एका (वाढ)दिवसाची गोष्ट..
अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधणा-या माणसाला
ते सुखही फार सहजासहजी कधीच मिळत नाही.!
सुरूवात नेमकी कुठून आणि कशी करावी, हे काहीच कळत नाहीये. तरीही फार फार मागे न जाता, मागील फक्त दोन तीन दिवसांवरच बोललेलं बरं. माझा वाढदिवस १५ जानेवारीला. अगदी लहानपणापासूनच घरी वाढदिवस साजरा करून कधीच माहीत नाही, आणि अजूनही कधीतरी मी स्वतः पुढाकार घेऊन सगळं काही केलं की, कधी कधी माझा आणि घरच्या इतर मंडळींचा वाढदिवस वगैरे साजरा होतो. लहानपणी आणि आत्ताही केक वगैरे कापायची परंपरा नसली तरी माझ्या लहानपणी वाढदिवसाच्या दिवशी आई मला आंघोळ घालायची. एखादा नवीन जोड घेतला असेल तर ठीक नाहीतर नुकत्याच गेलेल्या दिवाळीला घेतलेला ड्रेस मस्त स्वच्छ धुवून मला घालायची. त्यानंतर सर्वात आधी माझं औक्षण करायची, खूप माया करायची, दृष्ट काढून टाकायची आणि दृष्ट काढून टाकत असताना ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटत असायची. त्यानंतर चहा नाश्ता वगैरे झाला की जेवायच्या आधी मला घरगुती शेवयांची गोड खीर खाऊ घालायची. औक्षण करताना आईने माझ्या कपाळावर लावलेला टिळा मी दिवसभर मिरवायचो. खूप भारी वाटायचं. संध्याकाळी जेवताना पुन्हा काहीतरी गोडधोड, खासकरून माझी आवडती पुरणाची पोळी आणि त्यासोबत एखादी सुकी भाजी बटाटा किंवा वांगी वगैरे. हा झाला थोडासा पुर्वाध किंवा फ्लॅशबॅक वगैरे. आत पुन्हा आपण वर्तमानकाळात येऊ.
अगदी बालपणापासूनच मला जी खूप आवडायची आणि जी फक्त आपली व्हावी किंवा जिला फक्त आपल्यासाठीच देवानं धरतीवर पाठवलं आहे, असं मला वाटायचं, ती माझी कधीच झाली नाही. बाकी तिला हे सगळं माहीत होतं, ते विशेष. पण मी कधीच काहीच बोलू न शकल्याने सगळं अधुरं राहून गेलं. तरीही मी कधीच तिला विसरू शकलो नव्हतो. एक दिवसही असा जायचा नाही की मला तिची आठवण आली नाही. तेव्हा फेसबुकवर इतकी कडक privacy policy नव्हती, त्यामुळे अधेमध्ये तिच्या टाईम लाईनवर जाऊन फेरफटका मारून यायचो. पण तिथंही तिचा असा फोटो नव्हताच. कुणातरी हिरोईन अमृता रावचा वगैरे फोटो होता. पण बरं वाटायचं. तिचा वाढदिवस मला अगदी खूप खूप लहानपणापासूनच माहीत होता. पण कधीच तिला थेट wish करू शकलो नव्हतो. एकदा हिम्मत करून फेसबुकवर तसा happy birthday चा मेसेज मी केला होता, पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने पुन्हा तो नादही सोडला.पण तरीही मनात खोलवर कुठेतरी ती आणि तिच्या आठवणी ठाण मांडून होत्याच.
आता आम्ही मोठे झालो. तिनं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं. काही काळासाठी तर कॉलेजचं प्रतिष्ठित असं UR पदही भूषवलं. माझं मात्र शिक्षणात कधीच मन रमलं नव्हतं. मी आधीपासूनच प्रत्येक इयत्तेत रडतखडत पुढे आलो होतो. दहावी तशीच, बारावी ही तशीच आणि पुढे तर SY, TY ला अचानक कायमचा रामराम ठोकला. मला अगदी बालपणापासूनच अवांतर वाचनाची भयंकर आवड. त्यातच काय ते माझं मन खूप रमायचं. शिक्षण सोडल्यानंतर ही बरीच वर्षे ही आवड मी जपलेली होती.
