हिशोब
घरात रडारड अजूनही सुरूच होती. पण त्या सगळ्या आवाजात त्याच्या आईचा आवाज मात्र काळीज चिरून जाता होता. पिल्या.. कुठं गेलास रे.? कुठं शोधू तुला.? काहीच का बोलला नाहीस रे.? तुझी आई ना रे मी, पण मी सुद्धा तुझ्या मनात काय चाललंय ते का समजू शकले नाही रे.? पिल्या.. का केलंस रे असं.? एव्हाना सगळे सोपस्कार पार पडले होते. हुंदका दाबून एका कोपऱ्यात खाली मान घालून मी गप्प बसून होतो. बाजूच्या टेबलावर त्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पडला होता. 'श्वास गुदमरून मृत्यू' बस्स इतकंच काय ते लिहिलं होतं त्यात. पण त्यानं हे असं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण मात्र अजूनही कुणालाच माहीत नव्हतं.
नंतर काही दिवसांनी त्याची आई त्याच्याशी निगडीत आठवणी कवटाळून हमसून हमसून रडताना पुन्हा एकदा दिसून आली. ते पाहून खूप दिवसांनी मी पुन्हा एकदा त्यांच्या घराची पायरी चढलो. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याची आई सगळ्या गोष्टी गोळा करून बसलेली होती. लहान मुलं त्यांची आवडती खेळणी गोळा करून बसतात ना अगदी तसंच. पण इथं तर त्या आईचं लेकरूच हरवलेलं होतं, आणि ते सुद्धा कधीच परतून न येण्यासाठी.
मी आईच्या बाजूला जाऊन बसलो. तिथं खूप काही वस्तू दिसून येत होत्या, पण त्याची एक डायरी माझं लक्ष वेधून घेत होती. त्याचं शिक्षण तसं फारसं काही झालेलं नव्हतं, पण तो नेहमीच पैसा आला कसा आणि गेला कसा, याचा तंतोतंत हिशोब ठेवायचा. तो सोबत असताना याआधीही बरेचदा मी ती डायरी चाळली होती, म्हणून आत्ताही लगेचच मी ती हाती घेतली आणि पानं पलटून पाहू लागलो. आपलं आत्ताचं ते खाता बुक वगैरे app आहेत ना, अगदी तसंच काहीसं त्यानं त्या डायरीत लिहून ठेवलं होतं. महिन्याच्या सुरुवातीस अथवा अधेमधे किती पैसे आले आणि खर्च जाता महिनाअखेरीस किती बचत झाली वगैरे वगैरे. ते पाहत असताना एक विचार मनात येऊन गेला की, संपूर्ण खर्चापैकी फारच कमी असा खर्च त्याने वैयक्तिक कारणासाठी केला होता. सगळं काही फक्त आणि फक्त कुटुंबासाठी. हळूहळू अखेरच्या पानांकडे वळलो तसं काळजाचा ठोका चुकल्यासारखं झालं. कारण शेवटच्या दोन पानांवर असं काही लिहिलं होतं जे मी याआधी तिथं कधीच पाहिलं नव्हतं, किंबहुना ते लिहिलेलचं नव्हतं.
'माझं काहीही आर्थिक देणं अथवा येणं वगैरे नाही. सगळे हिशोब चुकते केलेले आहेत. फक्त प्रेमाचा हिशोब अपुरा राहिला आहे.'!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🫂