शेवटी सगळं काही फक्त आपल्या माणसांसाठी... ❤️🩹
आयुष्याच्या या धावत्या गाडीत कधी कधी आपण नेमके कोण आहोत, हाच प्रश्न पडू लागतो. आपण या प्रवासाचे प्रवासी आहोत की फक्त एक कंडक्टर..? प्रवासी तरी निदान आपल्या सोयीने उतरू शकतात, थांबून विश्रांती घेऊ शकतात. पण आपली अवस्था त्या कंडक्टरसारखी झाली आहे, ज्याला प्रवासाचा प्रचंड थकवा आलाय. रोजची तीच धावपळ, तोच कोलाहल आणि तोच कंटाळवाणा रस्ता. आता तर पार वैतागून गेलोय आपण. मनातून सगळं काही नको नकोसं झालंय. असं वाटतं की याच क्षणी सगळं काही थांबवावं, कुठेतरी शांत बसून राहावं आणि या जगाच्या गतीतून स्वतःला मुक्त करून घ्यावं. पण आपल्याला थांबण्याची परवानगी नाही, कारण या गाडीत अनेकजण आपल्या आशेवर बसले आहेत. त्यांनी आपला चेहरा पाहून, आपल्यावर विश्वास ठेवून हा प्रवास सुरू केला आहे. त्यांना वाटतंय की हा माणूस आपल्याला सुरक्षितपणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. त्यांच्या डोळ्यांतील ती निष्पाप आशा आणि विश्वास आपल्याला थांबून देत नाही. जेव्हा स्वतःचे पाय थकलेले असतात, मन विषण्ण झालेलं असतं आणि आतून माणूस पूर्णपणे रिकामा झालेला असतो, नेमक्या त्याच वेळी इतरांसाठी चेहऱ्यावर एक खोटं हसू आणून पुढे सरकावं लागतं. हा उरलेला प्रवास आता आनंदासाठी उरलेला नाही, तर तो केवळ एका कर्तव्यासाठी, एका जबाबदारीसाठी सुरू आहे. आपण स्वतः वैतागलो आहोत हे मान्य, पण आपल्यामुळे इतरांचा प्रवास सुकर व्हावा, हाच एक एकमेव हेतू आता उरला आहे. निदान त्यांच्या आशेचा गळा घोटला जाऊ नये, म्हणून का असेना, पण आपल्याला रोज उठून या प्रवासाला सामोरं जावंच लागतं. हा प्रवास कठीण आहे, थकवणारा आहे, पण तो अपूर्ण सोडता येणार नाही. कारण आपल्याला नको नकोसे वाटत असलेले काही प्रवास हे आपल्यासाठी नसतातच, तर ते असतात आपल्या माणसांच्या आनंदासाठी, त्यांच्या चेहऱ्यावरच्या निखळ हास्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