शब्दछळ... ❤️‍🩹

कसं काय कुणास ठाऊक, पण माणसाचं मन आणि समोरच्याची उत्सुकता यांचा कधीच मेळ बसत नाही. आपण ज्या गोष्टीपासून, ज्या आठवणीपासून किंवा ज्या विषयापासून चार हात लांब पळू पाहतो, नेमका तोच विषय आपल्या आसपासच्या लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनतो. जणू काही आपल्या मनाच्या जखमांवर बोट ठेवल्याशिवाय समोरच्याच्या संभाषणाला पूर्णत्वच येत नाही. आपल्याला त्या गोष्टीचा, त्या प्रश्नांचा कित्ती त्रास होतोय, हे कदाचित त्यांना मनोमन माहीतही असतं, तरीही एका सुप्त कुतूहलापोटी किंवा निव्वळ सवयीपोटी ते पुन्हा पुन्हा त्याच संवेदनशील विषयाला कुरवाळत राहतात. अशा वेळी आसपास गर्दी असूनही मनात कमालीचा एकटेपणा जाणवू लागतो. आपण चेहरा हसता ठेवून विषय बदलण्याचा प्रयत्न करतो, शब्दांचे खेळ करतो, पण समोरची माणसं मात्र त्याच नकोशा वळणावर येऊन थांबतात. हा मानसिक छळ उघड नसला, तरी आतल्या आत माणसाला पोखरून काढणारा असतो. आपल्याला शांतता हवी असते, त्या नकोशा विषयापासून थोडी सुटका हवी असते, पण जग मात्र आपल्याला त्याच वर्तुळात गोलगोल फिरवत ठेवतं. समोरच्याची ती सांत्वनाची खोटी पांघरूणं किंवा उपदेशाचे डोस आपल्या त्या जखमेला आणखीनच जास्त चुरचुरत ठेवतात. माणसांना दुसऱ्याच्या वेदनेचा अंदाज नसतो असं नाही, पण दुसऱ्याच्या भावनांचा आदर करण्यापेक्षा त्यांना स्वतःची बोलण्याची हौस भागवण्यात जास्त रस असतो, हेच या मनस्थितीचं दुर्दैवी सत्य आहे. शेवटी, 'आपल्याला काय वाटतंय' यापेक्षा 'त्यांना काय विचारायचंय' यालाच लोक प्राधान्य देतात आणि आपण मात्र एका मूक असह्यतेत अडकून पडतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट