सासरे बुवा

दिनांक ०६/०१/२०२५. 

आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिच्या वडिलांशी थेट बोलणं झालं.

सकाळची वेळ. किरकोळ कामासाठी मी सुट्टी काढली होती आणि मार्केट मधून जात होतो. महापालिका गेटजवळ आमची नजरानजर झाली, आणि मी सहज "नमस्कार" असं बोलून पुढे निघून जात होतो. पण तितक्यात त्यांनी मला हाक मारली, आणि तुम्हाला कुठंतरी पाहिलं आहे, पण नीटसं आठवत नाहीये असं म्हणाले. मग मी म्हणालो की, अहो.. तुमच्याच अंगणात, तुमच्याच गल्लीत तर लहानाचं मोठं झालोय आम्ही. मग मी माझं नांव, पत्ता सांगितला आणि त्यांनी मला ओळखलं. अरे... तू फारच दुर्लक्षित राहिलास रे.! हो..‌ बरोबर आहे, आठवलं मला, तू नेहमीच आसपास असायचा. आनंदाचा मुलगा यावर तर त्यांच्या चेहऱ्यावरची चमक बघण्यासारखी होती.‌ मी ओळखतो आनंदाला, अधेमध्ये भेटणं बोलणं होतं असतं आमचं. आम्ही अगदी रस्त्याला लागूनच उभे होतो, म्हणून मी त्यांच्या हाताला पकडून त्यांना बाजूला घेतलं. मग त्यांनी मला खालून वरपर्यंत पाहिलं आणि म्हणाले की, किती मोठा झाला आहेस, उंची तर माझ्यापेक्षाही जास्त आहे तुझी. कुठे असतोस, काय करतोस, सगळं बरं आहे ना. त्यांनी अजूनही माझा हात सोडला नव्हता. आणि त्यांनी तो सोडावा, असं मलाही वाटत नव्हतं. मी त्यांच्या डोळ्यात एकटक पाहण्यात हरवलो होतो. 

                 खूप खूप बोललो आम्ही. मी त्यांना म्हणालो की इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच तुमच्याशी असं थेट बोललो आहे, आणि अगदी लहानपणापासून नेहमी तुम्हाला पाहताना तुमच्याबद्दल जी भीती वाटायची ना, ती आज कुठल्या कुठे पळाली आहे. यावर ते खूप हसले. मी असाच आहे आधीपासून असं म्हणाले. तुम्हाला मी दररोज दत्त मठीत पाहतो, हे मी त्यांना सांगितलं तेव्हा ते आणखीनच खुश झाले. आणि मी तिथं दररोज रात्री आठ वाजता असतोच असतो, आणि दर बुधवारी प्रसाद असतो, एकदा नक्की या, गेल्या बुधवारी मी प्रसाद दिला होता असं सांगितलं. खूप आनंदी वाटत होते बोलताना. त्यांच्या कामाबद्दल, कामातील प्रामाणिकपणा बद्दल अगदी अभिमानाने सांगत होते. अहो... ३४ वर्षे एकाच ठिकाणी सर्विस करून रिटायर झालोय मी, असं म्हणाले.‌ संपूर्ण महाराष्ट्रात मी एकमेव आहे की, जो ज्या ठिकाणी कामावर रुजू झाला, त्याच ठिकाणी रिटायर झाला, इतरत्र कुठेही बदली न होता. कधी कुणाचा एक रुपया घेतला नाही, प्रामाणिकपणे फक्त काम, काम आणि काम. या गोष्टीवर मी त्यांचा हात आणखीन गच्च पकडला आणि म्हणालो की.. व्वा.. किती भारी गोष्ट आहे ही.! त्यांनीही लागलीच त्यांच्या हातातील सायकल स्टॅण्डवर लावली दोन्ही हातांनी माझे हात गच्च पकडले. का कुणास ठाऊक पण नकळत त्यांचे डोळे पाणावले होते, आणि मला ते त्यांच्या चष्म्यातून स्पष्ट दिसत होतं. म्हणून मी लगेचच माझा उजवा हात त्यांच्या खांद्यावर टाकला आणि म्हणालो की, अहो... पण तुमच्या डोळ्यात पाणी का.? काय झालं.? माझं काही चुकलं काय.? यावर ते म्हणाले की, छे छे.. तुमचं काही चुकलं नाही. हे तर आनंदाश्रू आहेत. जे आज थोडंसं मनमोकळं बोलायला मिळालं म्हणुन उड्या मारून बाहेर पडले. मग मी त्यांना म्हणालो की, तुम्ही कित्ती भारी आहात. किती मस्त वाटतंय तुमच्याशी बोलताना, असं वाटतच नाहीये की आपण पहिल्यांदा भेटतोय आणि बोलतोय. यावर ते म्हणाले की तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बोलणं आवडलं मला, म्हणून तर मी इतक्या सहजपणे बोलू शकलो. आणि शरदराव, कुणाच्याही समोर माणसाच्या डोळ्यात पाणी येत नाही हो. काहीतरी ऋणानुबंध नक्कीच असतील, म्हणून आज हे सगळं घडून आलं. मी त्यांना चष्मा काढून डोळे पुसायला सांगितलं. त्यांनी डोळे पुसले. 

