कॅलेंडर
घरी काही किरकोळ वादविवाद वगैरे झाले, किंवा माझा सख्खा काका नेहमीप्रमाणे दारू पिऊन वगैरे घरी धांगडधिंगा घातला, किंवा माझ्या वडिलांशी, आजोबांशी शिवागीळ वगैरे केला की आई खूप दुःखात असायची. त्यावेळी रात्री ती सगळ्यांना जेवू घालायची, पण स्वतः मात्र उपाशीपोटी झोपायची. पुढचा दिवस उजाडला की पुन्हा सगळं काही नेहमीप्रमाणेच सुरळीत पार पडायचं. पण भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर कडे सहज नजर गेली की, तिथं कालच्या तारखेला निळ्या रंगाच्या बॉलपेनने गोल गोल गोल असं भरपूर गिरवलेलं दिसायचं. तेव्हा या गोष्टी फक्त नजरेला दिसायच्या, पण त्यामागचं कारण मात्र कधीच लक्षात येत नसायचं. नंतर काही वर्षांनी एकदा सहज म्हणून आईला विचारलं असता तिनं सांगितलं, तेव्हा मला सगळं काही कळून चुकलं. पण आश्चर्य ही वाटलं की, आईचं तत्वज्ञान कित्ती साधं, सोपं, आणि सुंदर आहे. ती शक्यतो वाईटसाईट काहीच लक्षात ठेवत नाही. त्या आठवणी ती लगेचच त्याच दिवशी पुसून टाकते, आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात दररोज नव्याने करते. पण प्रत्येक वर्षाकाठी जेव्हा घरात नवीन कॅलेंडर यायचं, तेव्हा मी अगदी गुपचूप जुन्या कॅलेंडर मधे आईने अशा खोडलेल्या तारखा मोजायचो. तेव्हा लक्षात यायचं की वर्षातले कितीतरी दिवस आई सगळं काही विसरून, वाईट अनुभव पाठीशी टाकून, नेहमीच हसत खेळत राहते, आनंदी दिसते, ती फक्त आणि फक्त कुटूंबासाठी.!🎭
#आयुष्य_वगैरे
#प्रेम_आई ❤️