वाळवी

सुट्टीचा दिवस. मनसोक्त झोप घेऊन, दहा बाराच्या सुमारास आंघोळ, त्यानंतर भरपेट जेवण वगैरे करून, अंगणात खुर्ची टाकून, मी निवांत बसून होतो. बहुतेक दोन वाजायला आले होते. आता संध्याकाळ पर्यंत काय करायचं, हे कोडं पडलं होतं. आजूबाजूला हवेच्या नाजूक झोक्यावर डुलणारी बाभळीची झाडं, चिमण्यांचा चिवचिवाट, काही अंतरावरून वाहत जाणाऱ्या गावच्या त्या नाल्याचा, अगदी सवयीचा झालेला तो उग्र दर्प आणि माझ्या विचारात हरवलेला मी. बाजूलाच ठेवलेला मोबाईल हातात घेऊन, मी सहज त्यातील नोट्स चाळू लागलो. अजूनही कित्ती काय काय लिहायचं अपुरं राहिलं आहे, ते आठवून गेलं, आणि एके ठिकाणी येऊन अचानक माझा हात थांबला. त्याची आठवण आली. आता बरेच दिवस झाले, त्याची माझी भेट झाली नव्हती. आजही सुट्टीचा दिवस त्यामुळे कोर्ट परिसरात भेट घडेलच, याची काही हमी नव्हती. म्हणून मग थेट त्याच्या घरीच जाण्याचा मी निर्णय घेतला. पण तेव्हाच हा विचार ही मनात येऊन गेला की, तो घरात नसलाच तर. पण आता काही केल्या मन ऐकत नव्हतं. थोड्याच वेळात मी त्याच्या घराचा रस्ता धरला.

त्यांच घर जवळ येईल तसतसं माझं मन त्याच्या घरात डोकावून पाहत होतं. मागच्या वेळच्या भेटीच्या आठवणी ताज्या होत होत्या. 

त्याच्या अंगणात आलो तर नेहमीप्रमाणेच त्याच्या घराचा दरवाजा बंद होता. बाहेरून कडी कुलूप वगैरे काही दिसत नव्हतं, म्हणजे नक्कीच तो आत असणार, या विचाराने मला थोडं हायसं वाटलं. जेमतेम दोन तीन पायऱ्या चढून, मी त्या बंद दरवाज्या बाहेर उभा राहिलो. माझ्या डाव्या हाताला असलेली तुळस पाहून मला नवल वाटलं. कारण ना जाणे कुठल्या आशेवर, ती अजूनही तग धरून होती, तिची हिरवळ अस्तित्वात होती. ना जाणे कधीच्या, पण बहुतेक तुळशीच्या लग्नाच्या दिवशी घातलेल्या छोट्या छोट्या हिरव्याकंच बांगड्या अजूनही त्या तुळशीत दिसत होत्या. बेल वाजवावी म्हणून मी हात उचलणारच, तितक्यात लक्षात आलं की, ती तर कधीच बंद पडलेली आहे. 

मला पाहून आजूबाजूच्या अंगणात खेळणारी मुलं, आपापलं खेळ सोडून, दोन्ही हात मागं ढुंगणावर बांधून, माझ्याकडे एकटक पाहत होती. आत्ता या घडीला, त्या चिमुकल्यांच्या मनात, नेमका कोणत्या प्रश्नांचं लुटूपुटू खेळ सुरू असेल, याच मला कौतुक वाटत होतं. त्यातल्या एकाकडे पाहत असताना, मला नकळत माझे बालपण आठवून जात होते. मातीने पांढरे पडलेले पाय, पायातील तुटलेल्या शिरपल (स्लीपर) च्या पट्टयाला, आईनं लावलेली सेफ्टी पिन, डोक्यावर चपचपीत लावलेलं खोबरेल तेल, किंचितसा उसवला गेलेला तो शर्टाचा खिसा आणि निकामी झालेली ती हाफ चड्डीची चेन (झिप). एका क्षणात किती काय आठवून जात होतं. अजूनही त्या चिमुकल्यांची नजर माझ्यावरच खिळलेली होती.

आता मी अलगद दरवाजा ठोठावला. दोन तीन वेळा कडीही वाजवली. कडी वाजवताना एक गोष्ट लक्षात आली की, कडीही पार गंजून गेली आहे. कडीच्या डाव्या बाजूला बॉलपेनने "संपर्क" असं लिहून, एक मोबाईल नंबर लिहला होता. हा फारसा घरी नसतोच, त्यामुळे बहुतेक त्याने असं लिहून ठेवलं असावं. मी पुन्हा कडी वाजवणारच, तितक्यात मला आतून कडी काढतानाचा आवाज ऐकू आला. कडी काढत असतानाच त्याने आतून आवाज दिला की, कोण आहे.? मी शरद.., असं म्हणणारच तेवढ्यात त्याने दार उघडले होते. मला पाहताक्षणी त्याने स्मितहास्य केले. आत या म्हणाला, आणि मी आत येताक्षणीच त्याने पुन्हा दरवाजा बंद करून आतून कडी लावली.

