प्रेम रोग..
मला मरून आता जवळपास दोन तास व्हायला आलेत. मी माझ्या उशाशी बसून माझ्या डेड बॉडीकडे पाहतो आहे. बाहेर व्हरांड्यात बसलेल्या माझ्या आईला याची तीळमात्र ही कल्पना नाही. दादा पहाटे लवकर उठून माझ्यासाठी चहा नाश्ता आणायला घरी गेला आहे. आता तो येताना सोबत माझ्या दोन मुली, इच्छा आणि आकांक्षा यांनाही घेऊन येणार आहे. माझी बायको नेहमीसारखं घर सांभाळणार आहे, आणि जमल्यास संध्याकाळी एखादा फेरा मारून मला भेटून जाणार आहे. आता तर माझं मलाही काहीच आठवत नाहीये की, मी इथं कधी पासून ॲडमिट आहे. दारू पिणं न थांबल्यामुळे माझी प्रकृती आणखीन जास्तच खालावलेली आहे. काविळ रक्तात मिसळून गेल्या खूप दिवसांपासून मी कोमात आहे. माझा बाप माझ्या लहानपणीच वारला. तेव्हा पासून आई आणि दादानं माझा सांभाळ केला. मनाविरुद्ध माझं लग्नही लावून दिलं. पण म्हणून मी कधी बायका पोरांना ताप दिला नाही, रक्ताचं पाणी करून त्यांचं जमेल तेवढं लाड केलंच. पण काही केल्या माझं हे दारूचं व्यसन सुटलं नाही, आणि शेवटी ते सुटलं, तेव्हा मी सुद्धा या जन्म मरणाच्या फे-यातून सुटलो. माझी आई मला एक वाक्य सारखं सारखं बोलून दाखवायची की, मडं उचललं तुझं. नीट शहाण्यासारखा वाग की रे आतातरी. जिनं तुला कवडीचीही किंमत दिली नाही, त्या सटवीला विसरून जा की आता. का तिच्या आठवणीत जीवाचं हाल करून घेतोस. तेव्हा मी आईकडे पाहून हसायचो आणि पुन्हा आई म्हणायची की, बघ..बघ.. ती सटवी अजूनही हसवते आहे तुला.
दादा आला एकदाचा. गेल्या कित्येक दिवसांपासून तो दररोज सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता जेवण आणतोय, पण त्यातला एक कणही मी खाल्ल्या पिल्याचं मला आठवत नाही. इच्छा, आकांक्षा माझ्या बाजूला येऊन थांबल्या. इच्छाची भिरभिर नजर उत्सुकतेने इकडेतिकडे फिरत होती. तर आकांक्षा माझ्या तोंडावर लावलेल्या मास्ककडे एकटक पाहत होती. तितक्यात डॉक्टर त्यांच्या टीमसह आत आले, आणि किरकोळ तपासणी केल्यासारखं करून लगेचच दादाला थेट सांगून टाकलं की, तुमचा माणूस आता राहिलेला नाहीये. तसा मी दोन तासांपूर्वीच मेलो होतो, पण आत्ता ऑफिशियली मृत घोषित झालो. दादाचं डोळे टचकन पाण्यानं भरलं. त्यानं माझ्या दोन्ही लेकींना जवळ ओढलं, आणि लागलीच दरवाज्याशी उभ्या असलेल्या माझ्या आईनं हंबरडा फोडला. मी अजूनही तिथंच माझ्या उशाशी बसून होतो. नेमकं कुठे, काय आणि केव्हा चुकलं या प्रश्नाचा शोध घेत होतो. पण वेळ निघून गेल्यावर आलेलं शहाणपण विनाकामाचं असतं. मी स्वप्नांच्या मागे धावत राहिलो हे चुकलं.? की मी स्वप्नं पाहिली हे चुकलं.? यातलं मला काहीच कळत नव्हतं.!🎭
#आयुष्य_वगैरे #अडगळ #एकतर्फी 💔