एक दिवस अचानक घरात एक लग्नपत्रिका येऊन पडली. आता तिचं लग्न ठरलं होतं. खूप वाईट वाटलं. मी तेव्हा महिना काठी पंधराशे पगारावर एका CA कडे कामाला होतो, आणि तिचं लग्न ज्याच्याशी ठरलं होतं, तो इंजिनिअर. तसा तो आमच्याच गावचा, पण सध्या पुणे येथे एका मल्टि नॅशनल कंपनीत कामाला. लाखो मध्ये पॅकेज वगैरे. जिथं तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या तिथं जायची आणि तिला पहायची माझी खूप इच्छा होती, पण इथेही हिम्मत कमी पडली आणि मी गेलोच नाही. त्यारात्री खूप रडलो. एका घरात एका खोलीत अगदी आईच्या जवळ झोपून ही आईला कळू न देता खूप रडलो. अजूनही आठवतंय मला, कंठातून आवाज बाहेर यायला नको म्हणून मी शक्य तितकी चादर तोंडात कोंबून घेतली होती.
आता बरीच वर्षे उलटली होती. तरीही तिची गल्ली, तिच्या घराची खिडकी, तिच्या नेहमीच्या ये जा करण्याचा रस्ता, तिचा क्लास, तिची शाळा, तिचं कॉलेज, ज्याठिकाणी एका क्षणासाठी का होईना, पण तिची नजर माझ्यावर पडली होती, अशा प्रत्येक ठिकाणी माझं भटकणं अधेमध्ये सुरूच होतं.
आणि एके दिवशी अचानक मला फेसबुकवर एक मेसेज आला. क्षणभरासाठी मला काहीच कळत नव्हतं. पटकन आईकडे जाऊन मी आईला विचारलं की, आई मी नेमका जागाच आहे ना.? हा दिवस खरा आहे ना.? मी तू आपण सगळे स्वप्नात तर नाही ना.? आई म्हणाली की हा दिवस खरा आहे, तू मी आपण सगळे जागे आहोत, हे स्वप्न वगैरे काही नाही, सत्य आहे. पुढे आईनं विचारलं की, बाळा, पण नेमकं झालंय तरी काय.? यावर काहीच न बोलता, मी पुन्हा आतल्या खोलीत आलो. पुन्हा एकदा तो मेसेज नीट वाचला, त्या account चं नाव वाचलं.
Hi and so sorry...! तो तिचा मेसेज होता. मग काय हळूहळू आमची ओळख वाढत गेली. तू वाईट नव्हतास आणि नाहीस, तू मला आवडत नव्हतास, मी तुला इग्नोर करत होते असं काही नाही, पण आता निदान इथून पुढे तरी आपण मित्र राहू वगैरे वगैरे मध्ये तिनं मला बांधून घेतलं. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये तर एका मंदिरात ती स्वतः मला भेटायला आली. माझं आयुष्य जरी मर्यादीत असलं तरी, ते वर्ष, तो दिवस, तो क्षण माझ्यासाठी अजरामर झाला होता. जिला फक्त एकदा डोळेभरून पाहण्यासाठी मी धडपडायचो, ती स्वतः माझ्याशी बोलत होती, तिनं माझं असणं स्वीकारलं होतं, तिने स्वतः पाठविलेले तिचे ढीगभर फोटो आता माझ्याकडे होते, या सुखापुढे मला आकाश ठेंगणं झालं होतं. आता सगळे सुख दुःखाचे क्षण आम्ही वाटून घेत होतो. एकमेकांशी खूप खूप खूप बोलत होतो. पण अजूनही आम्ही एकमेकांच्या सावलीला ही कधीच स्पर्श केलेला नव्हता.
