हंबरडा
तिनं प्रेमविवाह केल्याचं कळालं, त्याच दिवशी तिच्या बापाने सगळा समाज बोलावून जाहीरपणे तिचं श्राद्ध घातलं होतं. तिच्या सगळ्या आठवणी, तिच्या वस्तू, सगळं सगळं काही अंगणात आणून पेट्रोल ओतून पेटवलं होतं, आणि तेराव्या दिवशी तर मोबाईलवर तेराव्याचा स्टेटस ही ठेवला होता. आता जवळपास दीड वर्षे उलटून गेली होती. मुलीच्या मनात प्रेम नव्हतं अथवा कमी झालंय असं काही नव्हतं, पण आता त्या मुलीला त्या मुलाचे माहीत नसलेले सारे रंग कळून चुकले होते. या मधल्या काळात ती शक्य तितकं सावरून घेत होती, पण हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं की आत्ता आपलं वय काय आणि पुढे आणखी काय काय सोसावं लागेल आणि पहावं लागेल, म्हणून मग तिथून ती पळ काढणारच होती, तितक्यात पाय घसरून विहिरीत पडून तिचा मृत्यू झाल्याची बातमी आली. आपलं प्रेम खरं होतं, पण लग्नानंतर कळू लागलेल्या नकोशा गोष्टी यामुळे तिला तिच्या आईबापाची आठवण आली असेलच की, पण आता तिकडं जायचं तरी कुठल्या तोंडानं? कारण आपण प्रेमविवाह केला, त्याच दिवशी आपल्या आईबापासाठी आपण मेलोय. तिचं प्रेत विहिरीतून बाहेर काढताना मला तिचा आत्मा तिथं विहीरीच्या कठड्यावर बसल्याचा भास होत होता, आणि तिची भिरभिर नजर तिच्या बापाला शोधते आहे, असं मला वाटत होतं. तिथं तिचा बाप कुठेच उभा नव्हता, पण त्यानंही चार भिंतींच्या आत हंबरडा नक्कीच फोडलेला असावा. बरोबर ना.?!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