर चप्पल म्हणून ठरलेली असायची. चप्पल म्हणजे शीरपल, हे गणित तेव्हा मनात फिक्सच झालेलं होतं. तेव्हा ही चप्पलच्या किंमती आत्ताप्रमाणेच आडमाप असायच्या. त्यावेळी कधी कधी तर त्या ४९/- रूपयांच्या शीरपल मध्ये अखंड वर्ष काढावं लागायचं. या दिवाळीला घेतलं की, थेट पुढल्या दिवाळीलाच. त्या शीरपलमध्ये तसा फक्त हिवाळाच सुसह्य वाटायचा. कारण उन्हाळ्यात त्या शीरपलचा तो रबरी पट्टा जिथं त्वचेच्या संपर्कात यायचा, तिथं फोड उठायचे. आणि ते फोड फुटले की मग चालताना खूप त्रास व्हायचा. कधी कधी तर जखमाही व्हायच्या. आणि पावसाळ्यात तर चिटक्या उडून उडून मागील बाजूने कपडे चिखलाने पुर्ण माखून जायचे. पावसाळ्यात कधी कधी शाळेतून घरी परतताना शीरपल नकळत पायातून निसटून पाण्यातून वाहत जायचं. मग त्या वाहत जाणाऱ्या चप्पलामागे धावताना, मनात बॅकग्राऊंडला जेम्स बॉण्डचं #संगीत सुरू असायचं. अशावेळी खरी पंचाईत तर तेव्हा व्हायची, जेव्हा चप्पल वाहत गटारात जायचं, आणि मग पुढं एखादा मोठा पाईप आला की भीती वाटायची की, आपलं चप्पल यातून pass होऊन पुढे येईल,? की आतच अडकून बसेल.? पण सुदैवाने चप्पल कधीच पाईपात अडकली नाही. तसं ते शीरपल टिकायला खूप मजबूत ही होतं म्हणा. पण कधी कधी पट्टा तुटला की अवघड व्हायचं. तेव्हा फक्त पट्टाही विकत मिळायचा, पण तो सुद्धा चप्पलच्या निम्म्या किंमतीत. म्हणून मग कधी कधी घरच्या घरी खजूरी दोरा म्हणजेच वाकळी दो-याने शिवायचं, किंवा आईकडून एखादी टाचणी घेऊन, चप्पल आणि पटट्याची बळजबरीने युती घडवून आणून, दिवाळीची वाट पाहत बसायचं. अशावेळी कधी कधी मी पप्पांच्या माघारी आईला बोलायचो की, आई.., नवीन शिरपल घेऊया की गं.? त्यावेळी #आई मला पप्पांची जुनाट झालेली, तुटका अंगठा वगैरे शिवून वापरत असलेली चप्पल दाखवायची, आणि ते पाहून मी आपसूकच गप्प बसायचो, आणि घरात आईची चप्पल आजवर कधीच का दिसली नाही, या विचारात हरवून जायचो.!🎭
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा