भेट तुझी माझी

तू इथं नाही, असं समजून मी इकडं तिकडं वावरत होतो. पण काल अचानकच तुझा फोन काय येतो, आपलं बोलणं काय होतं, मग पुन्हा खूप उशीरापर्यंत आपला मेसेज मेसेजचा खेळ, आणि तुझं ते खास माझ्यासाठी, त्या रिक्षावाल्याला रस्ता सांगत सांगत, नेमकं त्याच गल्लीबोळातून रिक्षा न्यायला लावणं, जिथं मी तुझी वाट पाहत उभा राहिलो होतो.! बरोबर ना गं.?
कित्ती भारी... एकदम फिल्मी स्टाईल. हे सगळं घडण्याआधी सगळं काही अगदी शांत शांत होतं, पण आता एखाद्या वादळात सापडलेल्या पालापाचोळ्यासारखी झालीय माझी अवस्था. अजूनही जमीनीवर नाहीच मी, काल रात्री तर झोपच येत नव्हती. एक दीड वाजता तुला मेसेज करून, तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं. आज पुन्हा एकदा किती जवळ होतीस तू माझ्या, नेहमी प्रमाणेच तुझ्या डोळ्यांत पाहत असताना तुझ्या चेहऱ्याकडे पहायचं राहूनच गेलं. ज्या कॉर्नरवर रिक्षा वळली ना, तेव्हा त्याच क्षणी, तिथंच सगळं काही कायमस्वरूपी थांबून जावं, असं वाटतं होतं. आज सुदैवाने तिथं ट्राफिकही खूप होतं, त्यामुळे मी रिक्षाच्या मागे मागे चालत येत होतो. रिक्षाच्या आरशात तुझा चेहरा शोधत होतो. तेव्हा कधी कधी त्या आरशात दिसणारा तुझा चेहरा आणि त्यावरच नटखट हसू पाहून मन सुखावून जात होतं. तुझ्या अंगावर कोणत्या रंगाचा ड्रेस होता, हेसुद्धा आठवत नाहीये, पण तू माझ्या समोरून गेलीस, हे मात्र माझ्या मनाला अजूनही खरं वाटतं नाहीये. आणि विषेश कौतुक आणि हेवा या गोष्टीचा वाटतोय की, हे सारं काही तू घडवून आणलसं, फक्त माझ्यासाठी, मी तुला डोळेभरून पहावं यासाठी, तुझ्या या वेड्याचं हे वेड जपण्यासाठी.!
#वेड 🌼🌼🌼
#गंध_आठवणींचा
#काल्पनिक_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..