मांजा
बाळा, आता खूप उशीर झालाय. अगदी महत्वाची आणि मोक्याची वेळही तू कधीच गमावून बसला आहेस. आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देईल असा निर्णय घेत असताना आधी खरंतर दहावेळा विचार करायचा असतो. पण अगदी लहानपणापासून तुझा हा आततायी स्वभाव, तुला आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला नेहमीच त्रासदायक ठरत आलाय. बाळा, मला मान्य आहे की, तुझ्या मनासारखं कधी घडलच नाही. आणि एक गोष्ट आम्ही घडवायला गेलो तर तिथंही तुझ्या नशीबाने तुला दगा दिला. आता जिथं नशीब आडवं येतं तिथं दोष द्यायचा तरी कुणाला.? आईबाप म्हणून तुझी ही अवस्था आम्हाला पाहवत नाही रे, पतंगाचा मांजा एकदा का हातातून निसटला की तो पतंग दिसेनसा होईपर्यंत आपण त्याला पाहत राहतो, पण इथं आमची अवस्था जरा वेगळीच झाली आहे रे. कारण मांजा तर हातातच आहे, पण पतंग मात्र नजरेला अजिबात दिसतच नाहीये. आणि हातातून मांजा सोडून द्यायची हिंमतही होत नाहीये. तो पतंग तू आहेस बाळा. आणि आता तू नेमका कुणापासून, कुठे पळतो आहेस, ते नेमकं तुझं तुलाही नीट माहीत नाहीये. बाळा, कित्ती जागा बदलणार आहेस.? जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरीही तुझा भूतकाळ आणि त्याच्याशी निगडीत आठवणी तुझा पिच्छा सोडणार नाहीत रे.!🎭
#अडगळ 💔