विहीर

दुपारचं जेवण आटोपलं, तेव्हापासूनच शाम्या विहीरीवर बसून होता. निवडक भांडी धुवून आईनं स्वयंपाकघरातच पाठ टेकली होती, तर बाप अगदी मुख्य चौकटीवरच डोकं ठेवून निवांत झोपी गेला होता. दुपारची वेळ असूनही आता हवेत गारठा भरपूर प्रमाणात जाणवत होता. थंडी हळूहळू जोर धरू लागली होती. केंद्र हरवलेला रेडिओ कधीपासून खरखरत सुरू होता, पण तो आवाजही सवयीचा असल्याने तो बंद करायला माझा हात तिकडं जातच नव्हता. बाहेर खुंटीला टांगलेली लांबलचक पाईपांची जुनाट घंटी हवेच्या झोक्यावर अलगद डुलत होती. कोणत्याही जनावरांशिवाय असणारा जुना गोठा अजूनही जनावरांच्या शेणामुताच्या आठवणी जपत उभा होता. शाम्याचा एक मोठा भाऊ बायका पोरांसहीत शहरात राहतो. अधेमध्ये इकडं येऊन जातो. तसा शाम्या दररोजच विहीरीवर जाऊन बसतो. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी मध्यरात्री ही.! शाम्याच्या आईला फार कमी दिसतं, आणि बापाला ब-यापैकी काही ऐकूच येत नाही. म्हणून मग शाम्या मनातलं काही बोलायचं असलं की विहीरीवर जाऊन बसतो आणि एकटाच बडबडतो. आज हे केलो, आज ते गेलो, उद्या ते करणार वगैरे वगैरे. शाम्या तसा चांगला माणूस. आता समाजाच्या दृष्टीने चांगला माणूस म्हणजे कोण असतो, तसा तो चांगला माणूस, पण नियती पुढे हरलेला. आणि नियती पुढे हरला तसा त्यांनं फक्त आईबाप हेच सर्वस्व मानलं आणि त्यांच्या सोबतीने आला दिवस ढकलू लागला. विहीरीवर आला की स्वतःशी बोलता बोलता शाम्या अचानक रडू लागायचा. पण पुन्हा स्वतःला धीर द्यायचा की निदान आई बापासाठी तरी आपण जगलच पाहिजे, स्वतःच दुखः बाजूला ठेवून आईबापाला जपलं पाहिजे. आता या वयात जर मी सुद्धा त्यांना सोडून गेलो तर त्यांची किती हेळसांड होईल या विचाराने तो जास्तच रडायचा. आपलं आईबाप जेव्हा आपल्याला सोडून देवाघरी जातील, तेव्हा आपणही या जगाचा कायमचा निरोप घ्यायचा, हे त्यानं मनोमन ठरवलं होतं. आता सांज व्हायला आली होती. आईबाप अजूनही झोपेतच होते. त्यानच जाऊन त्यांना जागं केलं. आई लगेचच खडबडून जागी झाली आणि थोड्या वेळाने तिने लागलीच चहाही टाकला. बाप नेहमीच्या ठिकाणी खुर्ची टाकून पाय वर घेऊन बसला. शाम्या चहाची वाटी हातात घेऊन पुन्हा विहीरवर येऊन बसला.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️ #अडगळ 🫂

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..