आता आमचं बोलणं सुरु होऊन एक वर्ष व्हायला आलं होतं. ती तिला हवं तेव्हा कधी मनात येईल तेव्हा मला फोन करायची आणि आम्ही अगदी तासनतास बोलत रहायचो. खरंतर फक्त तीच बोलायची आणि मी ऐकत रहायचो. कधी खूप खूप हसायची, तर कधी खूप खूप रडायची. आपल्या मूळ गावापासून खूप लांब रहायची ना, त्यामुळे तिला आठवण आली की मनमोकळं करून खूप रडायची. तिला हलकं वाटावं म्हणून ही सुद्धा सगळं काही बाजूला ठेवून तिला प्राधान्य द्यायचो. शेवटी किती झालं तरी तो माझ्या काळजाचा विषय होता आणि नेहमीच राहणार होता. तिच्याशी संबंधित अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी आवर्जून लक्षात ठेवायचो. एखादी गोष्ट मी चुकूनही विसरून जायला नको म्हणून लिहून ठेवायचो.
माझं तिच्या प्रती असलेलं वेड आणि प्रेम पाहून ती खूप भारावून जायची. कुणीतरी आपल्यावर इतकं प्रेम करत होतं आणि अजूनही करतच आहे, याच तिला खूप अप्रूप वाटायचं आणि तसं ती बोलून ही दाखवायची. पण तू मला अजूनही तसा आवडत नाहीस आणि का कुणास ठाऊक तुझ्याबद्दल त्या तशा फिलिंग्ज अजिबात येत नाहीत असंही सांगायची. अशावेळी तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे मला ना तेव्हा लक्षात आलं होतं ना आत्ता लक्षात आलं आहे. पण ती अशा पध्दतीने का असेना पण माझ्या आयुष्यात तिचं असणं मला खूप महत्त्वाचं होतं, म्हणून मी तिच्या अशा बोलण्याचा कधीच फार विचार केला नाही.
आता आणखी काही वर्षे निघून गेली होती. ही कुठे कुठे कित्ती काय लिहितो आणि कुणाकुणाला ते आवडतं, कोणी कसा प्रतिसाद प्रतिक्रिया दिल्या हे सगळं ही तिला सांगायचो, पण तिचा फारसा उस्फुर्त असा प्रतिसाद कधी यायचाच नाही. इथेही मी माझ्या मनाची समजूत घालायचो की, जिथं हाताची बोटं एकसारखी नसतात, तर मग माणसं कशी काय एकसारखी असतील. It's ok शरद, तिचा बाज वेगळा आहे. ती आपल्या आयुष्यात असणं महत्त्वाचं आहे, बाकी सगळं गौण.
आता हळूहळू ती तिच्या आयुष्यात रममाण होत चालली होती. पण अगदी माझ्याही आणि तिच्याही नकळत मी तिच्यात पुरता गुंतून गेलो होतो. तिच्यापासून शेकडो किलोमीटर दूर राहूनही मी आता तिच्या कुटुंबाचा हिस्सा झालोय याची तिला अजिबात जाणीव नव्हती. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्याच्या डोक्यावरून जर आपण कधी एकदा सुध्दा मायेने हात फिरवला तर ते कधीही आपल्याला बघितल्या बघितल्या आपल्याकडे धावत येतं, आणि इथं तरी हिने मला कित्ती लळा लावला होता. आणि आपण तर माणसं ना. मी कितीही कामात असलो तरी माझा सगळा दिवस तिचा विचार करण्यातच निघून जायचा. सुरूवातीला अगदी दररोज मेसेज, कॉल करणारी ती, आता कधीतरीच कॉल करू लागली होती. माझ्या मेसेजेस ला ही अगदी फारच कमी रिप्लाय करू लागली होती. इथेही मी माझ्या मनाची समजूत घालायचो आणि स्वतःला सांगायचो की, आपण एक मोकळं आहोत म्हणून ती सुद्धा मोकळी असेलच कशावरून.? कामात बिझी असेल, असं म्हणून मी तो ही विचार सोडून द्यायचो. तिचा मेसेज येवो न येवो मी उगाचच सारखा तिच्या whatsapp ला जाऊन यायचो आणि तिचा डीपी पाहत रहायचो.
