नशीब वगैरे..
प्रवास तसा दररोज ठरलेलाच, मग त्या निमित्ताने बस आणि बस स्टॉप यांच्याशी संबंध येतोच येतो. बरेच ओळखीचे चेहरे तिथं दररोज गाठ पडतात, तसं फार काही बोलणं होत नाही, पण किरकोळ नजरानजर आणि चला.., हमालीला जाऊयात, अशा किरकोळ शब्दांची देवाणघेवाण होते. ब-यापैकी मुख्य रस्ता आणि गजबजलेला चौक वगैरे म्हणून तिथं भटकी कुत्री, एखादं मोकाट जनावरं, दोन चार वृध्द दिव्यांग भिकारी वगैरे ही कायमचीच. तसंच तिथं ब-याचशा किन्नर लोकांचाही दररोजचा वावर. आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मोठ्या दुकानात थेट जायचं, त्यांच्या तोंडावरून मायेनं हात फिरवायचं, दुकानातल्या देवाच्या फोटोकडे पाहून, डोळे मिटून काहीतरी पुटपुटायचं, आणि दुकानदार हातात ठेवील ते पैसे घेऊन तिथून बाहेर पडायचं. अशावेळी त्यांचा मोर्चा अधेमध्ये बस स्टॉपकडेही यायचा. जवळपास सगळे तेच ते आणि ओळखीचे चेहरे म्हणून पटापट त्यांच्या हातात १०-२० च्या नोटा टेकवल्या जायच्या. किन्नरांच सर्वांच्या चेहऱ्यावर मायेनं हात फिरवणं एकसारखं सुरूच असायचं. माझ्याजवळ आल्यावर मला खिजवण्यासाठी त्यांचा एक ठरलेला डायलॉग असायचा. ए पांढरी दाढी.. पैसे दे ना रे..! त्यानंतर एकमेकांकडे पाहत ते खूप खूप हसायचे. नेहमीप्रमाणे मी सुद्धा फक्त स्मितहास्य करून शांत उभा रहायचो. अगदी नेहमीप्रमाणेच त्यांची बडबड आणि वरून खालपर्यंत मला न्याहाळणं सुरूच असायचं. बाकी सगळे पैसे बॅकपॅक मध्ये ठेवून मी फक्त वीसाची नोट शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेली असायची. मला थोडं खिजवून, चेष्टा मस्करी करून अगदी शेवटी त्यांचा हात माझ्या शर्टाच्या खिशाकडे यायचा, आणि ते ती वीसची नोट घ्यायचे. ती नोट हाताला लागल्यावर पुन्हा मी त्यांच्या त्या ठरलेल्या डायलॉगची वाट पहायचो. ए दाढी.. कधीतरी मोठी नोट दे रे..! आम्ही फक्त पैसेच तर मागत आहोत, तुझं नशीब तर मागत नाही रे.! मी पुन्हा फक्त स्मितहास्य करून शांत उभा रहायचो, आणि मनातल्या मनात विचार करायचो की, खरंच.., कित्ती बरं झालं असतं ना, जर असं मागून एखाद्याचं नशीब आपल्याला मिळालं असतं, वा कुणी आपलं नशीब घेऊन जाऊ शकलं असतं.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#गोष्टी_नशीबाच्या