लाटेविना किनारा..
कसं काय कुणास ठाऊक, पण तिला सगळं कळालं होतं. माझ्या आयुष्याच्या या अशा एका महत्त्वाच्या वळणावर तिचं असं अगदी अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी धक्कादायक असं होतं. एकीकडे वर्तमानात माझी वाताहत सुरू असताना अचानकपणे माझ्या समोर आलेला माझा हा भूतकाळ अशा उध्वस्त अवस्थेतही मला नकळत सुखावून जात होता. काय करावं ते मला काहीच कळत नव्हतं. म्हणून मग मागचा पुढचा फारसा काहीच विचार न करता मी सुद्धा वाहत जायचं ठरवलं. दिवसामागून दिवस जातच होते. पहिली एक दोन वर्षे तर अशी काही गेली की, आम्हां दोघांत तब्बल साडेतीनशे किमीचं अंतर असूनही ती मला कधी दूर जाणवलीच नाही. आणि मध्यंतरी तर तिनं मला अशा पेचप्रसंगात टाकलं की मी स्वप्नात तर नाही ना, असं मला वाटायचं. पण शेवटी घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, तिचंही तसंच काहीसं व्हायचं. कोविड नंतरचा काळ होता तो. हळूहळू आता ती सावरू लागली होती. मी मात्र पुरता तिच्यात अडकून गेलो होतो, पण याची तिला जाणीव ही नव्हती, आणि मी तसं बोलून दाखवलं असतं तर तिचं उत्तर काय येणार हे मला आधीच ठाऊक असल्यानं मी तसाच शांत होतो. पण का कुणास ठाऊक, ती हवीहवीशी वाटायची, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं असणं खूप आपलसं वाटायचं, कारण ते माझं पहिलं एकमेव बालपणीचं प्रेम होतं, आणि या गोष्टीची तिला चांगलीच जाण होती. आता चारेक वर्षे उलटून गेली असतील. ती आता आणखीन जास्त तिच्या आयुष्यात रममाण होत चालली होती, आणि तिच्याही कळत नकळत आता मी दूर किना-यावर फेकला गेला होतो. मला हवीहवीशी लाट आता खूप खूप खूप कमी प्रमाणात माझ्या वाट्याला येत होती. मला हे सहन ही होत नव्हतं आणि तिला सांगता ही येत नव्हतं. तिचं माझ्याकडे फारसं लक्ष नसलं तरी बेहत्तर, पण तिचं माझ्या आयुष्यात असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. संसार टिकविण्यासाठी माझी सुरू असलेली धडपड अखेर व्यर्थ ठरली आणि कोर्टाने माझ्या बाजूने एकतर्फी निकाल दिला. तरीही मला तीच हवी होती. पण का कुणास ठाऊक तिला मी नकोच होतो. जुन्या आठवणी पाहण्यात, घर सांभाळण्यात, सावरण्यात माझे दिवस कसेबसे जात होते, पण काही केल्या तिची आठवण जात नव्हती. आणि कोर्टाने माझ्या बाजूने एकतर्फी निकाल दिल्याचं मी जेव्हा तिलाही सांगितलं त्यानंतर हळूहळू ती सुद्धा माझ्यापासून आणखी आणखी दूर जाऊ लागली. आता फक्त नावापुरतचं ती माझ्या आयुष्याचा भाग राहिली होती. कधीकाळी दररोज होणारं बोलणं आता फक्त कधीकधीच्या मेसेज वर येऊन थांबलं होतं. माझी नाराजी तिच्यापासून लपली नव्हती, पण तिला या गोष्टीचं काही अप्रूप नव्हतं, ना आत्ता, ना तेव्हा.! बहुतेक ती फक्त मला तात्पुरता आधार द्यायला माझ्या आयुष्यात आली होती, पण कळत नकळत मला आणखी उध्वस्त करून दूर निघून गेली होती. आता माझं एक मन त्या दोघींच्या आठवणीत दररोज झुरत राहतं. कारण एकीने माझ्या आयुष्यात यायला खूप उशीर केला, आणि एकीने माझ्या आयुष्यातून निघून जाण्याची खूप घाई केली.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