आता हळूहळू तिचं दुर्लक्ष करणं म्हणा किंवा व्यस्त राहणं वाढलं होतं. मी तिला दररोज एखादा तरी मेसेज केलाच पाहिजे, असा तिचा हट्ट होता. पण तिने माझ्या त्या मेसेज ला कधी रिप्लाय द्यावा याला काहीच अटी शर्ती नव्हत्या. मग कधी तिचा रिप्लाय यायचा तर कधी फक्त दोन ब्लू टीकांवर मनाचं समाधान करून घ्यावं लागायचं.
आमची ओळख झाल्यानंतर माझ्या वाढदिवशी तिनं मला wish केलं होतं. तेव्हा का कुणास ठाऊक पण माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण पुढल्याच वर्षी लगेचच तिला माझ्या birthday चं विस्मरण झालं होतं. पार दुपार उलटून गेल्यानंतर मला तिचा फोन आला होता आणि sorry sorry ने सुरुवात करून तिने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अरे.. कसं काय कुणास ठाऊक, पण मी तुझा birthday विसरले रे, असं जेव्हा ती म्हणाली ना, तेव्हा तर माझे डोळे अगदी लागलीच टचकन पाण्याने भरून आले होते, हुंदका दाटून आला होता. पण हे सगळं तिला कळू न देता मी गप्प होतो आणि अगदी पुढच्याच क्षणी तिने ठेवते आता, फार कामं आहेत, नंतर करते, असं म्हणून फोन कट केला. फोन कट झाल्यानंतरही मी खूप खूप उशीरापर्यंत रडत होतो. मला माझं पुढचं चित्र आता अगदी स्पष्ट दिसत होतं. माझं मन आतल्या आत मला सांगत होतं की, शरदराव, लय जीव लावून चुकलात हो तुम्ही. ती खूप practical आहे आणि शरदराव तुम्ही पडलात emotional. का कुणास ठाऊक पण तेव्हा पहिल्यांदाच असा विचार मनात येऊन गेला की, practical माणसांसोबत आपण emotionally attach झालो की खूप त्रास होतो.
आता पुन्हा एकदा, एक नवं वर्ष उजाडलं होतं. पुन्हा एकदा माझा वाढदिवस आला होता. आणि माझ्या या वाढदिवशी ही तेच झालं, ज्याची भीती मला गेल्यावर्षीपासून वाटत होती. आता ती पुरती तिच्या आयुष्यात हरवून गेली होती. ती माझ्या संपर्कात आली तो एक फेज, त्या फेजमधील ती, आणि आत्ताची ती यात आता जमीन अस्मानाचा फरक आला होता. मध्यंतरी तिच्या शेजारी एक गृहस्थ अचानक गतप्राण झाला होता आणि तेव्हापासून ती या विचाराने हैराण झाली होती की, जर का मी अचानक गचकलो आणि कुणी माझा मोबाईल वगैरे, डाटा वगैरे पाहिला तर काय होईल. तिचं असं बोलणं ऐकून खरंतर मी खूपच डिस्टर्ब झालो होतो, पण ती वरवर नॉर्मल दाखवत असली तरी खूप सिरीयस वाटत होती. म्हणून मग तिला विश्वासात घेऊन, तिला धीर देऊन सांगितलं की, असं काहीच होणार नाहीये. पण फिरून फिरून तिचं पुन्हा पुन्हा एकच वाक्य, पण असं झालं तर..! म्हणून मग मी तिला सांगितले की तुझा एकही फोटो माझ्याकडे ठेवत नाही, सगळं फोटो डिलीट करतो, माझं digital जगातलं सगळं अस्तित्व नष्ट करतो, आणि जेव्हा कधी मी मरेन, तेव्हा माझ्यासोबत तुझ्या सगळ्या आठवणी घेऊन जाईन. वाटल्यास तू आत्ता सांग, मी गुपचूप स्वतःला संपवून टाकेन. आता तरी खुश ना. तुला वाटत असल्यास अगदी आत्तापासूनच आपण बोलणं बंद करू आणि भेटलोय तर फक्त एकदाच आणि तेही अगदी साधं हस्तांदोलन ही न करता. यावरही ती खूप खूप हसली आणि अरे... मस्करी करत होते रे, असं म्हणून वेळ मारून नेली. पण तिच्या बोलण्यात जाणवलेली अस्वस्थता माझ्या काळजाच्या तारा छेडून नाहीतर तोडून गेली होती. आता ती खूप फॉर्मल आणि तुटक वागत होती.
