उटणं
घरी नेहमीप्रमाणे सर्वात आधी #आई जागी झालेली असायची. सगळं काही आवरून अंगणात सडा शिंपून, तिनं अंगणात जमेल तशी, जमेल तितकी काढलेली #रांगोळी पाहून क्षणभरासाठी अंगणात #इंद्रधनुष्य पडल्याचा भास व्हायचा. तुळशी जवळ लावलेली एक छोटीशी पणती जणू उगवत्या सुर्याशी स्पर्धा करतेय असं वाटायचं. हळूहळू आईची प्रेमळ हाक कानावर येऊ लागायची. मग झोपेतून कधी जागा झालो, आणि कधी त्या चुलीपाशी येऊन बसलो काहीच कळत नसायचं. कधीपासून हाताच्या तळव्यावर एकटी पडलेली कोलगेटची पावडर बोटाच्या प्रतिक्षेत असायची. घरभर पसरलेला धूर पाहून वाटून जायचं की मी स्वप्नात तर नाही ना. तेव्हा त्या चुलीतल्या धुरालाही दिवाळीचं किती कौतुक वाटायचं ना. तो धूरही नकळतपणे घरभर इकडे तिकडे पळत असायचा. इकडं पाणी तापत असताना एकुलती एक चुलत #बहीण तेलाची वाटी घेऊन वाट पाहत उभी असायची. दात घासून झालं की मग तिच्या समोर जाऊन, रांगोळी काढलेल्या एका पाटावर उघडाबंब होऊन बसायचं. #थंडी तर खूप वाजायची, पण आईसमोर काहीच चालायचं नाही. मग बहीण सर्वांगाला तेलाने मालिश करायची. किती मस्त वाटायचं. हे आवरलं की सर्वात आधी बहीणच दोन तीन तांबे पाणी अंगावर ओतायची. मग त्यानंतर आई मोर्चा सांभाळायची आणि घासून पुसून आंघोळ घालायची. त्यावेळी डोळे मिटून शांतपणे गप्पगुमान बसल्यावर एक गोष्ट जाणवायची की, या चुलीतल्या जळणा-या सरपणाचा #वास नकळत या पाण्यालाही लागला आहे. हे एक प्रकारचं उटणंच, आणि या उटण्याच्या सुवासाला खरंच तोड नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा