शब्दसखा
चार माणसात राहूनही हे असं शब्दांशी खेळणं एखाद्याला जमत असेलही बहुतेक. पण मला तर नेहमी एकांतातच ही शब्द गाठ पडतात. मग विशेष स्थळ, काळ, वेळ यातलं काहीच लागत नाही. एकटं राहणं, एकाकी पडणं हे चांगलं की वाईट माहीत नाही, पण जिथं आपल्यासाठी कधीच, कुणीच नसतं ना, तिथं शब्द आपली वाट पाहत उभे असतात, फक्त आपल्याकडे ती नजर पाहिजे. कुणी आनंदी मनाने आनंदाचं गाणं लिहितो, तर कुणी दुःखी कष्टी मनाने रडगाणं लिहितो. आपली जशी मनस्थिती तसे शब्द आपोआप कागदावर उतरत जातात. पण कधी कधी त्रासही खूप होतो हो, कारण दोन चार ओळीत आपण आपल्या आयुष्यातला एखादा महत्त्वाचा प्रसंग अधोरेखित करून जातो, आणि वाचाणारा फक्त एक चारोळी म्हणून वाचून लगेचच पुढच्या पानावर जातो. आपण लिहिलेलं क्वचितच एखाद्या मनाचा नेमका ठाव घेत असतं. तेच एक तेवढं या आपल्या लिहिण्याचं सुख, बाकी सगळं व्यर्थ.!
#आयुष्य_वगैरे #अडगळ