मी आणि माझा काका...

माझं नाव रिया. 

मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक. 

मी आणि आईबाबा वरच्या मजल्यावर राहतो. 

खालच्या मजल्यावर आजी-आजोबा आणि माझा काका.! 

#काका हा शब्द ऐकला की माझ्या मनात नेहमीच नुसता गोंधळ माजतो. मला माझ्या काकांबद्दल खूप कुतूहल वाटतं. माझ्या लहानपणी वगैरे मला त्यांनी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळवलं ही असेल बहुतेक, पण मला त्यातलं काहीच ठाऊक ही नाही, आणि तसं काही आठवत ही नाही. माझे आईवडील काकांशी बोलत नाहीत. काकाही आईवडिलांशी बोलत नाही. याच कारण काय ते मला तर अजिबात ठाऊक नाही.

काकाच्या माघारी ही घरी कुणी काकांबद्दल बोलत असल्याचं मला आठवत नाही. खाली आजी आजोबा ही नेहमी आपापल्या नादात असतात. मी तर काकाला कधी फोनवर बोलताना ही ऐकलं नाही. कधी कधी तर माझ्या मनात विचार येऊन जातो की, बहुतेक आपला काका मूकबधिर वगैरे असावा. पण निदान काकाला पाहून तरी तसं काहीच वाटत नाही. ब-यापैकी देखणा, सावळा रंग, उंची साडेपाच फुटांपेक्षा किंचित जास्तच, भरपूर वाढलेली आणि काळी पांढरी दाढी, त्या दाढीशी अगदी तुल्यबळ स्पर्धा करणारे काळे पांढरे केस, नेहमी अंगात कुर्ता शर्ट आणि बहुतेक काकांच्या आवडत्या रंगाची, दररोजची‌ ठरलेली आकाशी निळ्या रंगाची जीन्स पँट.

मी दररोज सकाळी काकाला कामावर जाताना पहायची, पण संध्याकाळी काका घरी कधी परतला हे मला माहितच नसायचं. कारण काका ब-यापैकी रात्री उशिरा घरी परतायचा.

असं कुणाशी ही, काहीही न बोलता हा माणूस कसा काय राहू शकतो, याच मला नेहमीच अप्रूप वाटायचं. 

मी खाली आजी आजोबा यांचेकडे गेले, तरीही काका मला कधीच हॉलमध्ये वगैरे दिसलाच नाही. तो नेहमीच अगदी मागच्या खोलीत एकतर मोबाईल घेऊन बसलेला असायचा, किंवा खिडकीतून बाहेर पाहत बसलेला असायचा. मी त्याला ज्या ज्या वेळी जेवताना ही पाहिलं त्या प्रत्येक वेळी तो जेवणाचं ताट घेऊन ही त्या मागच्या खोलीतच जाऊन बसायचा. तो सुद्धा कुणाच्या अस्तित्वाची दखल घेत नव्हता, आणि त्याच्या आजूबाजूला असलेले सुद्धा त्याच्याशी अगदी तसच वागत होते. पण आजी आजोबा सुद्धा काकांची साधी विचारपूस ही का करत नाहीत, हे मला कळतच नव्हतं. 

कधी कधी मी हळूच काकांच्या त्या मागच्या खोलीत डोकावायचे, त्यावेळी ते खिडकीतून बाहेर पाहत असत, अगदी एकटक.! मग कधीतरी काका घरी नसताना मी त्या खिडकीत जाऊन थांबायचे, आणि तिथून बाहेर पहायचे. तसं त्या खिडकीतून बाहेर विषेश असं काहीच दिसतं नव्हतं. जिथंवर नजर जाईल तिथंवर फक्त आणि फक्त काटेरी बाभळीचं जंगल आणि अधेमध्ये अंगावर येणारी हवेची एखादी थंडगार झुळूक. पण आपल्या काकाला या खिडकीतून काय दिसतं कुणास ठाऊक, की तो तासनतास बाहेर पाहत बसतो.

काका घरी असताना ही आणि नसताना ही काकाच्या खोलीत कुणीच जात नसायचं. तशी ती खोली कायम उघडीच असायची. कारण मी तर कधीच त्या खोलीला कडी कुलूप वगैरे पाहिलेलं नाही. कधी आजीची नजर चुकवून मी तिथं गेली तर आजी आजोबा मला रागावून वगैरे लगेचच तिथून बाहेर घेऊन यायचे, आणि सांगायचे की काकांच्या कोणत्याही गोष्टीला हात लावायचं नाही, त्यांना राग येतो. 

तिथं त्या खोलीत एका टेबलावर लॅपटॉप, 

त्याच्या बाजूलाच पडलेलं दाढी करायचं सामान, 

एक दोन कात्र्या, एक डिओड्रंट, एक तुटका इअर फोन 

आणि खालील बाजूस बरीचशी कागदपत्रं.

बाजूलाच भिंतीवर मारलेल्या एका लोखंडी पट्टीवर अडकवलेली एकच जीन्स पँट आणि भरपूर कुर्ता शर्ट. 

त्या खोलीच्या सगळ्या भिंती अगदीच मोकळ्या. 

केव्हातरी एखादी डास वगैरे मारल्याचा पुरावा म्हणून 

कुठंतरी भिंतीवर पडलेले माणसाच्या रक्ताचे डाग. 

इतकाच काय तो रंग दिसत होता त्या खोलीत, 

बाकी सगळं बेरंग.! त्या भिंतीकडे पाहत असताना असं वाटत होतं की त्या भिंतींना खूप काही बोलायच आहे, सांगायचं आहे, पण त्या भिंतीही बहुतेक काका रागावेल, म्हणून मूग गिळून गप्प उभ्या आहेत.

काकांचं एक जुनं घर आहे म्हणे शहरात, पण आता तिथं कुणीच राहत नाही. अधेमध्ये आजी आजोबा आणि कधीतरी स्वतः काका तासाभरासाठी तिकडं जाऊन येतात. 

पण काकांचं ते स्वतःच घर सोडून काका इथं असे आश्रितांसारखे आणि दगड बनून का राहत असतील.? 

काका माझ्या पप्पांपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे म्हणे, 

म्हणजे काका आता जवळपास अडतीस च्या घरात. 

पण काका एकटा का राहतो.? 

घरी वगैरे कुणाशी ही बोलत का नाही.? 

मी तर काकाला भेटायला असं, फक्त काकासाठी घरी कुणी आलंय, असं कधीच पाहिलेलं नाही. काकाला काहीच कसं काय वाटत नसेल. आणि जर काकाला काही वाटत असेल, तर त्याच्या मनातील ती खदखद, काका कुणापुढे आणि कशी व्यक्त करत असेल.? 🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..