डिसेंबर ०९, २०२१
कधी कधी वाटतं की माझा जन्म फक्त तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुझ्या आठवणीत जगण्यासाठीच झालाय. तुझ्यावर प्रेम करत असताना मी एवढा हरवून गेलो की, देवाकडे तुझ्यासाठी सतत काहीतरी मागता मागता, त्याच देवाकडे मी तुला मागायचं विसरून गेलो. पण तो देव ही शेवटी दगडाचाच निघाला. एवढा रडलो त्याच्यापाशी, पण कधीच त्याला मायेचा पाझर फुटला नाही. तुला नेहमी आनंदी अन् हसत खेळत पहायचं होतं. तुझी सारी स्वप्नं पुर्ण झालेली पहायची होती. मला नेहमी असं वाटायचं की, तुला तुझ्या मनासारखा जोडीदार मिळावा, पण त्या जोडीदाराच्या जागी तुझा नवरा म्हणून, मी स्वतःला पहायचं विसरूनच गेलो गं. 'तुझ्याशी लग्न.... हे स्वप्नं खरंतर मी खूप आधीपासूनच पहायला हवं होतं, पण तुझी engagement झाल्याची कळाली, तेव्हा मी खडबडून जागा झालो, आणि स्वप्नातून सत्यात आलो. तुझ्या मागं मागं फिरणं, नुसतं लपून छपून तुला पाहणं, यातच गुंतून पडलो. आणि तुझ्याशी कधीच बोलायची हिम्मतच न झाल्यामुळे, आता ही वेळ पाहत होतो. सतत तुझ्या घराशेजारी घुटमळत राहिलो, प्रत्येक वाटेवर उभा राहिलो, पण कधीच आणि काहीच बोललो नाही. फक्त नेहमीच तू माझ्या या डोळ्यांना दिसावी, एवढी एकच आस घेऊन जगत आलो. नजरेची भाषा तुला कधी उमगली नाही, आणि मनातलं ओठांवर आणायची हिम्मत, मी कधी दाखवलीच नाही. सारं काही इथंच चुकलं गं बहुतेक. अगदी तुझ्या डोक्यावर शेवटच्या अक्षदा पडेपर्यंत मी आस सोडली नव्हती गं.! पण सारं व्यर्थ.! आता एखाद्या अथांग सागरासारखी तू, त्या तुझ्या आठवणींच्या लाटा, आणि मी तो स्तब्ध किनारा.! क्षणोक्षणी येणा-या तुझ्या आठवणींच्या लाटा, मला मनसोक्त भिजवून, थोडा वेळ का होईना, मला बिलगून सुखावून जात असतात.!🎭
#आयुष्य_वगैरे