Miss You मिस्टर...💔
मिस्टर, तुमचं एक वाक्य मला नेहमी आठवतं हो,
''देवाधर्माच्या साक्षीनं, अगदी वाजत गाजत घरी आणलेल्या आपल्या हक्काच्या बायकोला जीव नाही लावायचा,
तिच्यावर सर्वस्व उधळून प्रेम नाही करायचं, तर मग कुणावर करायचं.?'' मिस्टर, आपलं तर अरेंज मॅरेज, तरीही मला नेहमीच हा प्रश्न सतावायचा की, तुम्ही मला इतका जीव का लावता.? माझ्यावर इतकं प्रेम का करता.? कारण अगदी लहानपणापासून अशा गोष्टी, मी फक्त टिव्ही मालिका आणि हिंदी-मराठी चित्रपट यातच पाहत आलीय. मिस्टर, आठवतंय काय हो तुम्हाला, कधी कधी तर आपले शेजारीपाजारी ही
सहज गंमतीने आपल्याला विचारायचे की, नक्की अरेंज मॅरेजच आहे ना तुमचं.? मिस्टर, तुम्ही इतकं प्रेम करत होता माझ्यावर, आणि ते सर्वांना दिसतही होतं. लग्नानंतर काही दिवस, महिने, किंवा फारतर एखादं वर्ष हे असंच सुरू राहील, असं मला वाटलं होतं. पण तुमचं माझ्यावरील प्रेम, आणि माझी काळजी घेण्याची तुमची सवय उत्तरोत्तर वाढतच गेली हो.! आपलं लग्न जुलैमध्ये झालं होतं, त्यामुळे माझ्या पहिल्या valentine's day साठी मला फारच वाट पहावी लागली. तसं याबद्दल मी तुम्हाला काहीही बोलले नव्हते, कारण तुम्हाला हे असे दिवस साजरे करणे वगैरे आवडत असेल की नाही, हा विचार मनात डोकावून जात होता. आणि तसं पहायला गेलं तर, मला त्या अमुक तमुक एका प्रेमाच्या दिवसाची गरज भासलीच नाही. कारण तुमच्या सोबतीने घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मला valentine's day सारखाच वाटायचा. का हो मिस्टर... का तुम्ही मला इतका जीव लावलात.? नवीन वर्ष वगैरे उजाडलं. माझी पहिली संक्रांत ही तुम्ही अगदी धूमधडाक्यात पार पाडलीत. कित्ती कित्ती भारी वाटलं मला.! मिस्टर.., कधी कधी तर आपण एकांतात असताना, जेव्हा मी तुमच्या मांडीवर डोके ठेवून झोपायचे ना, आणि तुम्ही माझ्या कपाळावरून हात फिरवत, अधेमध्ये माझा कानातील रिंगांसोबत चाळे करत असायचा ना, तेव्हा माझ्या मनात एकच विचार सुरू असायचा की, प्रेम प्रेम वगैरे म्हणतात ना, ते बहुतेक हेच असावं.!
आणि मिस्टर.., त्यावेळी मी स्वतःला खूपच नशीबवान समजायचे की, इतकी सर्वस्व उधळून प्रेम करणारी व्यक्ती, मला नवरा म्हणून लाभली आहे.
आपल्या लग्नाला आता फारतर सात आठ महिने झाले होते.
नेहमीसारखाच फेब्रुवारी उगवला, पण यंदा तो इतका खास ठरेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं, आणि असा एखादा फेब्रुवारी कधी माझ्या आयुष्यात येईल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला सरप्राइज आवडतं, असं मी एकदा तुम्हाला सहज बोलली होती. आणि अगदी त्या क्षणापासूनच माझं सगळं आयुष्य कसं सरप्राइजेसनी भरभरून गेलं होतं. आजवर नेहमीच सिनेमात पाहत आलेला valentine's week वगैरे, मी त्यावर्षी पहिल्यांदा अनुभवला. त्या week मधला प्रत्येक दिवस तर अगदी स्वप्नवत असा गेला. मिस्टर, मी मनानं जे काही अनुभवलं आहे ना, ते सगळं काही शब्दांत सांगू शकत नाही हो.!
