बातमी

त्याच्या शोधासाठी सुरू असलेला माझा प्रवास शेवटी त्याच्या आत्महत्येच्या बातमीवर येऊन थांबला, आणि 'पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले..'! ही त्याची कॉलरट्यून मात्र माझ्या मनात कायमस्वरूपी घर करून बसली.

त्याच्या शोधात मी त्याचं घर गाठलं होतं. घर बंद आणि बाहेर भलंमोठं गंजलेलं कुलूप दिसलं. तिथं त्याच्या उंबरठ्याशी थांबून मी पुन्हा एकदा त्याचा नंबर डायल केला, पण पुन्हा तेच 'आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे.'! दुपारची वेळ होती.‌ आजूबाजूला ब-यापैकी सगळ्या घरांचे दरवाजे बंद दिसत होते. आता नेमकं काय करावं, ते मला काहीच सुचत नव्हतं. तितक्यात सहज माझं लक्ष बाजूच्या तुळशी वृंदावनाकडे गेलं. याआधी मी आलो होतो, तेव्हा प्रत्येक वेळी ती तुळस मला ताजीतवानी दिसली होती, पण आज ती पुर्णपणे निष्पर्ण, सुकलेली दिसली. आजही भेट व्हायची मुश्किल दिसते आहे, म्हणून मी त्या जेमतेम दोन तीन पाय-या उतरू लागलो, तसा मला बाजूच्या एका लोखंडी गेटमधून कोण हवंय आपल्याला.? अशी हाक ऐकू आली. त्यावर मी म्हणालो की, इथं जे गृहस्थ राहतात ना, त्यांचा माझा थोडा परिचय होता, पण मध्यंतरी बरेच दिवस भेटही झाली नाही, आणि त्यांचा फोनही बंद येतोय, म्हणून म्हटलं की थेट घरीच भेट घेऊयात. त्यावर तो लोखंडी गेटच्या आतील गृहस्थ थोडा गंभीर झाला, आणि म्हणाला की, तुम्हाला खरंच काहीच माहीत नाहीये काय.? मी फक्त नकारार्थी मान डोलावली. तसं त्या गृहस्थाने आणखी काही न बोलता गेट उघडून मला आतमध्ये घेतलं, आणि आम्ही तिथल्या कट्ट्यावर बसलो. बराच वेळ ते गृहस्थ काहीच बोलत नव्हते. पण जेव्हा अचानक बोलू लागले, ते शब्द ऐकून तर माझी वाचाच बसली. पेपरात बातमी आली होती की ओ. मनोरुग्णाची घरातील पंख्याला लटकून आत्महत्या. २-३ दिवस घर बंद अवस्थेत होतं. फोनही बंद होता. त्याच्या कामावरची लोक त्याला शोधत आली, तेव्हा हे सगळं ध्यानात आलं.  तब्बल एक दोन नाही, तर तीन दरवाजे तोडून आत जायला लागलं. त्याचं वजन किती कमी होतं, त्याचं लटकलेलं प्रेत पाहून वाटत होतं की, बिचा-याची जीव जाताना किती तळमळ झाली असेल. मध्यंतरी त्यानं सगळं घर पांढ-या रंगाने रंगवून घेतलं होतं. त्या भिंतीवर बॉलपेननं लिहिलेलं काहीतरी अस्पष्ट असं दिसत होतं. आत्महत्या, ॲक्सिडेंट, हार्ट अटॅक, चिमणी, खुशबू, स्वप्नं, कुठेच फुलं नसलेली नुसती पानं पानं रेखाटलेली वेल आणि आणखी ही बरीच शब्द. पण पुर्ण असं एखादं वाक्य कुठेच दिसत नव्हतं. कुणीही कुठेही हात वगैरे न लावता सर्वात आधी पोलिसांना फोन केला. अगदी हाकेच्या अंतरावर असलेले पोलिस ही एक ॲम्ब्युलन्स घेऊन तात्काळ हाजीर झाले. पंख्याला लटकलेलं प्रेत खाली काढलं. लागलीच शवविच्छेदनासाठी पाठवलं, आणि पोलिस मंडळी बाकी किरकोळ चौकशी करत मागे थांबले. 

पोलिस - याला कोणी मागे पुढे.?

लोक - आई वडील, मोठा भाऊ आहेत, पण ते दुसरीकडे राहतात.