माझ्या वाढदिवसाच्या आठवडा आधीपासूनच मी या विचारात हरवलो होतो की, या वर्षी ती मला कशी wish करेल.? काय बोलेल.? पण पुन्हा दुसरं मन म्हणायचं की, शरदराव.., तिला तुमचे birthday लक्षात राहिला तरी खूप मिळवलं. आठवतंय ना, गेल्या वर्षी काय झालं होतं.
आणि एकदाचा तो दिवस उजाडलाच. अगदी रात्री बारा वाजल्यापासून मी whatsapp वर तिच्या मेसेजेची वाट पाहत होतो. एक दोन वाजेपर्यंत वाट पाहून पाहून शेवटी नाईलाजाने झोपी गेलो. तरीही अधेमध्ये दोन तीन वेळा मोबाईल चेक केला की, तिचा मेसेज नक्कीच आला असेल, पण पदरी पडली फक्त निराशाच.! सकाळ झाली. तिचा मेसेज अजूनही आला नव्हता. आज कामावर जायची इच्छा कधीच मरून गेली होती. नेहमीप्रमाणे आईनं औक्षण केलं. घराबाहेर पडताना नेहमीप्रमाणे वडीलांनी मला कडकडून मिठी मारली. का कुणास ठाऊक पण आज डोळे भरून आले होते. ते पाहून आई मायेने रागावली आणि म्हणाली की, बाळा, काय झालं.? डोळ्यात पाणी का आणलं आहेस रे.? मी काहीच न बोलता हसून डोळे पुसले, पुन्हा एकदा वडीलांना कडकडून मिठी मारली आणि नेहमीचा रस्ता पकडला. मी अजूनही पुन्हा पुन्हा मोबाईल चेक करत होतो. अजूनही तिचा मेसेज आलाच नव्हता.
मी बस स्थानकात येऊन आता दोन तीन तास उलटून गेले होते. माझ्या इच्छित स्थळी मला नेहमी घेऊन जाणारी बस दोन वेळा माझ्या समोरून निघून जाऊन पुन्हा माझ्या समोर येऊन थांबली होती. तिला बहुतेक आशा वाटत होती की निदान आत्ता तरी हा येईलच. तितक्यात कंडेक्टरने डबल बेल दिली आणि पुन्हा बस निघून गेली. मी पुन्हा पुन्हा मोबाईल चेक करतच होतो. अजूनही तिचा मेसेज आलाच नव्हता. तिची खूप आठवण येत होती. कुठे जाऊ, काय करू, हे मला काहीच सुचत नव्हतं. उगाचच वाट दिसेल तिकडं चालत चालत फिरत होतो. मार्केट, किल्ला भाग, दर्गा रस्ता, पोलिस स्टेशन, लायब्ररी, तिची शाळा, तिचं कॉलेज, इकडं उगाचच भटकत राहिलो, मोबाईल चेक करत राहिलो. डोळ्यांच्या अगदी काठावर येऊन थांबलेलं पाणी आणि दाटून आलेला हुंदका एकांताच्या प्रतिक्षेत होते, पण काही केल्या मला एकांत मिळत नव्हता.
आता दुपार झाली होती. चेहरा पुर्णपणे काळवंडून गेला होता. अजूनही तिचा मेसेज आलाच नव्हता. शेवटी नाईलाजाने चार वाजता मी पुन्हा घर जवळ केलं. आतली खोली पकडून तोंड दाबून मनसोक्त रडलो. तिचा मेसेज का आला नाही, ती वाढदिवस विसरली तर नाही.? पण इथेही मी माझ्या मनाची समजूत घातली की, बहुतेक कामात बिझी असेल, संध्याकाळी तरी नक्कीच फोन करेल. पण संध्याकाळची रात्र झाली तरीही तिचा फोन आला, न मेसेज. ती रात्रही मी तिच्या मेसेजची वाट पाहण्यात जागून काढली. पण तिचा मेसेज आलाच नाही.
