पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Delete

मोबाईलच्या गॅलरीत जपून ठेवलेला तुझा एखादा फोटो डिलीट करताना delete आणि undo यांच्यात तुफान हाणामारी होते, मोबाईलची गॅलरी रक्तबंबाळ होते, कंठ दाटून येतो, काळवेळ न पाहता डोळे टचकन पाण्याने भरून येतात. मग तू तर माझ्या आयुष्याचा भागच नाहीयेस, फक्त एक आठवण बनून जगतोय तुला, अगदी मनसोक्त. मग कित्ती रडलो असेन गं मी, कित्ती रडतो गं मी, याचा हिशोबच नाही. माझ्यासाठी नेहमीच सर्वात आधी तू असतेस, आणि तुझ्यासाठी बहुतेक सर्वात शेवटी मी.! बरोबर ना.!?? माझी साधी सावलीही पडली नाही कधी तुझ्यावर, तरीही कधी, कुठे आणि कसा.? मी इतका तुझा होऊन गेलोय, ते माझं मलाच कळत नाही.!🎭 #अडगळ #काल्पनिक_वगैरे #जगण्याची_रीत

फोडणी

शिळा भात थंडीने कुडकुडत, आपापल्या शीत भावांना गच्च पकडून, उबीच्या शोधात दगडासारखा झाला होता. हात सैन्यातील ५ प्रचंड सामर्थ्यवान सैनिकांना पाठवून त्यांना एकमेकांपासून विलग केलं. मग नुसता आकांडतांडव आणि एकच आक्रोश उठला. शीत भावांना गलबलून आल्यानं हळूहळू सगळीकडे पाणी पाणी होऊ लागलं. तितक्यात त्या ५ प्रचंड सामर्थ्यवान हात सैनिकांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला. भात शीतभावांची तशी अवस्था पाहून कांदाही लागलीच रडू लागला. बुडाखाली लागलेल्या आगीनं कढईची भूक कधीपासून उकळ्या मारत होती. हात सैन्याचा निषेध म्हणून मोहरी आणि कढीपत्ता यांनी प्राणाहुती दिली. भाताच्या आयुष्यातील शेवटचा क्षण तरी रंगीबेरंगी व्हावा, म्हणून हळदीने मुक्तहस्ते स्वतःला उधळून लावलं. शेवटी कोथिंबीरीने आपलं मनोगत व्यक्त केलं, आणि शिळ्या भाताचा, रंगरंगोटी केलेला शेवटचा प्रवास सुरू झाला.!🎭 #आयुष्य_वगैरे 

ताई

प्रिय ताई, नमस्कार..!  🙏 पत्रास कारण की, एक तारीख  ज्या तारखेचं अगदी बालपणापासून  खूप खूप कौतुक आहे,  अशी ती तारीख म्हणजे ११/११.  तुझ्या आयुष्यातील  आणि तुझ्याशी निगडित सर्वांच्या आयुष्यातील  अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस,  म्हणजे तुझा वाढदिवस..!  या धावपळीच्या आयुष्यात,  कधी कधी तुला या दिवशी शुभेच्छा द्यायचं राहून जातं,  पण या दिवशी तुझी आठवण आली नाही,  असं आजपर्यंत कधीच झालं नाही,  आणि होणार ही नाही. बालपणापासून ते अगदी तरूणपणात पदार्पण करेपर्यंत,  आपल्या कितीतरी कडू गोड आठवणींचे  आपण साक्षीदार राहिलो आहोत. आता त्यापैकी ब-याचशा आठवणी ह्या  विस्मृतीत गेल्या असल्या तरीही,  अजूनही कधी कधी ते जुने दिवस आठवले की,  वाटून जातं की, खरंच बरं होतं ते बालपण,  उगाचच मोठे झालो आपण.  कधी कधी मी जेव्हा गार्गीला पाहतो ना,  तेव्हा मला मी तुझ्या घरी यायचो तेव्हाचे दिवस आठवतात, आणि तेव्हाची ती, छोटीशी तू, कधी कधी अचानक डोळ्यासमोर उभी राहतेस.  ब-यापैकी आपल्या सगळ्याचं असंच होतं गं,  बोलायचं...

