Tattoo

आज महिन्याचा आणि वर्षाचा शेवटचा दिवस. सकाळपासूनच सगळीकडे संध्याकाळ कशी, आणि कुठे घालवायची, याच नियोजन सुरू होतं. मला माहित होतं की माझ्या घराला माझ्याशिवाय कुणीच नाही, म्हणून मी माझा 31st माझ्या घरासोबत साजरा करायचं ठरवलं होतं. तसा गेल्या काही वर्षांपासून माझा हाच बेत जवळपास ठरलेलाच, तोच यंदाही.!
माझं काम आवरल्यावर, दुपारच्या वेळी कोर्टासमोरून जात असताना, कोपऱ्यावरच्या टपरीवर मी नेहमीप्रमाणे चहासाठी थांबलो. हवेत तसा दिवसभर गारठा जाणवत रहायचा, त्यामुळे अधेमध्ये सतत चहा प्यावासा वाटायचं. टपरीवर गेल्यावर वडापाव खाल्ला नाही, असं कधीच होत नाही, म्हणून मग सोबतीला एक वडापाव घेतलाच. चहा आणि वडापावचे आमदार, तोंडाच्या विधानसभेत शपथविधीला जाणारच, तितक्यात मला ती‌ ओळखीची हाक ऐकू आली.
हो.. बरोबर,‌ तोच होता तो.‌ नेहमीच इथंच आसपास गाठ पडणारा. तो आला, बाजूला बसला, आणि मी त्याच्या बोलण्यात हरवून, आमच्या गप्पा टप्पा कधी सुरू झाल्या, ते माझं मलाही कळलं नाही. नेहमीसारखच त्याला सहज न्याहाळत असताना, मला त्याच्या उजव्या हाताच्या करंगळी आणि मनगटाच्या मधल्या भागावर काहीतरी लिहलेलं दिसलं. तसं लगेचच मी त्याला त्याबद्दल कुतूहलाने विचारलं. त्यावर पहिल्या प्रथम तो खूप हसला, आणि म्हणाला की, सर.., खरंच तुम्ही हे आज पाहिलं की माझी फिरकी घेत आहात.? कारण हे तसं फार फार जुनं आहे, आणि पहा ना, आता ते फिकट ही होत चाललं आहे. मग त्याबद्दल मी पुढचं काही विचारणारच, तितक्यात तो स्वतःच सारं काही सांगू लागला..
तिच्याशी कधीच, काहीच, स्पष्टपणे न बोललेला हा वेडा, एकदा तिचं नाव हातावर गोंदून घ्यायचं म्हणून टॅटूवाल्याकडे गेला होता. तिथं जात असताना ही माझ्या मनाची चलबिचल सुरूच होती. कारण मन सुध्दा दोन भागात विभागलं गेलं होतं. एक मन या खुशीत होतं की, आपल्या मनावर कधीचं‌ कोरलेलं तिचं नाव, आता आपल्या हातावर ही कायमस्वरूपी कोरलं जाणार. तर दुसरं मन म्हणत होतं की, उगाच कशाला ही उठाठेव.? तिला माहीत नसेलही कदाचित, पण आपल्या मनावर तर ती कधीपासून राज्य करतीच आहे, आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तीच तर आहे.! दुसरं मन पहिल्या मनाला खूप समजावत होतं, पण पहिलं मन काही केल्या ऐकत नव्हतं. तेव्हा दुसरं मन म्हणालं की, अरे.., तुझ्या शरीरात वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबाला जर बोलता येत असतं ना, तर त्या प्रत्येक थेंबानेही तिचंच हेच नाव पुकारलं असतं. तूच तर म्हणतोस ना की, आपण नेमके कसे आहोत, ते आपलं आपल्याला चांगलच ठाउक असतं, आणि देव सारं काही पाहत असतो. मग या गोष्टीचा विचार कर ना, की तुझ्या एकतर्फी प्रेमाला, तुझ्या आजूबाजूच्या सर्व सजीव-निर्जीव गोष्टी आणि तो ईश्वर ही साक्षीला आहे रे. त्याला सगळं ठाऊक होतं, आणि आहेच. आणि असाही विचार कर ना की, या गोष्टी कदाचित तिला आवडतच नसलीत तर.!
म्हणून ऐक माझं, असा वेडेपणा नको.!
काही गोष्टी आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवलेल्या ब-या असतात रे.! मग त्यातून मिळणारं सुखही आपलं, आणि दुःखही आपलं. हे सगळं ऐकून माझं पहिलं मन हळूहळू भानावर आलं, आणि त्याने निर्णय बदलला. तरीही तोपर्यंत तिच्या नावाची दोन अक्षरं गोंदवून झाली होतीच.
मी त्याच्या हातावरील त्या अर्धवट टॅटूला पाहण्यात हरवलो होतो, आणि नकळत तोही त्या दोन शब्दांवरून एकसारखा हात फिरवत होता. आता दिवस हळूहळू मावळतीकडे झुकू लागला होता. त्याच्या चेहऱ्यावर पडणारी मावळतीच्या सुर्याची ती सोनेरी किरणं, त्याच्या डोळ्यात नकळत दाटून आलेल्या आसवांना मोत्यांचं रूप देऊन जात होती.!🎭
#आयुष्य_वगैरे 
#अडगळ
#त्याच्या_मनातलं  

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..