स्वामिनी..
एकत्र राहून सतत खटके उडायचे, म्हणून दादा वहिनी वेगळं राहत होते. दादा भाड्याच्या खोलीत रहायला गेल्यापासून आता जवळपास ५ वर्षे व्हायला आली होती. आणि वेगवेगळे राहिल्यापासून भांडणतंटे कमी होऊन नात्यात गोडवा ही वाढू लागला होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. गेल्या काही वर्षांपासून दादा ज्या आनंदाच्या शोधात होता, तो आनंद आता त्याला खुणावत होता. वहिनीची डिलिव्हरी जवळ आली होती. तेव्हापासून आईवडिलांचं तिकडं येणं जाणं वाढलं होतं. पण घरातल्या सर्व भांडणांना आधीपासूनच मला दोषी धरण्यात आल्यामुळे मी मात्र तिकडे जातच नव्हतो. आईवडिलांच्याकडून दादा वहिनीची ख्यालीखुशाली जाणून घ्यायचो, बस्स इतकंच. शेवटी आपलं माणूस कुठे का असेना, सुखी असेल तर बस्स. आपल्याला आणि काय हवं.? आणि एकदाचा तो दिवस उजाडला. पहाटे पहाटे पप्पांना दादाचा फोन आला, आणि मी काका झालो. सगळं घर आनंदाने नाचू लागलं होतं. वहिनी आणि बाळं दोघेही सुखरूप होते. पण का कुणास ठाऊक, बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं होतं. आईवडिलांना आभाळ ठेंगणं झालं होतं. एव्हाना छोट्या मोठ्या कामाने दमणारे आईबाबा दवाखान्यात धाव धाव धावत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर ...