फोडणी
शिळा भात थंडीने कुडकुडत, आपापल्या शीत भावांना गच्च पकडून, उबीच्या शोधात दगडासारखा झाला होता. हात सैन्यातील ५ प्रचंड सामर्थ्यवान सैनिकांना पाठवून त्यांना एकमेकांपासून विलग केलं. मग नुसता आकांडतांडव आणि एकच आक्रोश उठला. शीत भावांना गलबलून आल्यानं हळूहळू सगळीकडे पाणी पाणी होऊ लागलं. तितक्यात त्या ५ प्रचंड सामर्थ्यवान हात सैनिकांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला. भात शीतभावांची तशी अवस्था पाहून कांदाही लागलीच रडू लागला. बुडाखाली लागलेल्या आगीनं कढईची भूक कधीपासून उकळ्या मारत होती. हात सैन्याचा निषेध म्हणून मोहरी आणि कढीपत्ता यांनी प्राणाहुती दिली. भाताच्या आयुष्यातील शेवटचा क्षण तरी रंगीबेरंगी व्हावा, म्हणून हळदीने मुक्तहस्ते स्वतःला उधळून लावलं. शेवटी कोथिंबीरीने आपलं मनोगत व्यक्त केलं, आणि शिळ्या भाताचा, रंगरंगोटी केलेला शेवटचा प्रवास सुरू झाला.!🎭
#आयुष्य_वगैरे