अंतरपाट

सकाळी साडे अकराच्या सुमारास तो कोर्टात येऊन बसला होता. त्याच्या कामाचा नंबर येण्याआधी दुसऱ्या एका कामाचा cross सुरू होता. Cross, बोर्ड, मेहेरबान, या व  अशा अनेक वकीली शब्दांचा, त्याला तसा फारच कमी परिचय, पण गेल्या काही वर्षांत महिनाकाठी दोन तीनदा इथं येऊन, हे असे शब्द आता त्याला परिचयाचे झाले होते. जवळपास अर्ध्या पाऊण तासाने, तो सुरू असलेला cross संपला. मग दहा एक मिनिटं गेली असतील, तितक्यात उशिरापासून शांत बसून असलेले त्याचे वकील साहेब जागेवर उभे राहिले. सर्वात आधी त्यांनी अदबीने न्यायाधीशांना अभिवादन केलं, आणि लागलीच तिथल्या शिपायाने त्याच्या बायकोच्या नावाने आवाज दिला. तशी ती लगेचच पिंजऱ्यात येऊन उभी राहिली. तिला तिथं तसं उभं पाहून क्षणभरासाठी त्याच्या मनात खूप काही येऊन गेलं, आणि त्याला जुने दिवसही आठवून गेले. तो भूतकाळात हरवणार तितक्यात वकील साहेबांच्या आवाजाने तो भानावर आला. वकील साहेब न्यायाधीश महाराजांच्या अगदी समोर थांबून, दाखल केलेलं म्हणणं पुन्हा एकदा नजरेखालून घालत होते. आजूबाजूला जमलेल्या सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे रोखल्या होत्या. आपापलं रडगाणं घेऊन कोर्टात आलेल्या आणि वर्षानुवर्षे कोर्टाचा उंबरठा झिजवणा-या कितीतरी जणांचा, बाहेर व्हरांड्यात बसून बारीक आवाजात बाजार भरला होता. मी इथं का आलो, तुम्ही इथं का आला, कोण चूक, कोण बरोबर, यासारख्या ब-याच गोष्टींवर तिथं कुजबुज सुरु होती.
तितक्यात न्यायाधीश महाराजांनी त्याच्या बायकोकडे पाहिलं, आणि तिला म्हणाले की, देवाशप्पथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही, अशी शपथ घ्या. त्याच्या बायकोने तशी शपथ घेतली, आणि पुढील कामकाजाला सुरुवात झाली. वकील साहेबांचा प्रश्न आणि त्या प्रश्नाला त्याच्या बायकोचे उत्तर, याने हळूहळू तो भुतकाळात हरवत जात होता. अगदी स्वप्नवत असा सुरू झालेला संसार, आणि मग अपेक्षा, अपेक्षाभंग, अहंकार यात विखरून गेलेलं कुटुंब, नाती आणि स्वप्नं.! अधेमधे त्याचं लक्ष डोक्यावर फिरणा-या पंख्याकडे जात होतं. तेव्हा त्या पंख्याचा कट्कट् कट्कट् असा येणारा आवाज त्याला सनईच्या सुरासारखा भासत होता. काळ्या कपड्यात आजूबाजूला उभे असलेले वकील वरातीतले बॅंडबाजावाले, समोर बसलेले न्यायाधीश महाराज भटजी, आणि पिंजऱ्यात उभी असलेली त्याची बायको, त्याला अंतरपाटापलीकडे उभी असल्याचे भासत होते. पण.., ते तर त्याचं दिवास्वप्नं होतं.!
अगदी खेळीमेळीत सुरू झालेलं कामकाज आता हळूहळू गंभीर होत जात होतं. वकील साहेबांच्या प्रश्नांची तीव्रता आणि त्यांचा aggressive approach वाढत चालला होता. वकील साहेबांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना, त्याच्या बायकोचा होणारा गोंधळ, त्याला खूप त्रास देऊन जात होता. आपल्या नजरेसमोर, आपली बायको अडचणीत असताना, आपण तिची मदत करू शकत नाहीये, या विचाराने तो कासावीस झाला होता. कौरव की पांडव.? दुर्योधन की युधिष्ठिर.? मी नेमका कोण, ते त्याला काहीच कळत नव्हतं. त्यातच अधेमधे त्याच्या बायकोची उत्तरं ऐकून, त्याला जुने दिवस आठवून जात होते. तर कधी तिचा खोटेपणा पाहून, ती अशी का वागते आहे,? अचानकच आपण तिला इतके नकोनकोसे का बरे झाले आहोत.? हे कोडं त्याला सुटत नव्हतं.
