पुन्हा भेटूच.. ❤️🩹
आज एका मित्राने सहज प्रश्न केला की, आपण दररोज तर भेटतो. आज भेटलो, उद्याही भेटणार, परवाही भेटणार आणि तिथून पुढेही भेटतच राहणार. पण असं असूनही प्रत्येकवेळी तू आमचा निरोप घेत असताना हे 'पुन्हा भेटूच' असं का म्हणतोस.? त्यावर मी त्याला म्हणालो की, निरोप घेणं ही मानवी आयुष्यातील एक कधीही न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक प्रवासाला जसा अंत असतो, तसाच प्रत्येक भेटीलाही एक निरोप असतो. पण हा निरोप आपण कोणत्या शब्दांनी घेतो, यावरच त्या नात्याची वीण आणि पुढच्या भेटीची उत्सुकता पुर्णपणे अवलंबून असते. आजकालच्या या धावपळीच्या युगात आपण अगदी सहज 'टाटा' किंवा 'बाय-बाय' म्हणून मोकळे होतो. पण खरे पाहता हे शब्द जितके इंग्रजी धाटणीचे आहेत, तितकेच ते एकाएकी नाते संपल्याची जाणीव करून देणारे आहेत. निदान मलातरी यांच्यात एक प्रकारचा साचेबद्धपणा आणि कोरडेपणा जाणवतो. जणू काही एका क्षणात आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या विश्वातून बाजूला करत आहोत. याच्या अगदी उलट, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा निरोप घेत असताना 'पुन्हा भेटूच' असं म्हणतो, तेव्हा त्या निरोपाचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाते. 'पुन्हा भेटूच' या दोन शब्दांत केवळ निरोप नसतो, तर तो एका नव्या सुरुवातीचा पूल असतो. 'पुन्हा भेटूच' हा शब्दप्रयोग नात्यामध्ये एक आश्वासक चैतन्य आणि Positive Note भरतो, असं मला वाटतं. हा निरोप शेवट मानत नाही. 'पुन्हा भेटूच' यामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल वाटणारा आदर, जिव्हाळा आणि पुन्हा एकत्र येण्याची आर्त इच्छा स्पष्टपणे दिसून येते. आपल्यात येणारा हा तात्पुरता दुरावा हा कायमचा नसून, आपण लवकरच पुन्हा एकत्र येणार आहोत, हा विश्वास हे शब्द देतात. हे शब्द मनाला एक अनामिक दिलासा देऊन जातात की, आपल्या सगळ्यांचा प्रवास जरी वेगळा झाला तरी आपली दिशा मात्र एकच आहे. म्हणूनच, नाते कोणतेही असो, तिथून बाहेर पडताना अंतःकरणात एक आशेचा किरण जिवंत ठेवणारं 'पुन्हा भेटूच' हे वाक्य मला खरंच खूप खूप भारी आणि मनाला सुखावणारं वाटतं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