पल भर के लिये कोई हमें..
माझ्या कोर्टाच्या सुट्ट्या संपून आता जवळपास महिना पूर्ण झाला. सगळं काही नेहमीसारखं सुरू आहे. अधेमधे एखादी पावसाची सर कोसळून जात आहे. पण पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला, म्हणजे जूनमध्ये जो काही तुफान पाऊस बरसला ना, तसा पाऊस पुन्हा अजून काही झालाच नाही. दिवसभर काळ्याभोर ढगांची पळापळ मात्र सुरूच असते. निळ्याशार ढगांची पार्श्वभूमी घेऊन पळापळ करणारी ही काळभोर ढगं पाहत बसणं, म्हणजे ही एक प्रकारचं सुखचं. या दिवसात माझं तसं हे ठरलेलं रूटीन. पण का कुणास ठाऊक सुट्टीनंतर कामावर आल्यापासून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आजही काम आवरल्यावर नेहमीसारखाच घरी येऊन बसलो होतो. चहाचा वाफाळता कप माझ्याकडे डोळे लावून बसला होता. अंगणात नुकत्याच टाकलेल्या एका छोट्या पत्र्याच्या शेडच्या अडगळीत दोन चार चिमण्यांचं अतिक्रमण सुरू होतं. पण हे अतिक्रमण झाल्यापासून त्यांची चिवचिव हेच मला माझ्या घराच्या जिवंतपणाचं एकमेव कारण वाटत होतं. त्यातच अगदी काही दिवसताच आजूबाजूला पसरलेल्या हिरवळीला पाहून मी या विचारात हरवून गेलो होतो की, या पावसाच्या पाण्यात नेमकी काय जादू असते कुणास ठाऊक.? तितक्यात मला शेजारच्या घरातून रेडिओवर लागलेल्या एका गाण्याचा आवाज ऐकू आला, क्षणार्धात मी काही दिवस मागे गेलो, आणि मला तो काहीतरी चुकल्यासारखं वाटणारा धागा सापडला. तसा पट्कन मी आधी चहाचा कप रिता केला, आणि पुन्हा गाणं ऐकण्यात रममाण झालो. 'पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले.., झूठा ही सही.!" हे गाणं म्हणजे त्याची कॉलर ट्यून होती. पण कोर्टाचं कामकाज नियमित सुरू झाल्यापासून तो अजूनही का दिसला नाही, हे मला उमगत नव्हतं.
पुढच्या दिवशी कोर्टात गेल्यावर काम आवरून मुद्दाम वाट वाकडी करून मी त्या नेहमीच्या टपरीवर गेलो, जिथं कायम आमची भेट आणि गप्पा व्हायच्या, पण तिथंही भरपूर वेळ बसूनही ना त्याची भेट झाली, ना तो तिथून आलेला गेलेला दिसला. टपरीधारकाकडेही चौकशी केली असता त्यानेही विशेष काही आठवत नसल्याचे सांगितले. नेमकं काय बरं झालं असेल, हे मला कळत नव्हतं. खूप महिन्यांपूर्वी एकदा मी त्याचा नंबर डायल केला होता, पण तो सेव्ह न केल्यामुळे आता सगळा प्रॉब्लेम झाला होता. हताश मनाने तिथून घरी परतलो, पुन्हा चहा, आजूबाजूला हिरवळ, आणि सोबतीला काळ्याभोर ढगांची नुसती पळापळ. पण आज रेडिओवर ते गाणं लागलेलं नसूनही कानात ते "पल भर के लिये कोई हमें.. " गाणं वाजत होतं. आता मन जास्तच कासावीस झालं होतं. म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून माझी डायरी मी चाळू लागलो, आणि त्यात मला त्याचा नंबर मिळालाच. तसा लगेचच मी तो डायल केला, पण 'आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता, तो सध्या बंद आहे." या पलीकडे काहीच ऐकू येत नव्हतं.
पुढच्या दिवशी मी आदल्या दिवशीचं सगळं रूटीन पुन्हा फॉलो केलं, पण सगळं व्यर्थ. आता गेल्या कित्येक दिवसांपासून मी हेच रूटीन फॉलो करतो आहे, पण ना त्याची भेट होते आहे, ना संपर्क.! मध्यंतरी एक दोनदा त्याच्या घरी गेलो होतो, आता एके दिवशी थेट त्याच घर गाठायचं, असं मी ठरवलं. पण का कुणास ठाऊक, काही केल्या हे 'पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले.., झूठा ही सही.!" हे गाणं मनातून जात नाहीये.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