एक क्षण पुरे प्रेमाचा..?? 💔
बाळांनो..,
सात जन्म साथ देण्याच्या आणाभाका घेऊन,
तुम्हाला आता जवळपास सात वर्षे व्हायला आलीत. त्यातही तुमची गेली तीन वर्षेही, कोर्ट कचेरीच्या हेलपाट्यातच गेली आहेत. यादरम्यान कोर्टाने कित्तीतरी वेळा मध्यस्थी केली, तरीही तुमच्यात समेट होत नाहीये. म्हणून अगदी हताश मनाने, एक शेवटचा प्रयत्न म्हणून आज हे कोर्ट तुम्हाला सांगत आहे की, पुन्हा एकदा निदान सात आठवडे तरी तुम्ही दोघांनी एकत्र राहून पहा. झालं गेलं ते गंगेला मिळालं असं समजून, जुनं सारं काही विसरून, एकमेकांच्या वागण्यात काही बदल जाणवतो आहे की नाही, ते पहा. मग आपण पुढील निर्णय घेऊयात.
बाळांनो, आम्ही इथं संसार तोडायला बसलेलो नाही आहोत. कित्ती छोटीशी गोष्ट आहे रे. समजून घ्या, विचार करा.!
बाहेर व्हरांड्यात थांबून, मी हे सारं काही ऐकत होतो. हे ऐकत असताना लग्न, सात जन्म, आणाभाका हे सगळं काही अगदी गौण वाटत होतं. प्रेमाचा एक क्षणही रागाच्या कित्येक क्षणांना भारी पडतो म्हणे. अशावेळी मग ही जोडपी, एकत्र घालवलेला तो एक प्रेमाचा क्षण, का बरं आठवत नसतील.? कोर्ट म्हणत होतं त्याप्रमाणे, ती छोटीशी गोष्ट नेमकी काय.? या आणि अशा अनेक प्रश्नाच्या वावटळीत अडकून, माझं मन इकडं तिकडं भरकटत जात होतं.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