चप्पल

पप्पाची तुटलेली #चप्पल पाहिली की, माझ्या मनात नकळत बालपणीचे ते दिवस डोकावून जातात. तेव्हा उन्हाळा असो, हिवाळा असो, वा पावसाळा, पॅरेगॉनची शीरपल, म्हणजे स्लीपर चप्पल म्हणून ठरलेली असायची. चप्पल म्हणजे शीरपल, हे गणित तेव्हा मनात फिक्सच झालेलं होतं. तेव्हा ही चप्पलच्या किंमती आत्ताप्रमाणेच आडमाप असायच्या. त्यावेळी कधी कधी तर त्या ४९/- रूपयांच्या शीरपल मध्ये अखंड वर्ष काढावं लागायचं. या दिवाळीला घेतलं की, थेट पुढल्या दिवाळीलाच. त्या शीरपलमध्ये तसा फक्त हिवाळाच सुसह्य वाटायचा. कारण उन्हाळ्यात त्या शीरपलचा तो रबरी पट्टा जिथं त्वचेच्या संपर्कात यायचा, तिथं फोड उठायचे. आणि ते फोड फुटले की मग चालताना खूप त्रास व्हायचा. कधी कधी तर जखमाही व्हायच्या. आणि पावसाळ्यात तर चिटक्या उडून उडून मागील बाजूने कपडे चिखलाने पुर्ण माखून जायचे. पावसाळ्यात कधी कधी शाळेतून घरी परतताना शीरपल नकळत पायातून निसटून पाण्यातून वाहत जायचं. मग त्या वाहत जाणाऱ्या चप्पलामागे धावताना, मनात बॅकग्राऊंडला जेम्स बॉण्डचं #संगीत सुरू असायचं. अशावेळी खरी पंचाईत तर तेव्हा व्हायची, जेव्हा चप्पल वाहत गटारात जायचं, आणि मग पुढं एखादा मोठा...

उटणं

घरी नेहमीप्रमाणे सर्वात आधी #आई जागी झालेली असायची. सगळं काही आवरून अंगणात सडा शिंपून, तिनं अंगणात जमेल तशी, जमेल तितकी काढलेली #रांगोळी पाहून क्षणभरासाठी अंगणात #इंद्रधनुष्य पडल्याचा भास व्हायचा. तुळशी जवळ लावलेली एक छोटीशी पणती जणू उगवत्या सुर्याशी स्पर्धा करतेय असं वाटायचं. हळूहळू आईची प्रेमळ हाक कानावर येऊ लागायची. मग झोपेतून कधी जागा झालो, आणि कधी त्या चुलीपाशी येऊन बसलो काहीच कळत नसायचं. कधीपासून हाताच्या तळव्यावर एकटी पडलेली कोलगेटची पावडर बोटाच्या प्रतिक्षेत असायची. घरभर पसरलेला धूर पाहून वाटून जायचं की मी स्वप्नात तर नाही ना. तेव्हा त्या चुलीतल्या धुरालाही दिवाळीचं किती कौतुक वाटायचं ना. तो धूरही नकळतपणे घरभर इकडे तिकडे पळत असायचा. इकडं पाणी तापत असताना एकुलती एक चुलत #बहीण तेलाची वाटी घेऊन वाट पाहत उभी असायची. दात घासून झालं की मग तिच्या समोर जाऊन, रांगोळी काढलेल्या एका पाटावर उघडाबंब होऊन बसायचं. #थंडी तर खूप वाजायची, पण आईसमोर काहीच चालायचं नाही. मग बहीण सर्वांगाला तेलाने मालिश करायची. किती मस्त वाटायचं. हे आवरलं की सर्वात आधी बहीणच दोन तीन तांबे पाणी अंगावर ओतायची. मग त्या...

किल्ला

शाळेला दिवाळी सुट्टी लागण्याआधीच #किल्ला बनवायची तयारी सुरू झालेली असायची. शेवटचा पेपर संपला की, किल्ल्यावर शेवटचा हात मारला जायचा. नागमोडी वळणाच्या पाय-या, ठरावीक ठिकाणी विहीर, घराच्या कौलाच्या खाप-या काढून गुफा बनवणं, खराट्याच्या काड्या लावून आजूबाजूला भक्कम तटबंदी आणि थोडासा खोलवर खड्डा काढून, त्यात पाणी सोडून #खंदक वगैरे. मग दररोज उठून सर्वात पहिला मोर्चा वळायचा ते थेट किल्ल्याकडेच. किल्ल्यावर आणि आजूबाजूला टाकलेली हळीव, मोहरी उगवली आहे की नाही पहायचं, पाय-या आणि बुरुजावर टोचलेली खपली नीट उगवली आहे की नाही ते पाहणं वगैरे वगैरे. वर्षानुवर्षे त्या एका बॉक्सात जपून ठेवलेली ती #सैनिकं हळूहळू बाहेर काढणं, आणि किल्ल्यांवर ठिकठिकाणी मांडणं. छोटे छोटे भगवे ध्वज तयार करून किल्ल्यावर ठिकठिकाणी लावणं, आपण मुद्दामहून वेचून आणलेली ठराविक हिरवी सैनिक आणि आपली सैनिक यांना समोरासमोर उभं करून लढताना दाखवणं. सर्वात उंच अग्रभागी दिमाखात बसलेल्या आपल्या छत्रपतीं समोर, एका इंग्रजाला मुजरा करताना अवस्थेत उभं करणं.! आणखीन ही कित्ती काही.!🎭 #आयुष्य_वगैरे #गंध_आठवणींचा