                 मग पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मी जात असताना त्यांनी मला त्यांचा नंबर दिला, आणि मला मिस्ड कॉल द्यायला सांगितला. नंबर द्यायला नको म्हणून मी माझ्याकडे बॅलन्स नाही असं सांगितलं, तर त्यांनी नंबर तोंडी सांगा, असं म्हणून नंबर सेव्ह करून घेतलाच. कोणत्याही बुधवारी नक्की या दत्त मठीत प्रसादाला, असंही सांगितलं. मी निघणारच इतक्यात त्यांनी पुन्हा एकदा माझ हात गच्च पकडला आणि म्हणाले की, महापालिकेत थोडं काम होतं माझं म्हणून मी इकडे आलोय. तुम्ही काय करता, कुठे असता वगैरे विचारलं. मी अमुक ठिकाणी काम करतो, आणि आज थोडं काम होतं म्हणून सुट्टी काढली आहे असं सांगितलं. तिन्ही मुलींना इंजिनिअर नवरा भेटलाय, असंही सांगितलं आणि तुमच्या भागात माझ्या एका जावयाचा प्लॉट आहे, हे ही सांगितलं. सगळ्या पोरापोरीचं अगदी सुरळीतपणे सुरू आहे हे ही सांगितलं. यावर मी म्हणालो की, देव चांगल्या माणसांची सोबत कधीच सोडत नाही. मग ते म्हणाले की, मी चांगला आहे की नाही माहीत नाही, पण कधी कुणाचं वाईट अजिबात चिंतलं नाही, हे मात्र खरं. मध्यंतरी माझा ऊस गेला, त्यावेळी मला माझ्या शेजारच्या शेतकऱ्यांनी पुर्ण सहकार्य केलं हे ही सांगितलं. शेजारच्या एका व्यक्तीची पाईपालाईन माझ्या शेतातून गेली, तेव्हा तो मला स्वखुशीने दहा हजार रुपये द्यायला आला होता, पण मी एक रूपयाही घेतला नाही, हे ही सांगितलं. आणि त्या व्यक्तीने अजूनही या गोष्टीची जाण ठेवली असल्याचं सांगितलं. 

                  त्यांचा उत्साह पाहून मला नवल वाटत होतं, म्हणून मी त्यांना म्हणालो की तुम्ही खरंच इतके वयस्क वाटत नाही हो. अगदी माझ्या वयाचे वाटताय मला.‌ यावर ते हसले आणि म्हणाले की माझं वय किती असेल हो.? मी म्हणालो बहुतेक ५८ किंवा ६०. यावर ते अजून जास्तच हसले आणि म्हणाले की ७४ रनिंग आहे सध्या.‌ मला गाडी वगैरे चालवता येत नाही. मी सायकलिंग खूप करतो आधीपासूनच, कारण यासारखा व्यायाम नाही. असं म्हणत असताना ते त्यांच्या सायकल कडे खूप कौतुकाने पाहत होते. त्यांना दुजोरा देत मी सुद्धा म्हणालो की, हो आठवतंय मला.. खूप खूप वर्षांपासून ही सायकल आणि तुमची जोडी जमली आहे. मी लगेचच त्यांचा बर्थडे माहीत करून घेतला. चला.. थोडं फ्रेश वाटेल म्हणून चहा घेऊयात असा मी खूप आग्रह केला, पण त्यांनी नकार दिला.‌ पुन्हा कधीतरी भेटल्यावर नक्की घेऊ, असं म्हणाले आणि मग कुठे त्यांनी माझा हात सोडला. त्यांनी हात सोडताच मी त्यांना माझ्या उजव्या हाताने मिठी मारली आणि म्हणालो की, काही काळजी करू नका. अगदी निवांत रहा. सगळं चांगलंच होणार आहे. यावर ते म्हणाले की, हो... हे मात्र अगदी खरं. मी कधीच कुणाचं काहीही वाईट केलेलं नाहीये, आणि हे माझ्या मनाला चांगलंच ठाऊक आहे. पुन्हा एकदा माझा हात हातात घेऊन त्यांनी गच्च पकडला, आणि पुन्हा भेटूयात असं म्हणून निघून गेले. त्यांच्याशी बोलताना मी तुझ्याशीच बोलतो आहे की काय असं मला सारखं वाटत होतं, त्यांच्या डोळ्यात बघताना तर एका क्षणासाठी असं वाटलं की समोर तूच तर उभी नाहीस ना.!? ते निघून जात असतानाही मी खूप उशीरापर्यंत त्यांना पाठमोरं पाहतच होतो, आणि विचार करत होतो की, तू अगदी सेम टू सेम तुझ्या पप्पांसारखीच आहेस..,‌अगदी कार्बन कॉपी.!

#आयुष्य_वगैरे #गंध_आठवणींचा #एकतर्फी ❤️

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..