मी मेल्यावर... ❤️🩹🫂
घरातल्या त्या चिमुकल्याचे निष्पाप प्रश्न ऐकले की काळजात जणू सुरी खुपसल्यासारखं होतं आहे. "काका कुठे आहे? कधी येणार? माझ्याशी खेळून कित्ती दिवस झाले, तो का येत नाहीये, माझ्याशी का खेळत नाहीये.?" या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं, हे आम्हा कोणालाच समजत नाहीये. त्या चिमुकल्या जीवाचे ते डोळे अजूनही दाराकडे लागलेले असतात, आणि आम्ही मात्र नजरा चोरून अश्रू लपवत असतो. त्याला काय ठाऊक, की ज्या काकाच्या कडेवर खेळण्यासाठी तो हट्ट करतोय, तो काका आता या जगातच उरलेला नाही. हसरा चेहरा घेऊन आमच्यात वावरणारा आमचा तो दोस्त, आतून किती उद्ध्वस्त झाला होता, याची आम्हा सर्वांना जाणीव तर होती, पण तो असं टोकाचं पाऊल उचलेल, असं आमच्या स्वप्नातही आलं नव्हतं. सतत लोकांचे टोमणे, त्यांच्या नजरेतले प्रश्नार्थक भाव आणि काही वेळा दाखवली जाणारी ती खोटी सहानुभूती त्याच्या मनाला आतून पोखरत असावी. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करताना, समाजाशी आणि नशिबाशी लढताना त्याची सहनशक्ती संपली असावी. या जगाच्या निष्ठुरतेपेक्षा त्याला मृत्यूची शांतता अधिक जवळची वाटली. स्वतःची आणि आमच्यासारख्या आप्तस्वकीयांची या रोजच्या त्रासातून कायमची सुटका करण्यासाठीच त्याने स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं असावं. आज तो निघून गेला, पण मागे सोडून गेलाय कधीही न भरणारी एक मोठी जखम. त्याच्या जाण्याने त्यांच्या घरातला आणि आमच्या मित्रपरिवारातला एक हसता-खेळता कोपरा कायमचा शांत झालाय. आत्महत्येचा विचार करताना त्याच्या मनात नक्की काय आलं असेल, हा विचार करूनच अंगावर काटा येतोय. त्याने या जगाचा निरोप घेतला खरा, पण मागे राहिलेल्या त्याच्या या चिमुकल्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं बळ मात्र तो सोबत घेऊन गेला. आयुष्य इतकं स्वस्त नसतं, पण जेव्हा जगण्याची ताकद संपते, तेव्हा माणसाला हाच एक मार्ग उरल्यासारखा वाटतो, हेच या #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂 चं कटू सत्य आहे.!🎭