स्वामी तिन्ही जगाचा आईविना...
माझ्या आईची आई गेल्याचं कळालं होतं, तो दिवस मला अजूनही आठवतो. उसदराचं आंदोलन पेटलं होतं, त्यात माझ्या मामाचं गाव नेमकं त्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी. आई नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती. तिला हे कसं सांगावं आणि या आंदोलनाच्या आगडोंबात तिला तिथं कसं घेऊन जावं, हे मला काहीच सुचत नव्हतं. शेवटी मी अधल्या मधल्या ओढ्या नाल्यांवरच्या रस्त्याने जायचं ठरवलं आणि गल्लीतला एक रिक्षावाला घेऊन आलो. तो भाग म्हंटल्यावर तसा तोसुद्धा नाहीच म्हणत होता, पण नेमका विषय काय ते सांगितल्यावर तो ही तयार झालाच. आईला थोडं काम आहे, मामाने अर्जंट बोलावलं आहे असं सांगितलं, आणि रिक्षात बसवलं. मी तिला चल असं म्हटल्यापासून तिचा एकसारखा एकच प्रश्न सुरू होता की, का बोलावलंय, काय झालंय ते सांग की रे शरद. मी काय नाही, सहज कायतरी काम आहे आणि तो कुठेतरी सहकुटुंब सहलीला जात आहे आणि बरेच दिवस परत येणार नाहीये म्हणून प्रत्यक्ष भेटायला बोलावलंय असं सांगितलं. पण तरीही आईचं समाधान झालेलं दिसत नव्हतं. ती अचानक टक लावून कुठेतरी दूरवर पाहू लागली आणि एकदमच शांत झाली. त्यानंतर प्रत्येक पाचदहा मिनिटाला मी तिला फक्त डोळं पुसताना आणि हात जोडून देवाकडे प्रार्थना करताना पाहिलं. रिक्षावाला मिळेल त्या वाटेने हळूहळू पुढे जातच होता. वाटेवर आणि वाटेकडला ठिकठिकाणी अर्धवट जळालेल्या टायरांचा आणि भल्यामोठ्या दगडांचा ढीग लागला होता. कुठंकुठं तर पलटी केले गेलेले दोन तीन ट्रॅक्टर आणि प्रचंड प्रमाणात अस्ताव्यस्त विखुरलेली उसाची कांड दिसत होती. माझ्या आईचा बाप गेला तेव्हा मी खूप लहान होतो, पण तेव्हा आईनं फोडलेला हंबरडा आणि बाबांच्या अचेतन देहाच्या शेजारी बसून बाबा ओ बाबा अशी दिलेली आर्त हाक अजूनही कानात घर करून बसली होती. आता आज तर आईची आई गेली होती, सगळं सख्खं भाऊ तर कधीच निघून गेलं होतं. फक्त हा दत्तक पुत्र असलेला शिक्षक मामाच शिल्लक होता. आज आईची आई निघून जाण्यामुळे तिचं माहेरपण जवळपास संपल्यात जमा झालं होतं. रिक्षा हळूहळू पुढे पुढे जातच होती. आई बाहेर पाहत विचारात हरवून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर काळजीची छटा अगदी स्पष्टपणे दिसू लागली होती. ती आत्ता काय काय विचार करत असेल याची मला कल्पनाही करवत नव्हती. जो विचार मी स्वप्नातही करू शकत नाही अन् करणार ही नाही, अशी गोष्ट आज आईच्या वाट्याला येणार होती, किंबहुना आलेलीच होती. आपल्या आईला तिच्या आईसाठी रडताना कसं पहायचं आणि आपली आई अशी लहान मुलाप्रमाणे रडत असताना स्वतःला कसं सावरायचं हे मला कळतच नव्हतं. एव्हाना रिक्षा गावात शिरली होती, आणि आमच्या मळ्याच्या घराच्या वाटेला लागली होती. तशी अचानकपणे आई एकदम सावध झाली होती. तिची नजर एखाद्या लहान मुलाप्रमाणे आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींवरून फिरत होती. बहुतेक तिला तिचं बालपण तरूणपण वगैरे आठवून जात असावं. रिक्षा मळ्यातल्या घराजवळ जात होती तसतशी आजूबाजूला माणसांची गर्दी वाढत जात होती. ती गर्दी पाहून आई आणखीन जास्त कासावीस होऊन मला सारखं विचारू लागली होती की, शरद... काय झालंय ते सांग की रे. पण मी हुंदका गिळून आईचा हात घट्ट धरून तस्साच बसून होतो. रिक्षा घराच्या अगदी जवळ आली आणि आईला बायकांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तसं माझ्या आईचं डोळं भरुन आलं. रिक्षा घराजवळ थांबली तसा तिनं आई... म्हणून हंबरडा फोडला अन् धावत जाऊन तिच्या आईच्या निर्जीव देहाला बिलगली. पहिली काही मिनिटे मी शांत राहिलो, पण हळूहळू माझ्या आईचा आवाज माझं काळीज चिरत जाऊ लागला अन् नकळत मीसुद्धा ओक्साबोक्शी रडू लागलो. त्यादिवशीचं माझ्या आईचं ते रडणं आणि तिने तिच्या आईला दिलेली ती आर्त हाक अजूनही माझ्या कानात सतत घुमत असते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