न्यायदान कक्षात सर्वात मागच्या बाकावर बसून, तो हे सगळं निमूटपणे पाहत आणि ऐकत होता. अधेमधे ती सतत त्याच्याकडे पाहत होती, कारण तिलाही माहित होतं की, खरं काय आणि खोटं काय.! नवरा बायकोचं भांडण हे जरी पेल्यातलं वादळ असलं, तरी त्या पेल्यातल्या वादळात बरेचदा आख्खं कुटुंब उध्वस्त होऊन जातं.
आता जवळपास पाच वाजयला आले होते. Cross जवळपास अर्धा निम्माच झालेला होता. म्हणून मग वकील साहेबांनी पुढील कामकाजासाठी जवळची तारीख मिळण्याची विनंती केली. एव्हाना न्यायाधीश महाराजांनाही विषय नेमका काय.? याची पूर्ण कल्पना आलेली होती. म्हणून त्यांनी निघून जाण्याआधी दोन्ही वकीलांना अजूनही काही तडजोड होऊ शकते का.? हे पहायला सांगितले. पण न्यायाधीश महाराजांचे ते शब्द ऐकताच, अगदी रागारागानेच त्याची बायको आत आली, आणि न्यायाधीश महाराजांना सांगू लागली की, आता मला नांदायला जाण्यात अजिबात रस उरला नाहीये. लवकरात लवकर काय असेल ती पुढील प्रोसेस करा, आणि आम्हाला यातून मोकळं करा. तिचं ते वाक्य ऐकताच कुणीही तिथं थांबलं नाही, आणि हळूहळू सर्व जण निघून गेले. वकील साहेब आणि तो, जिना उतरून लगेचच पार्कींगमधे आले. वकील साहेबांनी आपला कोट उतरविला, आणि गाडीच्या डिकीत ठेवला. त्यानंतर ते दोन मिनिटे त्याच्याकडे एकसारखं पाहत राहिले, आणि म्हणाले की, देशपांडे.., मला काहीच कळत नाहीये की, तुम्हाला भरपूर शिव्या द्याव्यात, दोन चार कानाखाली द्याव्यात, की तुमच्या बायकोप्रती तुमच्या असलेल्या प्रेमाला दाद द्यावी. फसलात तुम्ही, सोसताय तुम्ही, भविष्य आणि उरलीसुरली स्वप्नं, पणाला लावताय तुम्ही, तडजोड करायलाही तयार आहात तुम्ही, तरीही हे सगळं तुमच्या नशीबी का यावं.? आणि तुमचा वकील म्हणून नियतीनं मलाच का बरं निवडावं.? मला काहीच कळत नाहीये. तुमचा खटला माझ्याकडे आल्यापासून, इनमिन तीन वर्षांचा आपला परिचय, पण तुमच्या इतका व्यवहारी आणि प्रामाणिक माणूस मी अजून पर्यंत तरी पाहिला नाही. अगदी साचेबद्ध आणि वक्तशीरपणात बांधलेलं असं, अगदी अतिसामान्य असं, एका सामान्य माणसाचं तुमचं जगणं. आणि त्या सामान्य माणसाची, अगदी सामान्य अशी स्वप्नं. पण आपण एकच स्वप्नं पहावं, आणि तेही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी, नेहमीच भळभळत राहणारी जखम बनून जावं, यासारखं दुर्देव नाही हो देशपांडे. आणि हे दुर्दैव ज्याच्या नशीबी यावं,
ती दुर्दैवी व्यक्ती तुम्ही.!
किती सवयीचं झालं आहे ना आता, तुम्हाला हे जगणं.
आठवतंय मला, अगदी सुरुवातीला मला भेटलेले तुम्ही, आणि आताचे तुम्ही, यात खूप खूप फरक आहे. कारण आता तुम्ही खोटं हसायला, आणि मनातलं चेह-यावर न दाखवता, आतल्या आत दाबून ठेवायला शिकला आहात.!
देशपांडे, मला‌ माहीत आहे की, हे ही दिवस नक्कीच जातील.‌ पण एका गोष्टीचा मला नेहमीच, तुमच्यापेक्षा जास्त पश्चात्ताप वाटत राहिलं की, तुमच्या आयुष्यातील ते ऐन उमेदीचे दिवस, पुन्हा कधीच परत येणार नाहीत. आणि मी किंवा आणखी कुणीही, ते दिवस पुन्हा कधीही परत आणू शकणार नाही.!
#आयुष्य_वगैरे 🎭
#अडगळ
#तारीख_पे_तारीख

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..