ओढ
नेहमीप्रमाणे तुझा फोटो पाहत असताना आज सहज वाटून गेलं की, मी तुझ्या फोटोला जितक्या उशीरापर्यंत टक लावून पाहू शकतो अथवा पाहतो, तेवढं टक लावून, वा तेवढ्या उशीरापर्यंत आजतागायत एकदाही मी तुला पाहिलेलं नाही. बालपणापासून ते आपण तरूणपणात पदार्पण करेपर्यंत, हे असंच सुरू होतं. तुला चोरुन चोरुन पाहताना, फार फार तर फक्त दीड दोन मिनिटेच मी टक लावून पाहू शकायचो. कारण तेव्हा मनात ही एक भीती असायची की कुणीतरी पाहिलं तर, आणि दुसरी भीती म्हणजे तू अचानकपणे एकदमच माझ्याकडे नजर वळवली तर. पण तरीही तेव्हापासूनच मी तुला दररोज थोडं थोडं पाहत पाहत, माझ्या मनात साठवत होतो. का कुणास ठाऊक, पण माझ्या मनाचा कोपरा न कोपरा तू व्यापून टाकलेला असूनही, तुला पहायची माझी ही ओढ
अजूनही तशीच कायम आहे.!
हां.., पण जेव्हा आपण बालाजी मंदिरात भेटलो ना,
निदान तेव्हा तरी, एकदा का असेना, पण मी तुला खूप जवळून पाहिलं, आणि अनुभवलं ही. इतक्या वर्षात पहिल्यांदाच मी तुझ्याशी थेट बोलत होतो. लहानपणी आपण वंदना दी च्या क्लासमध्ये ब-यापैकी घोळका करून बसायचो, आणि वंदना दी आपल्या सर्वांच्या मध्ये बसायची. त्यावेळी नेहमीच मी तुझ्या समोरची, किंवा वंदना दी च्या अगदी समोरची जागा पकडायचो, जेणेकरून मला लपून छपून तुला पाहता येईल. तेव्हा ही तू इतरत्र पाहत असताना, वंदना दी शी बोलत असताना, माझी नजर तुझ्या डोळ्यांवरच खिळलेली असायची. एखाद्या बाहुलीच्या डोळ्यांगत तुझ्या डोळ्यांची होणारी उघडझाप पाहताना मला खूप मस्त वाटायचं. त्यातच तुझ्या उलटा यू कट केसांची, तुझ्या गो-या गो-या गालांना स्पर्श करण्याची स्पर्धा लागलेली असायची. त्यावेळी जेव्हा जेव्हा गालावर येणारे तुझे केस, तू हळुवारपणे कानाच्या मागे सारायची ना, तेव्हा चुकून तुझा हलकासा स्पर्श त्या कानातल्या रिंगांना व्हायचा, तेव्हा मला त्या रिंगांचा खूप हेवा वाटायचा. त्यादिवशी तुझ्या मागं मागं बालाजी मंदिरात फिरताना मला बालपणीचे हे जुने दिवस आठवून जात होते.
नकळत एखादं पाऊल पुढे टाकून तुझ्या जवळ येऊन मी तुला आणखी जास्त जवळून न्याहाळत होतो.
हां.., ही इतकीशीच आहे..,
हां.., ही इथं लागते आपल्याला..,
हां.., हिचे केस किती मुलायम आहेत..,
हां.., इथला हा मानेवरला तीळ कित्ती शोभतोय हिला..,
हां.., ही कित्ती कित्ती गोरीपान आहे,
आणि मी सावळा कावळा.!
#गंध_आठवणींचा