पोलिस - मग हा इथे एकटाच का.?

लोक - याचं कुणाशी तसं पटत नव्हतं. थोडा वेडसर होता हा. बहुतेकदा तर याला तोंडावर हात धरून एकटाच बोलत बोलत, हसत जाताना ही पाहिलंय आम्ही.?

पोलिस - एकटाच बोलायचा.!? कधी काही ऐकलंय कुणी की, तो नेमकं काय बोलायचा.?

लोक - घरी रहा, काळजी घ्या, चिमणीकडे लक्ष दे, दुपारी तासभर झोप घे, मी संध्याकाळी नेहमीसारखा वेळेत येईन, वगैरे वगैरे.

पोलिस - म्हणजे याच्या घरी आणखी कुणीतरी आहे.

लोक - नाही साहेब. घरी कुणीच नाही. रात्रीच्या वेळीही घरातून खूप उशीरापर्यंत एकट्यानेच हसण्या बोलण्यचे आवाज ऐकू यायचं, पण असं वाटायचं की आत कुणीतरी आहे.

पोलिस - हा एकाकी का रहायचा.?

लोक - याचं लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती, पण अजूनही काही मूलबाळ नव्हतं. तसं सगळं काही ठीक होतं, पण जसजसा वैवाहिक कलह वाढत गेला आणि आपली फसवणूक झालीय, हे त्याच्या लक्षात आलं, तसतसं त्याचं हे असं विचित्र वागणं सुरू झालं. आणि गेल्या ४ वर्षांपासून हा एकटाच राहत होता. साहेब, आत्ताच काही महिन्यांपूर्वी याचा घटस्फोट ही झाला होता. आता तर एकटा जीव अगदी सुखी झाला होता. पण तितक्यात त्यानं हे असं पाऊल का उचललं कुणास ठाऊक.?

पोलिस - तुम्हीच तर म्हणत आहात ना की वेडपट होता तो. मग त्याच वेडाच्या भरात त्यानं असं केलं असावं.

लोक - कुणास ठाऊक.? 

या वेड्यामुळे आपल्यामागे विनाकारण काही झडती नको, म्हणून हळूहळू एकेक करून सगळे शेजारी पांगले. हवालदार लोकांनी सा-या घराची झडती घेतली. एक जीन्स, चार कुर्ता शर्ट, दोन अंडरवियर, दोन टॉवेल, यापलीकडे घरात एकाही कपड्याचा मागमूस नव्हता. मोबाईल चार्जर दिसत तर होता, पण मोबाईल कुठेच नव्हता. सोप्यातली तिजोरी उघडली असता, त्यात एक भल मोठा गुलाबी रंगाचा टेडी दिसला, बाकी सगळी तिजोरी रिकामीच. डागडुजी सुरू असलेलं घराचं काम अर्धवट सोडलेलं दिसत होतं. स्वयंपाक खोलीत ही उपडी पडलेली सगळी भांडी धूळ खात होती. गॅसच्या बर्नर वरही धूळ साचली होती. घराला भरपूर प्रमाणात वाळवी लागल्याचेही दिसत होते. किचनच्या ओट्यावर फक्त एकच डबा भरलेला दिसत होता, तो म्हणजे मीठाचा. लागूनच असलेल्या देवघरात फक्त एकच मुर्ती दिसत होती, ती सुद्धा बाळकृष्णाची. पोलिसांना काहीच कळत नव्हतं. एव्हाना त्याच्या आईवडिलांना निरोप मिळाला होता, आणि त्यांच्या हंबरड्याने सगळं घर हादरून जात होतं. पुढल्या दिवशी शवविच्छेदन अहवालात आत्महत्या, मनोरूग्ण, गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता, वगैरे वगैरे हायलाईट केलं होतं. आता पुढे आणखी काही ऐकण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती. माझे डोळे कधीचे वाहत होते. म्हणून त्या गृहस्थाला मी हात करून थांबवलं, आणि तिथून निघाताना इतकंच बोललो की, सर.., तो मनोरुग्ण नव्हता.! हात जोडून त्यांना नमस्कार केला. गेटच्या बाहेर आलो. पुन्हा एकदा त्याच्या घराच्या दाराला लावलेल्या त्या गंजलेल्या कुलूपाला आणि सुकलेल्या तुळशीला पाहून मी तिथून निघालो.!🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ 💔

#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..