दुष्काळ
#पाऊस कधी हवाहवासा वाटलाच नाही. आई सांगते त्याप्रमाणे माझ्या व्यसनी काकाच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर बरीच वर्षे #आईबाबा वाड्याच्या अगदी मागील बाजूस असलेल्या कौलारू खोलीत रहायला होते. तिथं उन्हाळा-हिवाळा कसाबसा निघून जायचा, पण पावसाळा अगदी नको नकोसा व्हायचा म्हणे. पावसाळ्याची चाहूल लागली की, आईला प्रपंचाची काळजी लागलेली असायची. पावसाच्या पाण्यापासून काय काय आणि कसं वाचवायचं.? खरी आब्दा तर तेव्हा व्हायची म्हणे, जेव्हा मिलमध्ये बाबांची रात्रपाळी असायची, आणि आई, आम्ही दोन भावंडं घरी असायचो. तेव्हा आईनं सगळं काही कसं निभावलं असेल, याचा आत्ता विचार ही करवत नाही.
ती खोली तशी खूप छोटी आणि बशी सारखी खोलगट होती. उंब-यातून आत पाऊल टाकलं की जवळपास एक फूट खाली जमिनीवर पाय टेकायचा. दारही ब-यापैकी ठीकठाक, एक दिवळी आणि कौलांच्या फटीतून आत येणारं सर्व काही.! याठिकाणी सर्वकाही म्हणजे उन, वारा, पाऊस, पालापाचोळा, धूळ, माती, किडा, मुंगी वगैरे वगैरे. एका बाजूला सरपणाचा ढीग, तिथंच बाजूला एक रॉकेलचा कॅन, वर तुळीला टांगेलला एक कंदील, आणि दिवळीत एकमेकांच्या साथीनं बसलेल्या २ रॉकेलच्या चिमण्या. एकसारखा पाऊस सुरू झाला की या खोलीत गुडघाभर पाणी साचायचं. सगळं सरपण भिजून जायचं, सगळीच भांडीकुंडी पाण्यावर तरंगत असायची. दिवळीत असलेली एक रॉकेलची चिमणी आणि तुळीला टांगलेला कंदील यांच्या मिणमिणत्या उजेडात घरी एकटीच असलेली आई आम्हा दोघां भावंडांना छातीशी बिलगून, तिच्या लग्नाच्या संसार सेटातून भेट म्हणून आलेल्या लोखंडी खाटावर कुडकुडत बसलेली असायची.
आता तिच्या लग्नाच्या वेळेचं काहीच शिल्लक नाहीये. ना भांडीकुंडी, ना कसला कपडालत्ता, ना लग्नातला एखादा फोटो, ना आणखी काही. आता शिल्लक आहेत त्या फक्त आठवणी.! या पावसामुळे आईच्या आणि आम्हां भावंडांच्या लहानपणीच्या कित्येक आठवणी कायमच्या वाहून गेल्या आहेत. इथं कधी कधी बालपणीच्या आठवणी असा हॅशटॅग ट्रेंड करतो ना, तेव्हा मनाला खूप वाईट वाटून जातं की, आपण लहानपणी कसे दिसायचो हे आपल्याला माहीतच नाहीये, आपला बालपणीचा एकही फोटो आपल्याकडे नाहीये.
सन १९८६, १९८७ ला #दुष्काळ वगैरे पडला होता म्हणे. ती काही वर्षं आईसाठी तशी सुखाची गेली. पण पावसावर अवलंबून असलेली शेती मात्र त्या २ वर्षांत पुर्णपणे वाया गेली. तेव्हा कर्जबाजारी झालेल्या बापाला त्यातून बाहेर पडायला पुन्हा बरीच वर्षे लागली. नेहमीप्रमाणे अधेमध्ये आईचा एखादा दागिना गहाण ठेवून किरकोळ उधारीवर घर गाडा चालायचा, आणि सणासुदीच्या दिवसात आणखी उधारी उसनवारी करून काही दिवसांसाठी का असेना, पण बाप आईचा दागिना सोडवून आणायचा.!🎭
#आयुष्य_वगैरे #अडगळ
#गंध_आठवणींचा
#त्याच्या_मनातलं