तसं प्रॉब्लेम्स नसतात कुणाला.?

गल्लीतल्या एका मयताच्या निमित्ताने काल खूप दिवसांनी त्याची आणि माझी भेट झाली. 

माती सावरल्यावर आम्ही दोघेही त्याच्या घरी गेलो. 

त्यानं पायावर फक्त दोन तांबी पाणी ओतून घेतलं आणि तसाच घरात प्रवेश केला. मी सुद्धा त्याचं अनुकरण केलं. 

नेहमीप्रमाणे त्यानं मला त्याच्या बेडरूममध्ये बसवलं. 

एव्हाना तो किचनमध्ये गेला होता. मी आजूबाजूला नजर फिरवत होतो. त्याचं ते घर आता आणखीन जास्त भकास आणि भेसूर वाटू लागलं होतं. भिंतीवर जळमटं खूपच वाढली होती, खाली मुंग्यां तर इतक्या की खालच्या जमीनीचा कुठे लवलेशही दिसत नव्हता. सॉरी सर, आज मी दूध आणायला विसरलो आहे. असं म्हणत त्यानं पाण्याचा तांब्या आणि एक फुलपात्र पुढे केलं. थोडं पाणी पिऊन मी तो तांब्या खाली ठेवला. तो माझ्या बाजूला येऊन बसला, अगदी चटकन् त्यानं पंख्याचं बटन दाबलं. तो पुन्हा सॉरी बोलला. अरे, it's ok मी म्हणालो. दोघेही शांत बसून होतो. पंख्याचा बारीक असा टुकटुक आवाज खोलीत घुमत होता. नेमकं काय बोलावं आणि कसं बोलावं, हे आम्हा दोघांना काहीच सुचत नव्हतं. तितक्यात मला अपेक्षित विषयाला त्याने स्वतःच हात घातला आणि तो बोलू लागला.,

सर, त्यादिवशी मला कळून चुकलं की माझा सख्खा भाऊ आणि माझा मित्रपरिवार या सर्वांच्याच वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू होत्या, आणि अजूनही आहेतच. पण त्या कुरबुरी त्यांनी कधीच जगजाहीर केल्या नाहीत अथवा त्यांचा बाऊ केला नाही. हां., तसे त्यांचे ते इश्यू किरकोळ वगैरे असतीलही बहुतेक. पण त्या कुरबुरीमुळे त्यांच्या मनात आलेले अती टोकाचे निर्णय ते कधीच घेऊ शकले नाहीत. पण त्यांच्या मनात ती चीड कुठेतरी खूप खोलवर तग धरून होती आणि त्या चीडीचं बीज त्या सर्वांनी नकळत माझ्या मनात पेरलं आणि हळूहळू त्या रोपट्याचा त्यांनी वटवृक्ष केला. त्यांनी अगदी नकळतपणे त्यांच्या मनातील ती चीड धरून बसलेली सुप्त इच्छा माझ्या मार्फत पुर्ण करुन घेतली. कधी कधी एखाद्याचा सल्ला घेतल्यावर आपले प्रॉब्लेम्स कमी तर होतच नाहीत, उलट जास्त वाढतच जातात. आजवर या सा-यांनी जो खड्डा फक्त लांबूनच पाहिला होता, त्यात मला अगदी हेतुपुरस्सर ढकललं होतं. खड्डा किती खोल आहे, त्याच्या तळाशी काय आहे, यात पडल्यावर जगेल की मरेल.? हे पाहण्यासाठी आणि त्यांची ती चीड आणि मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी. पण आता ज्या खोल खड्डयात मी पडलेलो आहे, तिथं आणखी कुणीही नाही. शक्यतो इकडं कुणी फिरकत ही नाही. खूप वेळ झालाय आता, मी सुद्धा वैतागलोय. आता मलाही त्या खड्डयातून‌‌ वर यायचंच नाहीये, म्हणून मी स्वतःला त्याच खड्डयात गाडून घ्यायचं ठरवलंय. आता मी तो खड्डा माझ्या नखांनी कुरतडतो आहे, आणि माझ्या आजूबाजूला हळूहळू मातीचा ढीग वाढत जात आहे. पण तो मातीचा ढीग अजून माझ्या पायाच्या बोटांच्या नखांच्या वरही आला नाही. एकंदरीत सगळं अवघड दिसतंय. एकटेपणा कित्ती जीवघेणा असतो, हे जो तो अनुभवतोय, भोगतोय त्यालाच चांगलं ठाऊक असतं. ज्याला काटा टोचतो, ती वेदना फक्त त्याची त्यालाच ठाऊक असते. एखाद्याचं सांत्वन करणं वेगळं, आणि ते दुःख आपण स्वतः भोगणं वेगळं. शेवटी आपण कुणाचा सल्ला घेतोय यावरच आपलं वाटोळं होणार की भलं होणारं, हे सगळं काही अवलंबून असतं. आयुष्य हे महाभारत असलं तरीही आपल्या रथाचे सारथ्य करायला कृष्ण हा सर्वांच्या वाट्याला येईलच असं नाही. सर, आता त्या सर्वांची आयुष्यं अजूनही तशीच सुरू आहेत आणि त्या कुरबुरी ही. पण मी मात्र कुठे होतो, कुठे निघालो आहे, आणि कुठे पोहचणार आहे, ते काहीच माहीत नाही. आला दिवस ढकलायचं आणि शेवटच्या घटकेची वाट पहायची, किंवा कधीतरी स्वतःच तिला बिलगायचं, बस्स इतकंच सतत मनात सुरू असतं. वपु म्हणतात तसं प्रॉब्लेम्स नसतात कुणाला.? ते शेवटपर्य असतात.! आणि प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच म्हणे. पण जिथं आपण स्वतःच एक प्रॉब्लेम असतो, तिथं नेमकं करायचं तरी काय.? तिथं आपल्याकडे वेळ, पैसा, माणसं सर्व काही असूनही काहीच उपयोग होत नसतो. कारण प्रॉब्लेम तर आपण स्वतःच असतो. पण सर, अजूनही कधी कधी वाटून जातं की, गोष्ट छोटीशी होती.. गोष्ट हातातली होती.!🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..