मृगजळ
एका प्रेमळ नजरेच्या शोधात सगळं आयुष्य संपून चाललं आहे. दररोजच्या ठरलेल्या साचेबद्ध आयुष्यात, पावलोपावली माझा हा शोध सुरूच असतो. मोजताही येऊ नये, नजरेत बसूही नये, इतक्या माणसांच्या भाऊगर्दीत असूनही, आपलं हक्काचं असं, फक्त एक माणूस आपण निर्माण करू शकलो नाही, कुणाच्या मनात घर करू शकलो नाही, कुणाच्या काळजाचा ठाव घेऊ शकलो नाही, कुणाच्या अधु-या स्वप्नांचा भाग होऊ शकलो नाही, कुणी आपल्याला miss करत नाही, कुणी आपल्या आठवणीत रमत नाही, कुणाची मैफिल आपल्याविना अधुरी नाही, कुणी आपल्याला समजून घेत नाही, आणि आपल्यावर आपल्यासारखंच प्रेम करणारं, आजवर आपल्याला कुणीही भेटलं नाही, आणि बहुतेक कधीच भेटणार ही नाही, अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधाचा हा प्रवास, बहुतेक आपल्या शेवटच्या श्वासाबरोबरच संपणार आहे, ही एक जीवघेणी जाणीव सतत मन कुरतडत असते. आपण नेमकं कुठे कमी पडलो, आपलं नेमकं कुठे काय चुकलं, या प्रश्नांचं धुकं तर, रखरखत्या उन्हात ही मनात नेहमीच दाटलेलं असतं. अशावेळी कधी कधी मनात विचार येऊन जातो की, खरंच.., काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालीच नसती तर किती बरं झालं असतं ना.!
किंबहुना आपण त्या प्रश्नांचा पाठलाग केलाच नसता, तर किती बरं झालं असतं ना.! आयुष्याने मला मरेपर्यंत फाशीची शिक्षा तर दिलीच आहे, पण सगळा जन्म उपाशी गेल्यामुळे शरीरावर मांसाचा लवलेशही नाही, आणि कित्येक अधु-या स्वप्नांचा भार, माझ्या गळ्यात अडकवलेल्या त्या फासाच्या तर खिजगणतीतही नाही. त्यामुळे माझा देह, एखाद्या मोरपिसासारखा, मरणाची वाट पाहत त्या फासावर तसाच लटकतो आहे. आणि माझी ही तडफड एखाद्याच्या लक्षातही येऊ नये, यासारखा नरक नाही.! कधी कधी तर मला असंही वाटून जातं की, निर्मिकाने प्रत्येक एकाकी माणसाला अंशतः अमरत्वाचा शाप दिला आहे. त्यामुळे त्याला लवकर मरण येतच नाही.!
#आयुष्य_वगैरे 🎭
#अडगळ
#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