वेताळ
दुपारची वेळ.
नेहमीसारखाच आजही तो अचानक गाठ पडला.
चला सर, चहा घेऊयात. असं म्हणून माझ्या हाताला धरून जवळजवळ ओढतच, त्याने मला त्या कोप-यावरच्या टपरीत नेलं. जेवून नुकताच अर्धा पाऊण तास झाला असला, तरी मला वडापाव खायचा मोह आवरता आला नाही. म्हणून मी चहासोबत वडापाव ही घेतलाच. माझ्या बाजूलाच तो नुसता चहा पीत बसला होता. तितक्यात मी त्याला सहज विचारलं की, मग.. आणि काय.? काय म्हणतंय नवीन वर्ष. यंदा काही नवीन संकल्प वगैरे. कसं वाटतं आहे नवीन वर्षात.? हे ऐकून आधी तो भरपूर हसला. थोड्या वेळाने पुन्हा एकदा चहाचा मोठा घोट घेतला, आणि दूरवर टक लावून, कुठेतरी हरवल्यासारखा बोलू लागला.
सर, एक सांगू, मराठी नववर्ष असो वा इंग्रजी नववर्ष,
तसा आता विषेश काही आनंद वाटत नाही हो. कारण आधीच ही सरूण जाणारी वर्ष, दिवसागणिक आयुष्यातील कित्येक वर्ष खाऊन जातात, आणि त्यात भर म्हणून आपण जिवंत आहोत तोपर्यंत भळभळत रहावी, अशी एखादी जखमही कधी कधी देऊन जातात. सरतेशेवटी शरीराला/मनाला जरी वेदना होत असल्या, तरीही विषेश काही वाईट वाटतच नाही. तशी इथं चूक ही तर सर्वस्वी आपलीच असते म्हणा, कारण आपण आपल्या आजूबाजूच्या इतर सामान्य माणसांसारखं, सामान्य आचारविचार अंमलात आणून जीवन जगू शकलो नाही. उगाच नको नको ती स्वप्नं बाळगत, आयुष्यभर त्यांच्यापाठी धावत राहिलो. या सगळ्या विचारात हरवून कधी कधी मागे पाहत असताना खूप त्रास होतो. सर, तेव्हा वाटतं की, बस्स झालं आता.! आता आणखी पुढे जायला नको, इथून मागे परतूया. पण तेव्हाही मन सांगत की, अरे वेड्या..
आता फार पुढे निघून आला आहेस तू. इथून मागे फिरून, जिथून सुरूवात केली होती, पुन्हा तिथेच पोहचायचे असं ठरवलसं, तर ते कदापि शक्य होणार नाही. तो प्रवासही बहुतेक निम्म्यातच संपेल रे कदाचित. मनाचं हे असं सांगणं ही बरोबरच तर आहे ना हो सर.! जे काही उर्वरित आयुष्य राहिलयं, ते किती आहे माहीत नाही, मग उगाच पुन्हा मागे जाऊन गुंता का वाढवावा.? वेड्या जीवाला आणखी त्रास तरी किती द्यावा.? मग अशावेळी नकळत विचार येऊन जातो की, किती बाकी आहे, ते काही माहीत नसलं तरी, जे आत्ता शेष आहे, तेच विषेशच आहे.! मग हळूहळू मन, नव्या उमेदीने पुन्हा भरारी घेऊ लागतं. वर्षात मोजताना कमी वाटणारं आयुष्य, दिवसांत, तासांत, मिनिटांत, सेकंदात मोजलं तर कित्ती कित्ती मोठ्ठं होऊन जातं. सर, कुठला दिवस, तास, क्षण, शेवटचा आहे, ते काही माहीत नाही. म्हणून मी कितीही नैराश्य आलं, कितीही वाईट वाटलं, तरीही शक्य तितकं आनंदाने जगायचा करतो. आणि सर, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये.! हे जरी खरं असलं ना, तरी ती जिंदगी बडी होण्यासाठी, आपल्या वाट्याला येणारे छोटे मोठे आनंदाचे, दुःखाचे क्षणही सेलिब्रेट करता यायला हवं.! बरोबर ना हो सर.!?
इतकं बोलून तो शांत झाला. पुढे काय बोलावं, ते मला काहीच सुचत नव्हतं. त्याची ही अशी अचानक होणारी भेट, मला नेहमी विक्रम वेताळाच्या गोष्टीची आठवण करून देते. पण त्या गोष्टीत वेताळ विक्रमाला बोलतं करायचा, आणि हा वेताळ नेहमीच मला निशब्द करून जातो.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#त्याच्या_मनातलं