नियती निमित्त..

एकत्र असा एकदाच प्रवास केला होता आपण, जेव्हा जोडीनं जोतिबाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यानंतर कित्ती वर्षांनी, नाईलाजाने का असेना, पण आपण दोघे एकत्र प्रवास करत होतो. बसच्या उजव्या बाजूच्या सीटवर मी एकटाच बसलो होतो. तर बसच्या डाव्या बाजूच्या सीटवर तू आणि तुझी आई. बहुतेक नियतीला सुद्धा पुन्हा एकदा,‌ निदान एकदा तरी आपण एकत्र प्रवास करावा, असं मनोमन वाटत असावं. आज निकालाचा दिवस होता. कोर्टातील आज आपली शेवटची तारीख. आपण बहुतेक थोडीफार वर्षे तरी नेटका संसार केलाच. पण हळूहळू अगदी हातातल्या अशा वाटणा-या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठं स्वरूप धारण करत गेल्या, आणि मग त्या so called नियतीने वगैरे 'होत्याचं' पारं 'नव्हतं' करून टाकलं. बहुतेक टोकाचं पाऊल मीच उचललं होतं, पण माझी बाजू कुणीच कधीच समजून घेतली नव्हती. नेहमीच सगळं काही सावरत सावरत, स्वतःला आवरत मी सांभाळून वाटचाल करत आलो होतो. पण बहुतेक इथंच मी चुकलो. सर्वांनीच मला आणि माझ्या मताला गृहीत धरलं. कोर्टातही ना मला, ना तुला फार काही बोलूच दिलं नाही. फक्त हो किंवा नाही इतकंच बोलायची मुभा होती. बाकी सारं काम वकील लोकांनी थोडं खरं आणि बरचसं खोटं बोलून लिलया पार पाडलं, आणि ते आपल्या दोघांना तरी माहीत होतंच. तरीही अगदी शेवटपर्यंत आणि आत्ता या क्षणाला ही, मी सगळं काही मागे टाकून पुढे जाऊ इच्छित असताना, आता कुणालाही माझं हे वागणं अस्वीकार्य होतं. आता बहुधा मीच नको नकोसा झालो होतो. एक काळ असाही होता, जेव्हा 'यासम हाच' असा काहीसा होतो मी, सगळ्यांना आणि तुलाही हवाहवासा.! कित्ती दिवस झाले ना गं, माझ्या नजरेला नजर मिळवणं तर दूरच, तू माझ्याकडे नीट पाहिलं ही नाहीस. पण मी मात्र प्रत्येक तारखेला तुला डोळेभरून न्याहाळायचो, आणि आजारामुळे दिवसागणिक खंगत जाणाऱ्या तुझ्या प्रकृतीला पाहून आतल्या आत रडायचो. तू निदान एकदा तरी माझ्याकडं पहावं म्हणून धडपड करायचो. पण दुर्लक्षित राहणं हे बहुतेक माझ्या पाचवीलाच पुजलेलं होतं, आणि आत्ता ते सगळं काही तुला सांगून तसा काही उपयोग ही नव्हता.!🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..