आम्ही दोघेही आत येऊन बसलो. मी मागच्या वेळी आलो होतो, तेव्हापेक्षा आत्ता घर जास्तच मोकळं मोकळं वाटत होतं. घरातील ब-याचशा वस्तू दिसेनाशा झाल्या होत्या. कोपऱ्यात धूळ खात पडलेलं शिलाई मशीन, मोठ्या दरवाजाची तिजोरी, टिव्ही, टिव्हीचा टेबल व आणखीन ही बरंच काही. तितक्यात तो पाण्याची एक प्लास्टिक बाटली घेऊन माझ्या पुढ्यात येऊन थांबला. आजूबाजूला ही तशाच प्लास्टिकच्या खूप बाटल्या दिसत होत्या. पाणी पित असताना त्याची नजर चुकवून मी सहज किचनमध्ये डोकावलं, तर तिथं एकही भांड नजरेस पडलं नाही. किचन कट्टा ही मोकळाच दिसला. तिथं गॅसची शेगडी ही नव्हती. तो माझ्याकडे पाहतो आहे याचं मला भानच नव्हतं. क्षणभर मला कसंतरीच वाटलं. मला असं अवघडलेलं पाहून शेवटी त्यानेच आमच्या दोघांतील शांततेला वाचा फोडली.

सर, मला काहीच वाईट वाटलं नाही, आणि तुम्हीही उगाच विचार करत बसू नका. घरी आपलं असं कुणी असलं की, काही वाटत नाही हो.‌ पण आपल्या त्या जिवलगाच्या माघारी, घरातील एकेक गोष्ट हळूहळू सजीव होत जाते.

कधीकाळी दुर्लक्षित राहिलेल्या प्रत्येक गोष्टीला, 

आता हळूहळू एक चेहरा प्राप्त होत जातो. 

संध्याकाळी घरी परतलो की, कित्येक अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात, त्या सगळ्या गोष्टी, माझ्याकडे आ वासून पाहत उभ्या आहेत, माझं लक्ष असो वा नसो, 

पण माझ्या प्रत्येक हालचालींवर 

लक्ष ठेवून आहेत, आणि कधी कधी तर असं वाटायचं की, 

त्यांची आपसात काहीतरी 

कुजबुज सुरु आहे बहुतेक.

म्हणून मग हळूहळू एकेक करून घरातील सगळ्या वस्तू मी कमी केल्या. तिचा कपडालत्ता वगैरे सगळं काही एका आश्रमशाळेत दान केला. भांडीकुंडी मोडीत घातली. कधी कधी रात्रीच्या वेळी मला त्या शिलाई मशीनचा आवाज यायचा, म्हणून ते मशीन ही विकून टाकलं. टिव्ही पाहतच नाही, म्हणून तो सुद्धा गुंडाळून घराच्या मागच्या बाजूला नेऊन ठेवलाय. तिच्या आठवणींशी निगडित ब-यापैकी सर्व गोष्टींची‌ मी अशीच विल्हेवाट लावतो आहे. 

सर, तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा कधी याल ना, तेव्हा तुम्हाला इथं फक्त मोकळ्या भिंतीच दिसतील बघा. हे ऐकून मी आधी क्षणभर शांत थांबलो, आणि मग त्याला म्हणालो की, तिच्याशी निगडित अशा किती आठवणी नष्ट करणार आहेस तू. एकदा सगळं काही संपलं की, मग फक्त तू शिल्लक राहशील, तेव्हा काय करणार आहेस तू.? स्वतःला कसं नष्ट करणार आहेस.? आणि ते तुला जमेल काय.? त्यावर जोरजोरात हसत तो म्हणाला की, सर.., स्वतःला कधीच हरवून बसलो आहे मी. नको तिथं, नको तितका गुंतून स्वतःच खूप नुकसान करून घेतलंय मी. माझ्या वाट्याला येणा-या नरकयातनांना, सर्वस्वी मीच जबाबदार आहे. त्यामुळे इथं शिल्लक असलेला सजीवपणा, मी हळूहळू कमी करतो आहे. मला माझ्या आजूबाजूला सगळं काही निर्जीव आवडू लागलं आहे. मनाविरुद्ध घेतलेले काही निर्णय किती जीवघेणे ठरतात ना. वादळाची तीव्रता कित्ती होती, हे खरंतर वादळ शमल्यानंतरच कळतं ना. अगदी तसंच घाईगडबडीत घेतलेला आपला एखादा निर्णय, खरंतर आपल्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता, हे वेळ निघून गेल्यावर आपल्या लक्षात येऊन काहीच उपयोग नसतो ना.!

मी अजूनही आजूबाजूला पाहण्यातच हरवून गेलो होतो. घराच्या भिंतीत असणारी दोन लाकडी कपाट ही दिसेनाशी झाली होती. सहज नजर वर गेली तर वरची लाकड आणि भिंतीवर मातीच्या रेषा उमटल्या सारख्या वाटत होत्या. मी काही बोलणार तितक्यात तो म्हणाला की, #वाळवी लागली आहे हो सर. पार पोखरून टाकलंय, घराला आणि मनाला.!🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ

#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..