दिवसामागून दिवस सरत जात होते, पण तुमच्या माझ्या प्रती असलेल्या प्रेमात तसूभरही फरक पडल्याचं मला जाणवत नव्हतं. पण तुम्हाला हवा असलेला नेमका प्रतिसाद आणि प्रेम द्यायला मी कुठेतरी कमी पडते आहे, हे तुम्ही जाणून होता. तरीही तुम्ही इतके नॉर्मल कसे काय राहत होता, याचं मला नेहमीच नवल वाटायचं. मिस्टर, साध्या भाषेत सांगायचे झाले तर तुमचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं. हो मिस्टर, तुम्ही इतका जीव लावून ही, का कुणास ठाऊक, पण माझ्या मनातून तुम्हाला हवं तसं, किंवा तुमच्याबद्दल म्हणावं तसं प्रेम मला वाटतंच नव्हतं हो. मिस्टर, कधी कधी तर मला असंही वाटायचं की, तुम्ही ठार वेडे झाला आहात. कारण त्या त्या वेळी तुमचं वागणं बोलणं नेहमीपेक्षा कमालीचं वेगळं असायचं. कधी कधी हातातली कामं बाजूला ठेवून तुम्ही तासनतास फक्त मलाच न्याहाळत असायचा, तर कधी दर पाच दहा मिनिटाला हाक मारायचात, पण मी प्रतिसाद दिला की, तुम्ही काही नाही गं, असं म्हणून पुन्हा आपल्या विचारात हरवून जायचा. तुम्ही खरंच वेडे आहात की वेडेपणाचे सोंग घेतलं आहे, हेच मला कळत नव्हतं. पण मी नेहमीच अगदी रूक्षपणे वागताना तुमच्या चेहऱ्यावर पसरणारी निराशा लपवणं, कधी कधी तुम्हाला शक्य व्हायचं नाही. मी अशी, इतकी रूक्षपणे का वागते, या कोड्यात तुम्ही. आणि तुम्ही इतके दिलखुलास, सर्वस्व उधळून प्रेम का करता, या कोड्यात मी.!🎭
मिस्टर, मी रडत असतानाही तुमच्या हसण्याचं मागचं कारण मला अजूनही कळलेलं नाही हो. मिस्टर, कधी कधी तर अगदी सहजच माझ्या मनात विचार येऊन जातो की, बहुतेक सगळं काही माहीत असूनही तुम्ही मला स्वीकारलं होतं. मी कधीतरी तुम्हाला अर्ध्या वाटेवर सोडून निघून जाणार आहे, हे तुम्हाला पक्कं ठाऊक होतं. पण कसं काय हो मिस्टर.? जी गोष्ट मला अथवा माझ्या कुटुंबाला ही माहित नव्हती, ती गोष्ट तुम्हाला कशी माहीत असू शकते.? आणि जर असं असेल तर, तरीही तुम्ही तुमचं आयुष्य पणाला का बरं लावावं.? मिस्टर, कित्ती बरं झालं असतं ना हो, जर आपल्याला उद्याचा दिवस आजच कळला असता तर.! मिस्टर, जेव्हा जेव्हा मी अशी कोड्यात टाकणारं बोलते ना, तेव्हा तुम्ही नेहमीच अगदी माझ्याजवळ, माझा हात हातात घेऊन बसून असता, आणि एकसारखं माझ्या कपाळावरून हात फिरवता, तेव्हा ना कधी कधी मनात विचार येऊन जातो की, माझा शेवटचा श्वास अगदी असाच असावा, तुम्ही माझ्या जवळ असताना, माझा हात तुमच्या हाती असताना.! पण मिस्टर, असं घडलं तर आपण एकत्र पाहिलेली स्वप्नं आणि एकमेकांना दिलेली वचनं यांचं काय करायचं हो मग.? मिस्टर, आठवतंय काय हो.? तुम्ही मला नेहमीच नारायण सुर्वे यांची "तेव्हा एक कर.." ही एक कविता ऐकवायचात. पण या कवितेत जे सांगितलं आहे, त्याच्या नेमकं उलट घडलं, तर तुम्ही काय करायचं, याचा विचार तुम्ही कधी केला आहे काय हो मिस्टर.??
मिस्टर.. अहो मिस्टर... प्लीज सांगा ना.. 🎭
क्रमशः
#आयुष्य_वगैरे
#Miss_You_मिस्टर
#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