ही तुझी आठवण

                    या सुट्टीच्या दिवसातील एकेक क्षणही ना कित्ती अंगावर येतो. मग मोकळ्या अंगणाकडे पाहत घराच्या उंबरठ्यावर मी तासनतास बसून राहतो. तिथं तुझ्या हातची, अगदी तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर साधी, शिंपल रांगोळी शोधतो. किचनमध्ये भांडी वाजल्याचा भास झाला की, पुन्हा किचनमध्ये जाऊन बसतो. सगळं किचन कसं सामसूम असतं. सगळी भांडी 'हाताची घडी तोंडावर बोट' या अवस्थेत माझ्याकडे पाहत कुजबुजत असतात. घराच्या अगदी मागच्या छोट्याशा खिडकीतून येणारी हवेची झुळूक, प्रत्येक चौकटीला अडकवलेले, तू स्वतः शिवलेले मऊ तलम पडदे, हे ना, मी आतबाहेर करत असताना सतत मला बिलगत असतात. मला तू बिलगायचीस ना, अगदी तसंच. तसं सगळं घरच तुला आवडायचं, पण तुझ्या विशेष आवडीच्या जागी, मग मी जाऊन बसतो. तुझ्या आवडीच्या मालिका, गाणी पुन्हा पुन्हा पाहतो ऐकतो. नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी नळाला पाणी यायच्या आधी नळ खोलून ठेवतो. जेमतेम काल भरलेलं सगळं पाणी ओतून, नवीन पाणी भरतो. त्यात तुरटी फिरवतो. सगळं पाणी भरून झालं की, पाणी बंद होण्याआधी नळाखाली पाय ठेवून बसून पाण्यात खेळत राहतो, तू सुध्दा असंच खेळायचीस ना. मग पाणी बंद झालं की पाण्याचा शेवटचा थेंब पडेपर्यंत तिथंच बसून राहतो. पुन्हा आत हॉलमध्ये येतो. सुट्टीच्या दुपारी तिथं बसून आपल्या होणा-या गप्पा आठवतो. तुला हसविण्यासाठी मी सांगितलेला एखादा किस्सा आठवतो, आणि त्यानंतरचं तुझं ते खळखळून हसणं आठवतो. हसून हसून डोळ्यात पाणी यायचं तुझ्या. मिस्टर... बास की ओ..! कित्ती हसवता हो तुम्ही.! मग बोलत बोलत हलकेच तुझा डोळा लागतो, आणि मीसुद्धा तसाच तुझ्या बाजूला, तुला न्याहाळत पडून राहतो. 

                    हळूहळू सांजवेळ घरात डोकावू लागते. मी अंगणात तांब्याभर पाणी शिंपडतो. देवापाशी दिवा लावून, मस्त सुवासिक अगरबत्ती लावतो. तो सुवास श्वासात भरून घेताना पुन्हा तुला आठवतो. देवापाशी घंटी वाजवताना तुझ्या हातातील बांगड्यांचा होणारा नाजूक आवाज आठवतो. मग सात वाजून गेले की, पुन्हा माझी पावलं किचनकडे धावतात, जेव्हा मला तू भाकरी थापत असल्याचा भास होतो. तव्यावर खरपूस भाजलेल्या भाकरीचा सुवास मग घरभर फिरतो, आणि सोबतीला एखाद्या भाजीला दिलेली फोडणी, तळलेला उडीद पापड यांचं कोरस.!🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ  #गंध_आठवणींचा 

#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..