कलियुग..

काही दिवसांपूर्वी कामानिमित्त एका छोट्या गावात गेलो होतो.

काम वगैरे आवरून झाल्यावर बसची वाट पाहत स्टॅंडच्या बाजूला असलेल्या पारावरच्या कट्ट्यावर बसलो. जवळचं एक मोडकंतोडकं खोकं होतं. तिथं चहा, भडंग यांवर ताव मारत काही मध्यमवयीन माणसं जमली होती. तिथं जवळच मागच्या बाजूला गावच्या यात्रेतलं खास आकर्षण म्हणून असलेल्या तमाशाचं एक भलं मोठ्ठं फ्लेक्स उभं होतं. त्यावर अगदी खालच्या बाजूला, अगदी बारीक अक्षरात यात्रेतल्या सगळ्या कार्यक्रमाचं वेळापत्रक ही होतं. गावची बरीच लहानथोर मंडळी ते वाचण्यात मग्न होती.

तसा बस यायला अजून वेळ होता, म्हणून मी सुद्धा हळूच त्या खोक्याकडे सरकलो. एखादं जुनं खोडही तिथंच बाजूला जमीनीवर बसून बीडी फुंकण्यात मग्न होतं. नको वाटत असला तरीही बळजबरीने बीडीचा तो विशिष्ट वास नाकाला बिनशर्त पाठिंबा देतच होता, आणि नाकाला ही तो स्वीकारण्या शिवाय गत्यंतर नव्हते. एव्हाना मी दोन कप चहा ढोसला होता, आणि सोबत एक प्लेट भडंग ही संपवला होता. मस्त वाटलं. बाकी काही ठराविक गोष्टींच्या चवीला, विषेश म्हणजे त्या खेडेगावातील असतील, तर त्यांच्या चवीला तोडच नाही. आजही तसा उन्हाचा कडाका भरपूर होता, पण आजूबाजूला सगळा मोकळा आणि माळरानाचा परिसर असल्यामुळे 

हवा ब-यापैकी खेळती होती. त्या खोक्यात खूप उशीरा पासून सुरू असलेल्या रेडिओचा आवाज, त्या रेडिओला तरी ऐकू येत असेल की नाही, हा प्रश्न मला सतावत होता. आता बस येईपर्यंत कुठंतरी बुड टेकावं म्हणून मी तिथून निघणारच तितक्यात तिथं सुरू असलेल्या चर्चेने माझं पाय जागच्या जागी जमीनीवर रुतून बसलं, आणि मी ती चर्चा ऐकू लागलो.

भाऊच्या पहिल्या दोन बायका कशा मेल्या ते काय माहीत नाही, पण भाऊनं (गावच्या माजी झेडपी सदस्यानं) तिसरं लग्न केलं. आणि भाउच्या लग्नात बहुतांश पदवीधर, बेरोजगार, अविवाहित पोरं मंडळी झिंगून नाचली. मी क्षणभर त्या बोलण्यात हरवून गेलो होतो. तितक्यात तिथलं एक जुनं खोड बोलून गेलं की, हे कलियुग हाये लेकरांनो. मुबलक परमाणात पैका जवळ आसल तर कायबी होवू शकतं.!🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

#गावाकडच्या_गोष्टी 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..