पुढचा दिवस उजाडला. पुन्हा नेहमीप्रमाणे मी तिला दररोजचा मेसेज केला. लगेचच तिचा रिप्लाय ही आला. आणि त्यातून स्पष्ट जाणवलं की, तिला आपला वाढदिवस लक्षातच नाहीये. मग पुन्हा तेच ते, पुन्हा माझे डोळे पाण्याने भरले, हुंदका दाटून आला. पुन्हा नेहमीप्रमाणे मी माझ्या मनाची समजूत घातली की, बहुतेक काल कामाच्या व्यापात विसरली असेल, पण आज तिला नक्की आठवेल आणि ती लागलीच मला फोन करून शुभेच्छा देईल. पण असं काहीच घडलं नाही, ना त्यादिवशी तिचा फोन आला, ना पुढल्या दिवशी, ना त्याच्या पुढच्या दिवशी. का कुणास ठाऊक पण राहून राहून सारखं ते अतुल परचुरे यांचं एक रिल मला सारखं आठवत होतं, ज्यात ते म्हणतात की "आपण समोरच्यासाठी काय आहोत, किंवा समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. त्यात गल्लत झाली तर फार गडबड होऊ शकते. तुम्ही समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता. पण तो फक्त तुम्हाला टाईमपास समजतो. उपलब्ध असणं सद्गुण समजला जातो. त्याने फोन केला की तुम्ही त्याच्या समोर उपलब्ध आहात. तुम्ही काहीतरी मजेशीर बोलता, छान हसवता. पण जेव्हा त्याच्याकडे कोणासोबत वेळ घालवायचा हे निवडण्याची संधी असते किंवा मी कोणाला भेटावं याचा निर्णय घ्यायचा असतो. तेव्हा जेव्हा तो वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि तुम्हाला वेळ नाही सांगतो तेव्हा आपलं काहीतरी चुकतंय असं पटतं. समोरच्यासाठी आपण काय आहोत हेदेखील समजून घेणं महत्वाचं असते,".!
खूप वाईट वाटत होतं, पण आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण दुखवायचं तरी कसं या विचाराने हे दुख मनातच दाबून ठेवून तिच्याशी अगदी नॉर्मल बोलणं सुरूच होतं. तरीही मनातील सल काही केल्या जातच नव्हती. जिच्या birthday चं planning प्रत्येकवर्षी आपण सहा महिने आधीच करतो, तिला काय भेटवस्तु द्यायची यासाठी आपण आख्खं मार्केट पालथं घालतो, तिला प्रत्येकवर्षी अगदी रात्री बरोब्बर बारा वाजता wish करतो, तिला आपला birthday लक्षातच राहत नाही. पण इथेही मी माझ्या मनाची समजूत घातली की, हृदयाने श्वासांची तक्रार करायची नसते. कारण ह्रदयाचं अस्तित्वच मुळात श्वासामुळे असतं. पण सत्य परिस्थितीची जाणीव होणं, आणि आपण ज्यांना primary समजतो, ते मात्र आपल्याला optional समजत असतात, हे कित्ती त्रासदायक असतं हे कळून चुकलं.
दुसरं मन माझी समजूत घालण्यात व्यस्त होतं, आणि मला समजावत होतं की, शरदराव..., मुळात तुमच्या अपेक्षाच चुकीच्या हो. तुम्हाला त्रास तिच्यामुळे नाही तर तुमच्या अवास्तव अपेक्षांमुळे झाला आहे. शरदराव, जीव तुम्ही लावला आहे हो, त्यामुळे तुम्हाला त्रास होणं साहजिकच आहे. सावरा स्वतःला, आणि मन रमवा कामात. मोकळ्या मनाने राहिलात तर हा विचार जीव घेईल तुमचा. आणि मग मी तब्बल तीन दिवसांनी पुन्हा एकदा कामावर रुजू झालो. आता अजूनही तिनं सांगितल्याप्रमाणे दररोज तिला माझा एक मेसेज असतोच असतो, आणि हो अजूनही तिचा शुभेच्छा मेसेज आलाच नाही हं..!
#आयुष्य_वगैरे ❤️🫂