सोन्याच्या थप्प्या...

एव्हाना शाळवाची मळणी वगैरे होऊन घरात पोत्यांच्या थप्प्या लागलेल्या असायच्या. आता पुन्हा रानं पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे तोंड करून उताणी पडलेली असायची. मे जून तर तसा आधीपासूनच शाळेला सुटट्यांचा. दोन टायम खायचं आणि दिवसभर गल्ली-बोळात, हायस्कूलच्या मैदानावर, दर्गाह मधल्या कबरीवर, शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात, तर कधी तिथल्याच जवळच्या बाभळीच्या हगणदारीत फिरत रहायचं. तेव्हा मटका जोरात सुरू असायचा. गल्लीतल्या मुख्य चौकात काही वयोवृद्ध मंडळी आणि तरणीबांड मंडळी कायमच्याच ओपन-क्लोजमधे गुंतून असायची. कुठंतरी दाट सावली बघून एखादं टोळकं चटई पसरून टाईमपास म्हणून पत्त्यांचा डाव मांडून बसलेलं असायचं. एखादं तरूण पोरं आणि पोरगी आपापल्या उंब-यात थांबून, सर्वांची नजर चुकवून, एकमेकांकडे पाहत उभं राहिलेलं असायचं. माझी भिरभिरती नजर त्यांच्यावर पडली की ते क्षणभर बावचळून जायचे. काही निवडक सासवा एकत्र येऊन नेहमीप्रमाणे डोळ्यात पाणी आणून आपापलं रडगाणं लावून बसलेल्या असायच्या. घरी ब-यापैकी बाथरूम वगैरे असूनही काही बायका अगदी आपापल्या उंब-याशी बसूनच धुणं भांडी उरकत बसलेल्या असायच्या. त्यातल्या त्यात काळ्याभोर दगडावर दणादण आपटल्या जाणाऱ्या कपड्यांचा कोरस फारच विषेश वाटायचा, आणि एक आर रहमानचं एखादं गाणं आठवून जायचं. गल्लीतल्या एकमेव उघड्या गटाराचा दर्प नेहमीच गल्लीभर पसरलेला असायचा. मे महिन्याच्या अखेरीस उन्हाचा ताव तसा भलताच वाढलेला असायचा. अशावेळी पांडू लोहाराच्या घराजवळचा तो गुलमोहर आठवायचा आणि वाटायचं की एवढ्या उन्हातही हा इतक्या प्रसन्नतेने कसा काय फुलू शकतो.? जूनच्या अखेरीस संध्याकाळच्या वेळी हमखास पाऊस पडायचाच. जोरदार वारे, भलेमोठे टपोरे थेंब. तासाभरात सगळं कसं गारेगार होऊन जायचं. घरात शाळवाची पोती येऊन पडल्यापासून आता घर जरा अडचणीचं वाटायचं आणि आपल्या इनमिन चौकोनी कुटुंबासाठी वडिलांनी इतकी पोती भरून धान्य कशासाठी ठेवलं असेल, असा प्रश्न पडायचा. नंतर काही महिन्यांनी हळूहळू त्यातलं एकेक पोतं कमी होत जात, निवडक एक दोन पोतीच शिल्लक रहायची. त्यातलं ही १०-१५ किलो धान्य वडील कधी कधी पोत्यात घालून कुठंतरी घेऊन जायचे आणि परत येताना ते पोतं मोकळं असायचं आणि सोबतीला एखादी भाजीपाला अथवा किरकोळ किराणा याने भरलेली पिशवी असायची. एके दिवशी नेहेमीप्रमाणेच वडील असं जात असताना मी सुद्धा सोबत गेलो आणि मग मला घरातल्या त्या शाळवाच्या थप्प्यांचं मोल कळालं. शेती ब-यापैकी पावसावर अवलंबून असलेली. त्यामुळे वर्षाकाठी जे काही पीक येईल ते आणि ते विकून मिळणारा पैसा यातच वर्षभर उदरनिर्वाह चालवायचा. वडिलांच्या पगारात घरखर्च भागवताना होणारी ओढाताण कधी कधी थेट आईच्या गळ्यातील मंगळसूत्रापाशी जाऊनच संपायची. तेव्हा घरात एका कोपऱ्यात गुपचूप पडून असलेली ही धान्याची पोती मदतीला धावून यायची आणि त्यातलं किरकोळ १०-२० किलो विकून आमचा आणखीन एक आठवडा बाहेर पडायचा.!🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

#गंध_आठवणींचा 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..