दिसतं तसं नसतं..

जेवणाची सुट्टी झाली होती. कडकडून भूक लागली असल्याने मी लागलीच माझा मेसचा डबा घेऊन खुर्ची सोडली. बाहेर व्हरांड्यात कधीपासून गोंधळ सुरू होता, पण न्यायालयात तर हे नेहमीचच, असं स्वतःशीच पुटपुटत मी दुर्लक्ष करून तसाच पुढे निघून आलो. आता २०-२५ मिनिटे उलटली होती. मी जेवण करून माझ्या कार्यालयात परतत होतो, तरीही अजूनही व्हरांड्यातील तो गोंधळ सुरूच होता. आता मात्र न रहावल्याने मी क्षणभर तिथंच थांबून नेमका विषय काय आहे, ते पाहू लागलो. लाकडी बाकड्यावर जवळपास ३५-४० मधील वयाचा एक व्यक्ती ओक्साबोक्शी रडत होता. ब-यापैकी नीटनेटका आणि सुशिक्षित दिसत होता. पांढरीफटक दाढी आणि केसही जवळपास तसेच. पाठीला एक बॅकपॅक दिसत होती. त्याच्या बाजूला बहुतेक त्याच्याच वयाचे २-३ व्यक्ती त्याला सावरत धीर देत होते. आपण शेवटपर्यंत चांगल्या भावनेने लढलो, पण दिसतं तसं नसतं मित्रा, आणि हे जग शेवटी दिसण्यालाच भुलतं वगैरे वगैरे. तितक्यात त्यांचे वकील तिथं आले, आणि तो आणखीन जास्तच रडू लागला....

"साहेब, जो चांगल्यासाठी भांडतो, त्याचं चांगलंच होईल, असं नसतं हो. डोळ्यांवर पट्टी असो वा नसो, ही न्यायदेवता आंधळी आहे, आणि नेहमी आंधळीच राहणार. न्यायव्यवस्था नावालाच उरलीय हो. कित्ती वर्षे लढलो मी, ते सुद्धा तलवार म्यान करून.! का.? कशासाठी.? कारण समोर माझीच माणसं उभी होती. पण त्यांनी मात्र संधी मिळाली तेव्हा वर्मी घाव घातला हो. तरीही मी आशा लावून होतो की, हे ही दिवस जातील, सगळं काही ठीक होईल. सगळं काही सावरण्याचा किती प्रयत्न करत आलो हो, पण शेवटी पदरात काय पडलं.? घनघोर निराशा आणि जीवघेणं एकाकीपण. पैशाचं काय नाही हो. पैसा तर मी जिवंत आहे तोपर्यंत कमवत राहेणच, पण माझा गेलेला हा बहुमोल वेळ, माझ्या आयुष्यातील ती ऐन उमेदीची वर्षे, मी परत कसं आणू साहेब.? वाट्याला आलेल्या त्या कडू गोड आठवणीचं मी काय करू.? साहेब.. माझी आई अगदी बरोबर बोलायची हो. हतबल माणसं ही नेहमी एकाकी असतात, आणि शेवटपर्यंत एकाकीच राहतात. चार माणसांत ही, आणि स्मशानात ही.!"🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ  

लोकप्रिय पोस्ट