पतंग

                        पतंगाला मांजावर, मांजाला हातावर आणि हाताला मांजांची चक्री धरलेल्या हातावर भरवसा होता. पुढं काय होईल, याचा यत्किंचितही विचार न करता सगळं काही फक्त 'भरवसा' या भासमान आणि परिस्थितीनुरूप बदलणा-या तत्त्वावर अवलंबून होतं. आता परिस्थिती किंचित बदलू लागली. हवेचा वेग आणि दिशा बदलली. थोडेफार काळे ढग जमले. पतंग भरकटू लागला, पण त्याला मजबूत मांजावर विश्वास होता. मांजा ही भक्कम हातांची साथ म्हणून निवांत होता. पण तितक्यात मांजांची चक्री धरलेला हात अचानक चक्री टाकून पळाला. हातांची एकच तारांबळ उडाली. पतंग ही अचानक जोरजोरात हेलकावे खाऊ लागला. चक्री सांभाळत, पतंग आवरत, कधी ढिल देत, तर कधी ताणून धरत असताना हळूहळू हात रक्तबंबाळ होऊ लागले. काही वेळापूर्वी चक्री धरलेले हात तिथंच आडोशाला उभे होते, पण समोर येऊन मदत करत नव्हते. हळूहळू मांजांचा गुंता वाढत गेला, चक्री गटांगळ्या खात पायाशी तडफडत पडली होती. हातही पुरता रक्तबंबाळ झाला होता. आजूबाजूला चक्री धरायला हात असलेले पतंग आता जोरजोरात हसू लागले होते. मी माझा बेभान झालेला पतंग, रक्तबंबाळ हात आणि मांजांचा झालेला गुंता हे सावरण्यात गुंतलो होतो. तितक्यात मांजाने ही हातांची साथ सोडली. नजरेला दिसेल तिथपर्यंत मी माझ्या पतंगाची फरफट पाहत तिथंच उभा होतो. आता माझं हात रक्तबंबाळ अन् रिकामे झाले होते. मांजांच्या गुंत्यात चक्रीही माझ्या पायाशी निवांत पडली होती. हळूहळू आकाश मोकळं झालं. बाकी पतंग ही आता आधीसारखेच निवांत हवेत उडू लागले. ते आडोसा धरून उभे राहिलेले हात पुन्हा हळूच माझ्याकडे सरसावले. मला आता सावरायचं तर नव्हतंच आणि झालेला गुंता ही आवरायचा नव्हता. पण माझ्याच रक्ताने भिजलेली, रक्तबंबाळ मांजाने भरलेली ती चक्री, माझ्या रक्तबंबाळ हातात दिली गेली. अन् कानात हळूच सांगितलं की, आता पुढे काय करायचं ते तुझं तू पहा.!🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ #गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..